ग्रामीण भागात राहूनही केवळ निसर्गाच्या जोरावर अर्थार्जन करता येते, याचे उदाहरण प्रस्थापित करणारे पक्षीनिरीक्षक सचिन श्रीकृष्ण प्रभू यांच्याविषयी...
सचिन यांचा जन्म दि. २९ सप्टेंबर, १९९० साली सावंतवाडीमध्ये झाला. वडील सिंधुदुर्ग पोलीस दलात असल्यामुळे त्यांच्या बदलीनुसार प्रभू-कुटुंबीयांचा ठावठिकाणा असे. मूळ काळसे धामपूरचे असलेले प्रभू- कुटुंबीय अखेरीस ओरसमध्ये स्थायिक झाले, तेदेखील वडिलांची बदली मोठ्या काळासाठी ओरस गावात झाल्यामुळे. श्रीकृष्ण प्रभू यांनी ओरस गावात एक जमीन विकत घेतली आणि तिथेच एक घर बांधले. त्यांना स्वत:ला छायाचित्रणाचा छंद होता. या छंदापायी त्यांच्याकडे एक कॅमेरा होता. छायाचित्रे टिपण्यासाठी घराबाहेर पडल्यावर ते छोट्या सचिनला आपल्या सोबत घेऊन जात. यावेळी ते सचिनच्या हातातदेखील कॅमेरा टेकवून त्याला पक्ष्यांचे फोटो काढायला लावत. सचिन यांनी पहिला फोटो टिपला, तो मोराचा. याच प्रकारामुळे त्यांना सुरुवातीला छायाचित्रणाची आवड लागली. महाविद्यालयीन वयात त्यांनी बदलत्या काळासोबत कॅमेरादेखील अद्ययावत केला. पण, कॅमेर्यात टिपलेल्या असंख्य पक्ष्यांच्या छायाचित्रांचे करायचे काय? हा प्रश्न सचिन यांच्यासमोर होताच. या छायाचित्रांच्या प्रसिद्धीला एखादे माध्यम मिळावे म्हणून त्यांनी ‘फेसबुक’ची वाट निवडली. तिथे एक पेज तयार करून पक्ष्यांचे फोटो ते त्यावर टाकू लागले. तोपर्यंत त्यांना त्या पक्ष्यांचे नाव, रंग, रूप याचा काही गंध नव्हता. दुसरीकडे महाविद्यालयीन वयातच नोकरी करून आपल्या शिक्षणाचा खर्चही भागवत होते.
असेच एकदा घराच्या मागे छायाचित्रण करताना त्यांना ‘मिशीवाला गवती वटवट्या’ पक्षी दिसला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. समाजमाध्यमांवर पक्ष्यांची ओळख पटवणार्या एका गटामध्ये तो फोटो टाकून, त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्या गटामधील पक्षीनिरीक्षकांनी या पक्ष्याची ओळख ‘मिशीवाला गवती वटवट्या’ असल्याचे सांगून, तो दुर्मीळ असल्याचे सचिन यांना सांगितले. शिवाय, त्याला पाहण्याची इच्छा दर्शवली. एवढ्या छोट्या पक्ष्याला पाहण्यासाठी लोक मुंबई-पुण्यातून का येत आहेत, याची सचिन यांना कल्पना येत नव्हती. मुंबई-पुण्यातून पक्षीनिरीक्षक ओरसला पोहोचले. सचिनने घराच्या मागे नेऊन त्यांना तो पक्षीही दाखवला. जाताना त्या पक्षीनिरीक्षकांनी सचिन यांना हा पक्षी दाखवल्याबद्दल काही पैसे दिले. त्यावेळी सचिन यांना समजले की, अशाप्रकारे पक्षी दाखवून पैसेही मिळतात. या प्रकारानंतर सचिन पक्ष्यांकडे अधिक बारकाईने पाहू लागले. त्यातूनच पुन्हा ‘काळ्या पोटाचा सुरय’ पक्षी त्यांना दिसला.
त्याला पाहण्यासाठीदेखील लोक मुंबई-पुण्याहून आले आणि त्यांना पैसे देऊन गेले. मग पक्ष्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांनी स्वत:हून प्रयत्न करण्यास सुरुवात केली. यासाठी निरनिराळे अॅप, समाजमाध्यमांवरील गट, पुस्तकांचा आधार घेतला. तज्ज्ञ पक्षीअभ्यासक कशा पद्धतीने पक्ष्यांचे बारकावे टिपतात, याची माहिती करून घेतली. याचदरम्यान, सचिन यांची ओळख बांद्यातील प्रवीण सातोसकर या ‘नॅचरलिस्ट’सोबत झाली. प्रवीणदेखील पक्ष्यांचे दर्शन घडवून त्यातून अर्थार्जन करत होते. ते कोणत्या पद्धतीने हे काम करतात, पक्ष्यांच्या विणीच्या हंगामात ते कोणत्या पद्धती वापरून पक्ष्यांचे दर्शन घडवतात, याचे बारकावे त्यांनी समजून घेतले. पक्ष्यांच्या विणीच्या हंगामात त्यांच्या विणीतील बारकावे कॅमेर्यात टिपण्यासाठी पक्षी छायाचित्रकार उत्साही असतात. अशा काळात विणीच्या प्रक्रियेला त्रास न पोहोचवता लपनगृहाच्या माध्यमातून पक्ष्यांची छायाचित्रे टिपता येतात, हे सचिन यांना प्रवीण यांच्यामुळे समजले होते. त्यामुळे ओरसला घराच्या मागच्या परिसरात खंड्या किंवा राघू पक्ष्यांची घरटी आढळल्यावर त्यांनीदेखील पक्षी लपनगृह तयार केले. त्याठिकाणी पक्षी छायाचित्रकारांना आमंत्रित करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, त्यांच्या कौटुंबिक पातळीवर काही शोकांतिका घडल्या. ‘कोराना’च्या संसर्गामुळे त्यांचे आई-वडील काही दिवसांच्या फरकानेच दगावले. या धक्यातून धीराने बाहेर पडून त्यांनी यापुढे ‘नॅचरलिस्ट’ म्हणूनच काम करण्याचा निर्णय घेतला.
सचिन सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘नॅचरलिस्ट’ म्हणून काम करतात. पर्यटक, पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांना जिल्ह्याच्या पक्षी आणि वन्यजीव वैभवाचे दर्शन घडवून देतात. आजवर त्यांनी पक्ष्यांच्या ३५५ प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. ‘मिशीवाला गवती वटवट्या’ आणि ‘काळ्या पोटाचा सुरय’ या पक्ष्यांबरोबर ‘लांब चोचीची तिरचिमणी’, ‘मलिन बदक’, ‘भांडखोर पाणलावा’, ‘चतुरंग बदक’, ‘पिवळ्या पायाचा बटलावा’ अशा काही दुर्मीळ पक्ष्यांच्या जिल्ह्यातून नोंदी केल्या आहेत. नुकतीच त्यांनी ‘निळ्या दाढीवाल्या राघू’ पक्ष्याच्या पिलाच्या भिंत बांधण्याच्या वर्तनाची जगातून पहिल्यांदाच नोंदवलेले टिपण प्रकाशित झाले आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात केवळ नोकरीसाठी स्थलांतर करून येणार्या कोकणातील तरुणांसाठी सचिन एक आदर्श उदाहारण आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!