आरोग्य विमा पॉलिसीतील ‘जोखीम घटक’

    09-Jan-2026   
Total Views |

Insurance

वाढत्या जनजागृतीमुळे हल्ली बहुतेकांकडे किमान एक तरी आरोग्य विमा पॉलिसी असते. परंतु, त्यातही फार कमीजणांना माहीत असावं की, पॉलिसीधारकाच्या जीवनशैलीतील सवयी, विशेषतः मद्यपान, धूम्रपान, व्यायामाचा अभाव या गोष्टी विमा कंपन्या ‘जोखीम घटक’ म्हणून पाहतात व अशा पॉलिसीधारकांना प्रीमियम जास्त आकारला जाऊ शकतो व दावा मंजूर होण्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात. तेव्हा, आजच्या लेखात अशाच काही आरोग्य विमा पॉलिसीतील जोखीम घटकांची माहिती करुन घेऊया.

आपल्या देशात सुमारे २९.२ टक्के पुरुष (वय १५ ते ४९) मद्यपान करतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण १.२ टक्के आहे. गोवा किंवा आणखीन काही राज्यांमध्ये पुरुषांमधील मद्यपानाचे प्रमाण ५० टक्यांहून अधिक आहे. मद्यामुळे फॅटी लिव्हर, सिरॉसिस, लिव्हर फेल्युअर असे यकृताचे आजार, पचनसंस्थेचे विकार आणि मधुमेह, हृदयविकार असे आजार होऊ शकतात. तसेच अपघाताची शक्यताही वाढते. मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. हे सर्व आजार विमा कंपन्यांच्या दृष्टीने उच्च जोखीम घटक( high risk factors ) म्हणून गणले जातात. अशा स्थितीतील पॉलिसीधारकांच्या विमा सुरक्षेवर मर्यादा घातल्या जातात. पॉलिसीधारक नियमितपणे किंवा मोठ्या प्रमाणात मद्यपान करीत असेल, तर विमा कंपनी जास्त प्रीमियम आकारू शकते. कारण, मद्यपींना उच्च रक्तदाब, स्ट्रोक, कर्करोग, पॅनक्रियाटायटिस आदी आजार होऊ शकतात. या आजारांवरील उपचार महाग असतात. त्यामुळे विमा कंपनीचा धोका वाढतो आणि त्यानुसार प्रीमियम वाढतो.

सर्व मद्यपान करणारे जोखीम जास्त असलेले नसतात. एखादी व्यक्ती अधूनमधून आणि मर्यादित प्रमाणात मद्यपान करीत असेल, तर अशांचे आरोग्य चांगलेही असू शकते. अशांना विमा कंपनी सामान्य जोखीम गटात समाविष्ट करते. लिव्हर फंशन टेस्ट, ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल तपासणी, बीएमआयब्लड शुगर लेव्हल या तपासण्या नियमित केल्यास, विमा कंपनीला तुमच्या आरोग्याची पूर्ण माहिती मिळते व अशांना विमा कंपनी ’responssible insured’ म्हणून ओळखते.

धूम्रपानामुळे दरवर्षी सुमारे साडेतेरा लाख लोक मृत्यू पावतात. धूम्रपान शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करते. त्वचा, नखांपासून ते विविध अवयव आणि अगदी ‘डीएनए’पर्यंत. २०२९ मध्ये धूम्रपान करणार्‍या व तंबाखू खाणार्‍यांचे मृत्यूचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या १७ टक्के इतके होते. आरोग्य विमा उतरविताना कंपनी तुमची वैयक्तिक माहिती आणि जीवनशैली तपासते. तसेच काही बाबींचे बारकाईने विश्लेषण करते. (अ) पॉलिसीधारकाचे वय आणि वैद्यकीय इतिहास (ब) धूम्रपान व मद्यपानाची सवय आहे का? (क) लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह आदी आजार (ड) यकृत आणि इतर तपासण्यांचे रिपोर्ट. या तपासणींत यकृत एन्झाईम्स असामान्य आढळले किंवा वैद्यकीय इतिहासात मद्यपानाशी संबंधित त्रास दिसला, तर कंपनी जोखीम वाढवून प्रीमियम ठरविते. अनेकदा अर्जदार आरोग्य विमा घेताना मद्यपानाबाबत माहिती देत नाहीत. पण असे करू नये. कारण, ‘विमा नियंत्रक संस्थे’नुसार, ग्राहकाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, तर विमा कंपनीला दावा नाकारण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे मद्यपान करीत असल्यास अर्जात ‘अधूनमधून मद्यपान करतो’ असे नमूद करावे. कंपनी ही माहिती तपासून योग्य जोखीम ठरविते आणि पारदर्शकतेमुळे भविष्यातील अडचणी टाळल्या जातात. एखादा अपघात मद्यपानाच्या स्थितीत झाला असेल, तर त्यासाठी आलेल्या हॉस्पिटलच्या खर्चाचा दावा विमा कंपनी नाकारू शकते. अल्कोहोल विषबाधेमुळे झालेला आजार, दीर्घकालीन मद्यपानामुळे झालेला लिव्हर सिरॉसिससारखा आजार अशा सर्व प्रकरणांना दावा मंजूर होण्याच्या शक्यता फार कमी असतात.

‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’च्या अहवालानुसार, मार्च २०२४ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात एकूण आरोग्य विमा दावे नाकारण्याचे प्रमाण ११ टक्के होते. एकूण २६ हजार कोटी रुपयांचे दावे नाकारले गेले. ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमा कंपन्यांना ग्राहकांचे जोखीम प्रोफायलिंग करताना वैद्यकीय तथ्यांवर आधारित निर्णय घ्यावा लागतो. ज्याला विमा काढायचा आहे, अशी व्यक्ती जर अधूनमधून मद्यपान करीत असेल आणि अशा व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या सर्वसामान्य असतील, तर मद्यपानाच्या कारणावरून विमा कंपनी अशांना विमा संरक्षण नाकारू शकत नाही. पण वैद्यकीय तपासणीत मद्यपानाशी संबंधित आजार दिसले, तर ‘इर्डा’च्या नियमांनुसार कंपनीला अधिक दराने प्रीमियम आकारण्याचा अधिकार आहे. नियमित धूम्रपान करणार्‍या किंवा अति मद्यपान करणार्‍यांना विमा कंपनी प्रीमियम नेहमीच्या प्रीमियमपेक्षा ३० ते ४० टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त आकारू शकते. तसेच पॉलिसीच्या ‘लॉजेस’मध्ये काही विशिष्ट अटी घालू शकते.

विम्याचा दावा नामंजूर होऊ नये, म्हणून मद्यपान केल्यावर वाहन चालवू नका. पुरेसे पाणी प्या. जेवणानंतर विश्रांती घ्या. दरवर्षी आरोग्य तपासणी करा. विमा पॉलिसी घेताना खरी माहिती द्या. नियमित व्यायाम करा व आहारावर नियंत्रण ठेवा. या सवयींनी आरोग्य चांगले राहते व आजारपणावर जास्त खर्च होत नाही. आज अनेक विमा कंपन्या ‘वेलनेस प्रोग्राम’ देतात. जसे, नियमित आरोग्य तपासणी, फिटनेस ट्रॅकिंग, योग किंवा मेडिटेशन यांसाठी सवलती. अशा उपक्रमांत सहभागी झाल्यास, विमा कंपन्या ग्राहकाला प्रीमियमवर सूट देतात किंवा ‘रिवॉर्ड पॉईंट’ देतात. पॉलिसीधारक जितका निरोगी, तितका त्याचा प्रीमियम कमी.

अमेरिका-भारत - एक आर्थिक तुलना

भारत आता अर्थव्यवस्थांच्या शर्यतीत जागतिक पातळीवर जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जर्मनीला मागे टाकून भारत येत्या काही वर्षांत नक्कीच तिसरा क्रमांक पटकावेल. चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या चार देशांत (आर्थिकदृष्ट्या बलवान) आशिया खंडातील दोन देश आहेत, भारत व चीन. युरोप खंडातील एक देश आहे, तो म्हणजे जर्मनी. पहिला क्रमांकावरचा अमेरिका व नुकताच चौथ्या क्रमाकांवर गेलेला भारत यांच्या आर्थिक व्यवहारांतील तुलनात्मक चित्र..

घटक

अमेरिका

भारत

निरीक्षण

जीडीपी (नॉमिनल, २०२४)

अंदाजे २८ लाख कोटी डॉलर

अंदाजे ४.१ लाख कोटी डॉलर

भारत नुकताच चौथ्या क्रमांकावर, पण वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

जीडीपी वाढीचा दर

२.३ टक्के

६.५ टक्के

भारताचा वेग सुमारे तिपटीने जास्त

राष्ट्रीय कर्ज (जीडीपी टक्के)

१२५ टक्के

८१ टक्के

अमेरिकेचे कर्ज गंभीर पातळीवर

वार्षिक वित्तीय तूट

७ टक्के जीडीपी

५.६ टक्के जीडीपी

भारत स्थैर्य राखतो

परकीय चलनसाठा

४५० अब्ज डॉलर

६५० अब्ज डॉलर

भारताने आर्थिक सुरक्षितता राखली

चलनाचा जागतिक वापर

डॉलर – राखीव चलन

रुपया – प्रादेशिक व्यापारात वाढता वापर

डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याची दिशा

लोकसंख्या

३४ कोटी

१४२ कोटी

भारत जगातील सर्वांत मोठा कार्यबल असलेला देश

तंत्रज्ञान आणि स्टार्टअप

प्रस्थापित, पण मंदावलेले

झपाट्याने वाढणारे, १००+ युनिकॉर्न

भारताचा नवोन्मेष वेगवान

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.