मुंबई : ( Patna Jewellers Ban Burqa, Niqab, Masks, Helmets in Shops for Security ) बिहारची राजधानी असणाऱ्या पाटणा शहरातील सराफ व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव ज्वेलरी शॉपमध्ये बुरखा, नकाब, मास्क किंवा हेल्मेट घालण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पाटण्यातील अनेक सराफ व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांसमोर बुरखा, नकाब, मास्क किंवा हेल्मेट घालून न येण्याच्या सूचना लावल्या आहेत.
'ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशन'चे बिहार अध्यक्ष अशोक कुमार वर्मा यांनी राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांसोबत बैठक घेतली. त्यात मास्क, हेल्मेट, बुरखा किंवा हिजाब परिधान केलेल्या कोणत्याही ग्राहकासोबत खरेदी विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी त्यांनी पाटण्याच्या केंद्रीय पोलिस अधीक्षकांना फोनवरून माहिती दिली आहे.
अशोक कुमार वर्मा म्हणाले की, दागिन्यांच्या दुकानातील बहुतेक ग्राहक या महिला आहेत. परंतु अनेक महिला बुरखा आणि नकाब घालून येतात, अनेकदा दुकानदाराचे लक्ष नसले तर चोरी होण्याची शक्यता असते. बुरखा असल्यामुळे चोर शोधायला पोलिसांना अडचणी येतात. त्यामुळे या महिलांबद्दल आदर बाळगून त्यांना तो दुकानात असेपर्यंत काढून टाकण्याची विनंती केली जाईल.
अशोक कुमार वर्मा यांनी स्पष्ट केले की, आम्ही महिलांचा आदर करतो, पण आम्ही विनंती करूनही त्यांनी बुरखा किंवा नकाब काढला नाही तर आम्ही त्यांच्यासोबत व्यवहार करणार नाही. सध्या सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीपी, मुख्य सचिव आणि गृह मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.