इंडिया एनर्जी वीक 2026 चे गोव्यात 27–30 जानेवारीदरम्यान आयोजन

Total Views |
India Energy Week 2026
 
पणजी : ( India Energy Week 2026 ) जागतिक ऊर्जा क्षेत्रातील घडामोडींवर सखोल चर्चा घडवून आणणारा इंडिया एनर्जी वीक (IEW) २०२६ हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दि. २७ ते दि. ३० जानेवारी २०२६ दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. ऊर्जा सुरक्षा, गुंतवणूक आणि निष्कार्बनीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, धोरणकर्ते, वित्तीय संस्था, शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.
 
वर्षातील पहिली मोठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषद म्हणून IEW 2026 कडे पाहिले जात आहे. वाढती ऊर्जा मागणी, भू-राजकीय अनिश्चितता आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद संवाद व सहकार्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. मागील आवृत्तीला १२० हून अधिक देशांतील ६८ हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी, ५७० प्रदर्शक आणि ५४० जागतिक वक्ते सहभागी झाले होते. यंदा हा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे.
 
हेही वाचा : जेएनपीएची हरित इंधन, स्वयंचलन आणि शाश्वततेकडे वाटचाल
 
भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिपत्याखाली, FIPI आणि DMG इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. भारताच्या सुधारणा-आधारित ऊर्जा धोरणावर, स्वच्छ ऊर्जा संक्रमण, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम, हरित हायड्रोजन, जैवइंधन आणि कमी-कार्बन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत मंत्र्यांच्या गोलमेज बैठकांपासून ते सीईओ संवाद, सार्वजनिक-खाजगी क्षेत्र चर्चा, तंत्रज्ञान सादरीकरणे आणि भव्य प्रदर्शनाचा समावेश असेल. जागतिक ऊर्जा संवादात भारताची भूमिका अधोरेखित करणारा हा मंच ठरणार आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.