Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर भाजप-एमआयएमची युती संपुष्टात

    08-Jan-2026
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
अकोला : (Devendra Fadnavis) सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती ‌‘तत्त्वशून्य‌’ असल्याचे सांगत कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील भाजप-एमआयएम युती तुटली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप नेतृत्वाकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना ‌‘कारण दाखवा‌’ नोटीस बजावण्यात आली आहे. अकोटमध्ये एमआयएमला सोबत घेऊन ‌‘अकोट विकास मंच‌’ स्थापन करण्याच्या निर्णयात आघाडीवर असलेले भाजपचे आ. प्रकाश भारसाकळे आता पक्षाच्या रडारवर आले आहेत. (Devendra Fadnavis)
 
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रकाश भारसाखळे यांना बुधवार, दि. 7 जानेवारी रोजी पत्र पाठविले आहे. यात चव्हाण यांनी म्हटले आहे की, “नुकत्याच झालेल्या अकोट नगर परिषद निवडणुकीत आपण एमआयएमसोबत युती करून भारतीय जनता पक्षाच्या ध्येय-धोरणांना सुरुंग लावला आहे. कोणालाही विश्वासात न घेता केलेल्या या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा द्यावा.” याची प्रत अकोट मंडळ अध्यक्ष हरीश टावरी यांनाही पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेतृत्वाने या प्रयोगाबद्दल अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Devend Fadnavis:‘आपलं ठाणे, आपला देवाभाऊ’ 
 
एमआयएम आता विरोधी बाकावर
 
भाजपच्या दबावानंतर आणि राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. एमआयएमचे नगरसेवक आपला पाठिंबा काढण्याचे पत्र देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता एमआयएम अकोट नगरपालिकेत सत्ताधारी बाकावरून थेट विरोधी बाकावर बसणार आहे. (Devendra Fadnavis)
 
कसे होते सत्तेचे गणित?
 
अकोट नगरपालिकेत 35 पैकी 33 जागांचे निकाल जाहीर झाले होते. यात भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या होत्या; मात्र बहुमतासाठी त्यांना सात जागांची गरज होती. यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी ‌’अकोट विकास मंच‌’ स्थापन केला. यात चक्क एमआयएम (पाच जागा) आणि इतर पक्षांना (शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार) घेतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या विचित्र युतीची नोंदणीही झाली होती. त्यामुळे भाजपवर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली होती. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Palika Election 2026: "निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुशासनाचा संकल्प; मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून तयारीचा सविस्तर आढावा"  
 
स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्री संतापले
 
दरम्यान, अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्त्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत,” असे फडणवीस म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis)