Manipur Akashvani : मणिपूर आकाशवाणीवरुन घुमणार पुन्हा थाडौ भाषेचे बोल!

    07-Jan-2026
Total Views |
Manipur Akashvani
 
इंफाळ : (Manipur Akashvani) मणिपूरमधील सामाजिक सलोखा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, देशातील सार्वजनिक प्रसारण संस्था असलेल्या प्रसार भारतीने थाडौ भाषेतील रेडिओ प्रसारण पुन्हा सुरू करण्याबाबत विचार सुरु केला आहे. आकाशवाणीच्या इंफाळ केंद्रावर थाडौ भाषेतील थेट कार्यक्रम पुनरुज्जीवित करण्यासाठी, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Manipur Akashvani)
 
मणिपूरमध्ये मे 2023 पासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, थाडौ भाषेतील कार्यक्रमांना स्थगित करण्यात आले होते. त्या कालावधीत केवळ पूर्वमुद्रित गाणी आणि कार्यक्रम यांचेच प्रसारण केले जात असे. या निर्णयामुळे समाजात अस्वस्थताही निर्माण झाली होती. त्यानंतर मणिपूरच्या थाडौ इन्पी या संस्थेने प्रसार भारतीकडे अधिकृत निवेदन सादर करत, थाडौ भाषेतील थेट प्रसारण पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. (Manipur Akashvani)
 
हेही वाचा : Hidayatullah Patel: काँग्रेस नेते हिदायतुल्लाह पटेल यांची मशिदीत हत्या 
 
या निवेदनाची दखल घेत त्दखल घेत प्रसार भारतीने आकाशवाणीच्या इंफाळ केंद्राच्या कार्यक्रम विभागाला आवश्यक प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. सध्या थाडौ भाषेतील कार्यक्रम रोज संध्याकाळी ठरावीक वेळेत मर्यादित स्वरूपात प्रसारित केले जात असून, थेट प्रसारण सुरू झाल्यानंतर त्याचा कालावधी आणि स्वरूप अधिक व्यापक केले जाण्याची शक्यता आहे. (Manipur Akashvani)
 
थाडौ समाजाच्या दृष्टीने हा निर्णय केवळ प्रसारणापुरता मर्यादित नसून, त्यांच्या भाषा, सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक अस्तित्वाच्या मान्यतेशी निगडित असल्याचे मानले जात आहे. थाडौ भाषेला स्वतंत्र भाषिक ओळख मिळावी आणि तिला इतर समुदायांमध्ये चुकीच्या पद्धतीने वगकृत केले जाऊ नये, ही मागणी दीर्घकाळापासून सुरू आहे. प्रसार भारतीचा हा निर्णय मणिपूरमधील तणावग्रस्त सामाजिक वातावरणात संवाद, विश्वास आणि सांस्कृतिक सहअस्तित्व बळकट करण्याच्या दिशेने एक सकारात्मक संकेत मानला जात आहे. (Manipur Akashvani)