Mumbai Railway : मुंबई रेल्वे प्रवाशांचे ‘अवेंजर्स’; राजकारणाविना प्रवाशांच्या प्रश्नांवर थेट संवाद

Total Views |
 Mumbai Railway
 
मुंबई : (Mumbai Railway) मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितता, सोयी आणि सर्वांगीण सुधारणांसाठी गेली दोन ते तीन दशके सातत्याने काम करणाऱ्या ज्येष्ठ प्रवासी कार्यकर्त्यांचा अनौपचारिक, अराजकीय संवाद सत्र दादर (पश्चिम) येथे पार पडला. “मुंबई रेल्वे प्रवाशांचे अवेंजर्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संवादात ज्येष्ठ प्रवासी नेते, वाहतूक तज्ज्ञ आणि नागरिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. हा कोणताही औपचारिक कार्यक्रम किंवा राजकीय पक्षाशी संलग्न उपक्रम नसून, पूर्णपणे नागरिकांच्या पुढाकारातून झालेला अनुभवाधारित संवाद होता. (Mumbai Railway)
 
या संवादात सहभागी कार्यकर्त्यांनी मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील बदल, संघर्ष, यश आणि भविष्यासाठीच्या व्यवहार्य सूचनांवर मोकळेपणाने चर्चा केली. प्रवासी-केंद्रित धोरणे, सार्वजनिक हित आणि सुरक्षिततेचा दृष्टिकोन हा या चर्चेचा केंद्रबिंदू होता. (Mumbai Railway)
 
मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी अपघातांबाबत प्रशासनाकडे दाद मागितली असता निधीअभावी कामे रखडत असल्याचे उत्तर मिळायचे. मात्र प्रवासी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे एमयूटीपी प्रकल्पांना गती मिळाली. कुर्ला–ठाणे दरम्यान अतिरिक्त उपनगरीय मार्ग आणि सीएसएमटी–कुर्ला विभागाचे चौपदरीकरण यामुळे क्षमतेत वाढ, वेळपालन आणि सुरक्षिततेत मोठी सुधारणा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Railway)
 
हेही वाचा : कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना; ‘SHEBOX पोर्टल’वर नोंदणी करण्याचे आवाहन
 
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम रेल्वेवरील बदलांचा उल्लेख करत सांगितले की, "केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयामुळे मेट्रो व वाहतूक पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला. अंधेरी–विरार अतिरिक्त मार्ग आणि स्थानकांच्या आधुनिकीकरणामुळे प्रवास अधिक विश्वासार्ह झाला आहे". (Mumbai Railway)
 
महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत वंदना सोनावणे यांनी महिला डब्यांतील पोलिस बंदोबस्त, प्लॅटफॉर्मवरील तैनाती आणि सीसीटीव्ही जाळ्यामुळे सुरक्षिततेची भावना वाढल्याचे सांगितले. “मेरी सहेली” उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळते, असेही त्यांनी नमूद केले. वाहतूक तज्ज्ञ सिद्धेश देसाई यांनी सोशल-मीडिया आधारित तक्रार निवारण प्रणालीमुळे अनेक एसओएस तक्रारींवर ३० मिनिटांत प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. (Mumbai Railway)
 
ठाणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी प्रशासनाच्या प्रतिसादक्षमतेत झालेला बदल आणि स्वच्छतेतील सुधारणा अधोरेखित केल्या. लाखो प्रवाशांची वर्दळ असूनही ठाणे स्थानक अधिक स्वच्छ आणि सुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. संवादाच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांनी सुरू असलेले व मंजूर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरीय सेवांचे वेगळे नियोजन, तसेच मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांसोबत संरचित सल्लामसलत व्हावी, अशी शिफारसही करण्यात आली. (Mumbai Railway)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.