मुंबई : ( Supreme Court Denies Bail to Umar Khalid ) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिला. मात्र, इतर याच दंगलीतील इतर पाच आरोपींचा काही अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उमर खालिद आणि शरजील इमाम या प्रकरणात इथून पुढे एक वर्ष जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत.
दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद, शरजील इमाम, गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शादाब अहमद हे गेल्या पाच वर्षापासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणात बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी आरोपींनी अनेकदा जामीनाची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दरवेळी सुरक्षेच्या कारणास्तव आणि गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे जामीन नाकारला होता. यावेळी पाच आरोपींना अटींसह जामीन मंजूर केला तर उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिला.
सुप्रीम कोर्टात खटला दाखल होण्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते की, या प्रकरणात शरजील आणि उमर यांची भूमिका गंभीर दिसत आहे. त्यांच्यावर जातीय आधारावर भडकाऊ भाषणे देऊन जमावाला भडकावल्याचाही आरोप आहे. यावेळी दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, दोघेही दिल्लीत दंगल भडकवणारे मुख्य सूत्रधार होते.
२०१९ मध्ये केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) मंजूर केला. या कायद्याविरोधात २३ ते २६ फेब्रुवारी २०२० या काळात उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर हिंसा उसळली. या दंगलींमध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याप्रकरणात उमर खालिद याला दंगल घडवून आणल्याच्या आरोपाखाली UAPA बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. त्याप्रकरणात आतापर्यंत एकूण सात वेळा उमर खालिदचा जामीन नाकारण्यात आला आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.