मुंबई :(Navnath Ban) राज्यसभेचे गणित मांडताना उबाठाला वजा करून शरद पवारांचा मार्ग सुकर करण्याची धडपड संजय राऊत करत आहेत. उबाठाच्या कोट्यात एक जागा असताना आता प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर गेल्या तर, कार्यकाळ संपल्यानंतर राऊतांचा पत्ता कट होणार हे माहिती असल्याने राऊतांचा हा डाव आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली.
नवनाथ बन म्हणाले की, "मराठीचा मुद्दा उपस्थित करून प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट करण्याची संजय राऊत यांची चाल आहे. रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान आदित्य ठाकरे करत असले तरी राऊतांची तशी इच्छा नाही. राज्यसभेच्या खासदारकीवरून आधी कधीही मराठी कार्ड न टाकणाऱ्या राऊतांनी अचानक यावेळी मराठी कार्ड खेळले आहे. प्रियांका या अमराठी असल्याने राऊतांचा हा डाव असून यावेळी राज्यसभेवर उबाठाला संधीच मिळू नये, हीच राऊतांची मनोमन इच्छा आहे."
"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा जळफळाट झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत की, मित्र यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असून बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापासून वाचवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खरे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणारे उद्धव ठाकरे आणि राऊत आहेत." असेही ते म्हणाले.
एसआयआरच्या माध्यमातून बोगस बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी
"महाराष्ट्रातील निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर एसआयआरचे काम सुरू होत असून या माध्यमातून बोगस बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी होईल आणि मतदारयादीचे शुद्धीकरण होईल. मतदार यादी सुधारण्याचा आग्रह करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या अभियानाचे स्वागत करायला हवे. फक्त मराठी दुबार नावे उद्धव आणि राज यांच्या डोळ्यात खुपत होती."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....