मुंबई : ( Devendra Fadnavis ) मुंबईतील शंभर वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्य मराठी माणसाचा आधार असलेल्या बीडीडी चाळींना अखेर पुनर्विकासाच्या माध्यमातून नवे आयुष्य मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागल्याने बीडीडी चाळवासीयांनी उघडपणे देवाभाऊंचे आभार मानले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असताना, प्रत्यक्ष लाभार्थी असलेल्या चाळवासीयांनीच हा खोटा श्रेयवाद फेटाळून लावत ठाकरेंना आरसा दाखवला आहे.
ब्रिटिश काळात १९२१ ते १९२५ या कालावधीत उभारलेल्या बीडीडी चाळी अनेक दशकांपासून जर्जर अवस्थेत होत्या. अपुऱ्या सोयीसुविधा, घरांची पडझड, अरुंद खोल्या आणि वाढत्या कुटुंबांमुळे रहिवाशांचे जीवन अत्यंत कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर १९९९ मध्ये पहिल्यांदा पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला, मात्र प्रशासकीय अडथळे आणि राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प वर्षानुवर्षे फक्त कागदावरच राहिला.
२०१४ नंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर बीडीडी चाळ पुनर्विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १७ मार्च २०१६ रोजी मंत्रिमंडळाने जुने सर्व निर्णय रद्द करून नव्याने धोरणात्मक निर्णय घेतला आणि दि. ३० मार्च २०१६ रोजी त्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दि. २२ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे सपशेल पाठ फिरविली.
या निर्णयांची फलश्रुती म्हणून १४ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शंभर वर्षांनंतर चाळीत राहणाऱ्या कुटुंबांना ५०० चौरस फुटांची प्रशस्त घरे, तीही कायमस्वरूपी मालकी हक्कावर मिळाल्याने रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. याही वेळी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना सरकारी स्तरावर आमंत्रण असूनही त्यांनी मराठी माणसाच्या या आनंदाच्या दिवसावर अनुपस्थिती राहून आपल्याच मतदारांच्या आनंदावर विरजण टाकले.
वरळी बीडीडी चाळ वासियांना या प्रकल्पात केवळ घरेच नव्हे, तर शाळा, रुग्णालये, बाजारपेठा, उद्याने, खेळाची मैदाने आणि आधुनिक नागरी सुविधा असलेली सुसज्ज वसाहत उभारली जात आहेत. विशेष म्हणजे बीडीडी चाळीतील पोलिस कर्मचाऱ्यांनाही केवळ १५ लाख रुपयांत हक्काची घरे मिळणार आहेत. म्हणूनच, “फक्त घोषणा नव्हे, तर प्रत्यक्षात घर देणारे नेतृत्व महत्त्वाचे” असा स्पष्ट संदेश देत बीडीडी चाळवासीयांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय श्रेयवादाला उत्तर देताना, बीडीडी चाळवासीयांनी विकासाच्या कामालाच खरी पावती दिली आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.