'संस्कृत सर्वेषाम्‌'चा संकल्प : ठाण्यात गीताशिक्षकांचा अखिल भारतीय वर्ग संपन्न

    07-Jan-2026   
Total Views |
Sanskrit Bharati
 

मुंबई : ( Sanskrit Bharati Hosts All-India Gita Training Camp in Thane ) संस्कृत भारतीच्या गीताशिक्षण केंद्र शिक्षकांचा अखिल भारतीय वर्ग दि. २, ३, ४ जानेवारी रोजी श्रीराम व्यायामशाळा, ठाणे येथे संपन्न झाला. संस्कृत भारतीचे पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष सीए चंद्रशेखर वझे यांचे शुभहस्ते २ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता दीपप्रज्वलनाने या वर्गाचे उद्घाटन झाले. या वर्गात गीतेतील संधि, समास इ. व्याकरणाधारित विषय तसेच गीतेतील ज्ञानयोग, कर्मयोग, वेदांततत्त्वज्ञान इ. विषयांवर सत्रे घेण्यात आली.
 

गीताशिक्षण केंद्र हा संस्कृतभरतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. ‘गीतेच्या माध्यमातून संस्कृत व संस्कृतच्या माध्यमातून गीता’ हे या उपक्रमाचे ध्येयवाक्य आहे. संस्कृत भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायी आहे. या उपक्रमाचे चार भाग आहेत. यात भाषेतील सोपे प्रयोग, व्याकरण इथपासून प्रारंभ करून गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अन्वय, अर्थ संस्कृतातच करता येणे इथपर्यंत तयारी करून घेतली जाते. सध्या कोकण प्रांतात अशी २७ केंद्रे चालविण्यात येतात.
 

देशाच्या विविध प्रांतांत ही केंद्रे चालविणारे ८४ शिक्षक कार्यकर्ते या वर्गात सहभागी झाले होते. संस्कृत भारतीचे अखिल भारतीय गीताशिक्षण केंद्र प्रमुख शिरीष भेडसगांवकर, अ. भा. कार्यकारिणी सदस्य व साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखक डॉ. एच. आर. विश्वास यांनी या वर्गात विविध सत्रांत मार्गदर्शन केले. तसेच, नवी दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू व संस्कृत भरतीचे अ. भा. उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी तसेच पुणे येथील डेक्कन अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू व संस्कृत भारतीचे पश्चिम मध्य क्षेत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रसाद जोशी या मान्यवरांचे देखील मार्गदर्शन लाभले.
 


 
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे गीताविषयक व्याख्यानही ऐकविण्यात आले. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ पर्फॉर्मिंग आर्ट्स या संस्थेचे सहाय्यक निदेशक व संस्कृत रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करणारे प्रा. डॉ. प्रसाद भिडे यांनी महाकवी भास विरचित ‘कर्णभारम्’ या एकांकिकेचे रसास्वाद नाट्यरूपांतर अतिशय प्रभावीपणे सदर करत उपस्थितांची मने जिंकली. मा. विश्वासजी यांच्या प्रेरक भाषणाने या वर्गाचा समारोप झाला. या वर्गाच्या यशस्वितेसाठी ठाणे व परिसरातील संस्कृतभारती कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.
 

'संस्कृत सर्वेषाम्' हे ध्येय जपणारी व त्यासाठी सतत प्रयत्नशील असणारी संघटना म्हणजे ‘संस्कृतभारती.’ ज्या काळात भारत व भारतीयभाषा यांची प्रतिष्ठा कमी झाली होती; भारतीयत्व जागवणारी ज्ञानभाषा विस्मरणात जाऊ लागली होती, त्याकाळात कर्नाटकातील काही युवक एकत्र आले. संस्कृत ही भाषा पुनरुज्जीवित व्हावी, तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळावी, समाजातील कानाकोपऱ्यात पोहोचावी यासाठी अत्यंत परिश्रमाने काम करण्यास सुरवात केली.
 

ग्रंथातील, शास्त्रातील संस्कृत व्यवहारात आणण्यासाठी व्यवहारोपयोगी साधी सोपी वाक्यरचना शिकवणे व आत्मविश्वास निर्माण करणे हे ध्येय डोळ्यासमोर होते. त्यातूनच ‘संस्कृत संभाषण शिबिर’ ही संकल्पना आकार घेऊ लागली. त्यामध्ये प्रयोग व परिष्कार करत कालसुसंगत मांडणी करत सध्या दहा दिवसांचे रोज दोन तास संभाषण शिबिर घेतले जाते. हे शिबिर संस्कृत शिकण्याचे प्रवेशद्वार आहे. शिबिरात आलेल्यांसाठी पुढील शिक्षणाचे अनेक उपक्रम या संघटनेतर्फे आयोजित करण्यात येतात.
 


 
साप्ताहिक मिलन, साप्ताहिक वर्ग यासारखे उपक्रम आठवड्यातून एक तास चालतात. यामध्ये संभाषण बिंदू, भाषा कौशल्य यांचा अभ्यास केला जातो. लहान मुलांसाठी देववाणी व बालकेंद्र हे उपक्रम आहेत. समाजातील सर्व मंडळींची स्तोत्राची आवड व उत्सुकता जपण्यासाठी ‘श्लोकपठणकेंद्र’ आहे. प्रत्यक्ष सहभाग न घेता येणाऱ्यांसाठी ‘पत्रद्वारासंस्कृत’ ही योजना राबवली जाते.
 

‘भगवद्गीता’ हा तर भारतीय संस्कृतीचा श्वासच. ही गीता आपल्या मूळ भाषेतून यथार्थ कळावी, यासाठी ‘गीताद्वारा संस्कृत व संस्कृतद्वारा गीता’ म्हणजेच गीताशिक्षण केंद्रे चालवली जातात. हे सर्व उपक्रम चालवणारे शिक्षक प्रशिक्षित असतात. यासाठी भाषाबोधनवर्ग, प्रबोधानवर्ग, शिबिराचालकप्रशिक्षणवर्ग व प्रगतप्रशिक्षणवर्ग असे टप्पे आहेत. सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन काही विचार व्हावा म्हणून संमेलने आयोजित करण्यात येतात. संपूर्ण भारतात हे काम आहेच, भारताबाहेर २३ देशात हे काम उत्तमरीतीने चालू आहे.
 

हे काम अत्यंत सुसूत्रपणे विशिष्ट रचनेद्वारे चालवले जाते. प्रत्येक कामाचे विभाजन व कार्यान्वयन केले जाते. १९८१ ला सुरु झालेला हा प्रवास प्रथम आंदोलन स्वरुपात होता. या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व उपक्रम निशुल्क चालवले जातात. शिक्षक कोणतेही मानधन घेत नाहीत. समाजाप्रती असलेले ॠण फेडण्यासाठी आपले स्वल्प योगदान असावे ही भूमिका सर्व कार्यकर्त्यांची असते. या प्रवाहात समाजातील सर्व घटक जोडले जावेत, एका प्रवाहात यावेत, भारतीय म्हणून प्रत्येकाचे अत्मभान जागृत व्हावे यासाठी हा प्रयत्न आहे.
 


 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक