आंतरराष्‍ट्रीय पटलावर फडकला सिग्‍नल शाळेचा झेंडा

    06-Jan-2026
Total Views |

ठाणे : गेली एक दशक स्‍थलांतरीत, शाळाबाह्य, प्रमाण भाषा अवगत नसलेल्‍या मुलांना गुणवत्‍तापुर्ण शिक्षणाच्‍या वाटा खुल्‍या करणा-या सिग्‍नल शाळेच्‍या प्रयोगाचा आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपीठावर सन्‍मान झाला. श्रीलंकेत पार पडलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय शिक्षण परिषदेत सिग्‍नल शाळेच्‍या प्रयोगावर आधारित प्रबंध सादर झाला. सिग्‍नल शाळेच्‍या प्रयोगाच्‍या सादरीकरणाने भारतीय खंडातील शिक्षणातील प्रयोगशिलता अधोरेखीत झाली. परिषदेत सिग्‍नल शाळेच्‍या प्रबंध मांडतांना तिरंगा झळकला आणि या तिरंग्‍याच्‍या साक्षीने जणू आंतरराष्‍ट्रीय पटलावर सिग्‍नल शाळेचा झेंडा फडकला.

जगभरातील शिक्षण क्षेत्रातील पथदर्शी प्रयोगांवर आधारित शिक्षण परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. यंदाची शिक्षण परिषद श्रीलंकेत संपन्‍न झाली. स्‍थलांतरीत, शाळाबाह्य, प्रमाणभाषा अवगत नसलेल्‍या मुलांना शिक्षणाच्‍या मुळ प्रवाहात आणण्‍यासाठी समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महानगरपालिकेच्‍या संयुक्‍त विदयमाने १० वर्षांपुर्वी सुरू झालेल्‍या सिग्‍नल शाळेची निवड सादरीकरणासाठी झाली होती. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्‍या या परिषदेत विविध देशातील पथदर्शी प्रयोगांचे सादरीकरण झाले. सिग्‍नल शाळेच्‍या प्रकल्‍प प्रमुख आरती परब यांनी सिग्‍नल शाळेवरील प्रबंध सादर केला. तसेच दहा वर्षे सिग्‍नल शाळेत अवलंबलेल्‍या प्रयोगशिल शिक्षणावर आधारित पुस्‍तकाचे प्रकाशन देखील या परिषदेत करण्‍यात आले.

स्‍थलांतर व शाळा बाह्य मुलांचे शिक्षण ही एक आंतरराष्‍ट्रीय समस्‍या आहे. जगाच्‍या सर्वांगिण कल्‍याणासाठी सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळायला हवी यासाठी शिक्षण क्षेत्राने त्‍यांच्‍या चौकटी मोडून शाळेपर्यंत मुले नाही तर मुलांपर्यंत शाळा पोहचवायला हवी. समग्र शिक्षणासाठी लवचिक व प्रयोगशिल शैक्षणिक धोरणाचा जगाने अवलंब करायला हवा. परिषदेत सादर झालेले विविध प्रबंध हे त्‍या त्‍या प्रातांपुरते मर्यादित न राहता त्‍यांचा जगभरातील गरजवंतांसाठी उपयोग व्‍हायला हवा. यासाठी विश्‍वातील शिक्षणयोगींनी एकत्र येऊन अंतोदयासाठीचा यज्ञ आपापल्‍या प्रयोगशिल शिक्षणाच्‍या आहुत्‍या देवुन प्रज्‍वलीत करायला हवा असे आवाहन आरती परब यांनी यावेळी आपल्‍या प्रबंध सादरीकरणाच्‍या वेळी केले.