मुंबई :( JNPA ) भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) हरित उपक्रम, शाश्वतता आणि भविष्यातील बंदर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मंगळवारी भागधारकांची उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. या बैठकीत कंटेनर टर्मिनल ऑपरेटर, आघाडीच्या शिपिंग लाईन्स आणि प्रमुख भागधारक सहभागी झाले होते.
बदलत्या जागतिक शिपिंग ट्रेंड्स, ऊर्जा संक्रमण आणि पर्यावरणीय जबाबदारी या पार्श्वभूमीवर जेएनपीएच्या भावी वाटचालीवर सखोल चर्चा झाली. विशेषतः एलएनजी, मेथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, अमोनिया यांसारख्या स्वच्छ व पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या जहाजांची वाढती आवक, तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची तयारी आणि दीर्घकालीन नियोजन यावर बैठकीत भर देण्यात आला.
जेएनपीए संपूर्णपणे हरित ऊर्जेवर आधारित बंदर संचालनाकडे वाटचाल करत असून, धक्का (व्हार्फ), यार्ड, गेट आणि रेल्वे ऑपरेशन्समध्ये स्वयंचलन वाढवण्यावरही चर्चा झाली. यासोबतच जहाजांसाठी किनारी वीजपुरवठा (शोर पॉवर सप्लाय) देण्याच्या प्रायोगिक प्रकल्पावर भागधारकांनी तांत्रिक सुसंगतता आणि भविष्यातील विस्ताराच्या शक्यतांवर मते मांडली.
कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टानुसार, यार्ड क्रेन्स आणि अंतर्गत वाहतूक वाहने विद्युत स्वरूपात रूपांतरित करण्याच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. २०२६ अखेरीस टर्मिनल अंतर्गत वाहतूक प्रणालीचे पूर्ण विद्युतीकरण साध्य करण्याचा निर्धार या चर्चेत अधोरेखित झाला.
बैठकीला संबोधित करताना जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल म्हणाले, “शाश्वतता, स्वच्छ ऊर्जा आणि स्वयंचलन या जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत राहण्यासाठी जेएनपीए कटिबद्ध आहे. भागधारकांशी सातत्यपूर्ण संवादामुळे बंदर भविष्यासाठी अधिक सक्षम आणि पर्यावरणदृष्ट्या जबाबदार बनत आहे.”
भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन जहाज दुरुस्ती, ड्रेजिंग, जमिनीवरील संभाव्य प्रकल्प तसेच रस्ते व रेल्वे जोडणी मजबूत करण्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. हरित, स्मार्ट आणि जागतिक दर्जाचे बंदर उभारण्याच्या दिशेने जेएनपीएची ही बैठक निर्णायक ठरली.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.