BMC Election 2026: स्वच्छ हवा ही नागरिकांची मूलभूत गरज; महापालिका निवडणुकीत प्रदूषणमुक्त मुंबईचा मुद्दा ऐरणीवर

    05-Jan-2026
Total Views |
 
BMC Election 2026
 
मुंबई : (BMC Election 2026) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढते वायू प्रदूषण आणि ढासळत चाललेली हवा गुणवत्ता हा गंभीर मुद्दा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत मिशन ग्रीन मुंबई या संस्थेने उमेदवारांसमोर स्वच्छ हवा आणि पर्यावरणपूरक विकासाचा अजेंडा मांडत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवण्याची मागणी केली आहे. स्वच्छ हवा हा कोणताही विशेषाधिकार नसून प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आणि हक्क असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. (BMC Election 2026)
 
संस्थेच्या स्वयंसेवकांनी महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना पाठवलेल्या निवेदनात मुंबई सध्या निर्णायक टप्प्यावर उभी असल्याचे नमूद केले आहे. शहराचा विकास करताना पर्यावरणीय आरोग्य, सार्वजनिक आरोग्य आणि शहरी पायाभूत सुविधा यांचा समतोल राखणे अत्यावश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवडून आल्यानंतर स्वच्छ हवा, हवामान बदलासंबंधी उपाययोजना आणि हरित पायाभूत सुविधा या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन या पत्रातून उमेदवारांना करण्यात आले आहे. (BMC Election 2026)
 
हेही वाचा :  Mumbai Railway : मुंबई रेल्वे प्रवाशांचे ‘अवेंजर्स’; राजकारणाविना प्रवाशांच्या प्रश्नांवर थेट संवाद
 
मिशन ग्रीन मुंबई चे संस्थापक सुभाजित मुखर्जी यांनी सांगितले की, मुंबईतील वाढते वायू प्रदूषण थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेले रुग्ण यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. आज घेतले जाणारे पर्यावरणविषयक निर्णय उद्याच्या मुंबईची राहण्यायोग्यता ठरवणार असल्याने अल्पकालीन राजकीय फायद्यांऐवजी दीर्घकालीन, शाश्वत आणि हवामान-सक्षम विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (BMC Election 2026)
 
संस्थेने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. त्यात बांधकामे, वाहतूक आणि उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर कठोर नियंत्रण, प्रत्यक्ष वेळेत हवा गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणांचा विस्तार, प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती, मोठ्या प्रमाणात स्थानिक वृक्षलागवड करून त्यांचे संरक्षण, मँग्रोव्ह आणि दलदलीसारख्या नैसर्गिक परिसंस्थांचे जतन, पावसाचे पाणी साठवण्याची सक्ती, नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन तसेच कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग यांचा समावेश आहे. (BMC Election 2026)
 
पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, महापालिका निवडणूक ही केवळ राजकीय सत्तेसाठी नसून मुंबईच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वच्छ हवा, आरोग्य आणि शाश्वत विकास हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवूनच मतदान झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (BMC Election 2026)
 
हेही वाचा : महाराष्ट्र सरकार आणि अबू धाबी पोर्ट्स कराराला गती 
 
असे आहेत मुद्दे
 
- स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
 
- बांधकामे, वाहतूक व उद्योगांतील प्रदूषणावर कडक नियंत्रण हवे.
 
- शहरभर हवा गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणांचा (AQI) विस्तार करावा.
 
- प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम नागरिकांना समजावून सांगावेत.
 
- स्थानिक झाडांची लागवड व विद्यमान हिरवळीचे संरक्षण आवश्यक आहे.
 
- मँग्रोव्ह, दलदली व उघड्या जागांचे संवर्धन करावे.
 
- पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था सर्व इमारतींना बंधनकारक करावी.
 
- कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण व ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करावे.
 
- बांधकामस्थळी धूळ नियंत्रणाचे उपाय प्रभावीपणे राबवावेत.
 
- स्वच्छ वातावरणातून नागरिकांचे आरोग्य जपले जावे.