मुंबईतील वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे सामाजिक संकटांचा धोका

"आयआयपीएस’चे माजी संचालक डॉ. एस. के. सिंह यांच्याकडून चिंता व्यक्त

Total Views |
Dr. S. K. Singh
 
मुंबई : ( Mumbai Illegal Immigration: Dr. S. K. Singh ) भारताशेजारील तीन देशांमधून देशात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे दोन्ही घोर संकटात सापडले आहेत, असे मत 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज’चे माजी संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी व्यक्त केले. वांद्रे हिंदू असोसिएशनच्या सभागृहात ‘मुंबईतील अवैध स्थलांतर’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. यावेळी सिंह बोलत होते.
 
ते म्हणाले की, भारतात विकास होत असतानाच बेकायदा स्थलांतरेही होत आहेत. सध्या भारतात बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार या तीन शेजारी देशांमधून असंख्य घुसखोर घुसत आहेत. या घुसखोरांमुळे देशाच्या आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या विकासयात्रेला खीळ बसत आहे. एका बाजूला पैशासाठी घुसखोरांना प्रवेश देणाऱ्या यंत्रणा आणि दुसरीकडे विशिष्ट समुदायाच्या लोकांना भारतात वसविण्याची काही राजकीय शक्तींची धडपड, या दुहेरी पेचाचे विस्तृत विवेचन डॉ. सिंह यांनी यावेळी केले.
 
हे वाचलत का? - Manipur Akashvani : मणिपूर आकाशवाणीवरुन घुमणार पुन्हा थाडौ भाषेचे बोल!
  
घुसखोरी केल्यानंतर आधी ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये तळ टाकायचा आणि नंतर आधीच घुसखोरी केलेल्या घुसखोरांच्या मदतीने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद अशा महानगरांमध्ये बस्तान बसवायचे, अशी या घुसखोरांची पद्धत असते. या पद्धतीचे विवरण करून त्यांनी हे घुसखोर त्या त्या शहरातील राजकीय लोकांना हाताशी धरून सोयीसुविधा पदरात पाडून घेतात, असे निदर्शनास आणून दिले.
 
ते पुढे म्हणाले की, या लोकांना मदत करण्यात अनेकदा स्थानिक नगरसेवक, स्थानिक नेते आणि पुढारी पुढे असतात. पैशाच्या लोभापायी या घुसखोरांना आश्रय आणि मदत केली जाते. या घुसखोरांचा मोठा धोका म्हणजे यातलेच काही अवैध धंदे, अमली पदार्थांचा व्यापार, दहशतवाद आणि इतर जिहादी कारवाया यांच्यात गुंतलेले असतात. अशा धोकादायक घुसखोरीमुळे देशातल्या प्रत्येक राज्यातल्या काही भागांमधील लोकसंख्या कशी बदलत आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. वांद्रे हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष अजित मनियाल यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
 
हेही वाचा : Hidayatullah Patel: काँग्रेस नेते हिदायतुल्लाह पटेल यांची मशिदीत हत्या
 
घुसखोरांमुळे बिघडणारे सामाजिक वातावरण, लव्ह जिहादच्या घटना, निवडणुकांमधील जिहादी प्रभाव, धोरणांचे ध्रुवीकरण आदी मुद्देही यावेळी चर्चेत मांडण्यात आले. सरकारी धोरण किंवा योजनांना सामूहिक विरोध करण्याची घुसखोरांची पद्धत कशी असते, यावरही डॉ. सिंह यांनी विवेचन केले. तसेच घुसखोर स्थानिक रोजगारावर गदा आणतात. आधी कमी पैशात सेवा देतात. सध्या मुंबईतले अनेक ठेले तसेच घरपोच सेवा देणाऱ्या पोर्टल्समध्ये बेकायदा घुसखोरांचे प्रमाण चिंता करण्याइतके वाढल्याचे डॉ. सिंह यांनी दाखवून दिले.
 
गलगुट विद्यापीठातील सहायक प्राध्यापक सौविक मोंडल यांनीही विस्तृत आकडेवारी सादर करून घुसखोरीचे वाढते प्रमाण आणि तिचे विविध क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम यांचे सादरीकरण केले.
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.