S. D. Phadnis : ज्ञाती कुलसंमेलने म्हणजे कुटुंबाचीच विस्तारीत संकल्पना; ज्येष्ठ हास्य- व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे प्रतिपादन
05-Jan-2026
Total Views |
पुणे : (S. D. Phadnis) ज्ञातींची होणारी कुलसंमेलने म्हणजे कुटुंबाचीच विस्तारित संकल्पना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हास्य -व्यंगचित्रकार शि.द. फडणीस (मूळचे चित्पावन शांडिल्य-आडनाव जोशी) यांनी रविवारी चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेहसंमेलन येथे केले. (S. D. Phadnis)
महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानने सुपर्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ४० व्या चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेसंमेलनात ते बोलत होते. भूगर्भशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी मिळविलेले प्रा. संशोधक डॉ. मुकुंद जोशी संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष न.म. जोशी, उपाध्यक्ष वसंत जोशी आणि प्रतिष्ठानचे अन्य पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मुकुंद जोशी, न.म. जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार फडणीस यांना प्रदान करण्यात आला. (S. D. Phadnis)
शि. द. फडणीस (वय वर्षे १०१) यांच्यासह महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष प. क. जोशी (वय वर्षे ९७), रणजी, दुलिप व इराणी ट्रॉफी माजी क्रिकेटपटू, शिल्पकार,चित्रकार चंद्रशेखर गणेश जोशी (वय वर्षे ९५) यांना 'कुलभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ११ हजार १११ रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. (S. D. Phadnis)
महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानतर्फे काही वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी कुलवृत्तांतच्या कामात मी थोडीफार मदत केली होती, असे सांगून फडणीस म्हणाले कुटुंब संकल्पना जतन करायलाच हवी. सध्याच्या परिस्थितीत त्याची संपूर्ण समाजाला आणि सर्व कुटुंबांनाही त्याची आवश्यकता आहे. प.क. जोशी यांनी चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी कुलवृत्तान्तचे काम, आजवरच्या संमेलनांच्या झालेल्या पाच महिला अध्यक्ष, महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान याविषयी माहिती देऊन प्रतिष्ठानला एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. चंद्रशेखर गणेश जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. (S. D. Phadnis)
शतायुषी मार्गावर वाटचाल करणार न.म. जोशी, वसंत चिंतामणी जोशी, विष्णुपंत अनंत जोशी, प्रभाकर विष्णू जोशी यांनाही यावेळी 'कुलगौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले. विष्णुपंत अनंत जोशींच्यावतीने त्यांच्या कन्या व सूनबाईने पुरस्कार स्वीकारला तर प्रभाकर विष्णू जोशी यांच्यावतीने त्यांचे पुतणे, संमेलनाध्यक्ष मुकुंद जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. (S. D. Phadnis)
अध्यक्षीय भाषणात डॉ. मुकुंद जोशी म्हणाले, विद्यार्थी असताना ज्या चंद्रशेखर गणेश जोशी यांचा क्रिकेटचा खेळ पाहिला त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष न. म. जोशी म्हणाले, विशाल कुलाचा प्रमाणित आनंदोत्सव म्हणजे आपले आजचे स्नेसंमेलन आहे. माजी खासदार जगन्नाथराव जोशी यांनी, काटकसरी, बुद्धिवादी आणि स्पष्टवक्ता अशी चित्पावन ब्राह्मणांची वैशिष्ठ्ये, गुण सांगितले होते. याचा अतिरेक झाला की चित्पावनांचे हे गुण अनुक्रमे कंजूष, तर्कवादी आणि फटकळपणाकडे झुकतात. हा अतिरेकीपणा आपण कमी केला पाहिजे. न. म. जोशी यांनीही प्रतिष्ठानला एक लाख रुपयांचा धनादेश देणगी म्हणून दिला. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांना 'सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता' पुरस्कार देण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली. आयुष्यात आपला प्रवास मी,आम्ही आणि आपण असा असला पाहिजे. सर्व कुलबंधू भगिनींनी याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. (S. D. Phadnis)
संमेलनाची सुरुवात कुलदेवता, कुलदेवी पूजन आणि आरतीने झाली. त्यानंतर अविनाश जोशी यांनी उद्योग व्यवसाय, अनिरुद्ध जोशी यांनी 'नाडी तरंगिणी'- नाडी तपासणीवरील संशोधन व यंत्राची तर विलास जोशी यांनी कुलवृत्तान्त कसा पाहावा याची थोडक्यात माहिती दिली. प्रतिष्ठानच्या 'वाटचाल' अंकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. सुचेता जोशी -अभ्यंकर, प्राजक्ता जोशी-रानडे यांनी सादर केलेली मराठी गाणी, चित्पावन शांडिल्य जोशी युवा प्रतिनिधींचे मनोगत, माहेरवाशिणींचा सत्कार इत्यादी कार्यक्रमही यावेळी झाले. या स्नेहसंमेलनासाठी चारशे कुलबंधू भगिनी संमेलनास उपस्थित होते. (S. D. Phadnis)