मुंबई :( Magh Mela Begins in Prayagraj ) प्रयागराजमध्ये जगप्रसिद्ध माघ मेळा सुरू झाला आहे. या ऐतिहासिक ४४ दिवसांच्या माघ मेळ्यामध्ये पहिल्या दोन दिवसातच पन्नास लाखांहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान केले. यावेळी संगमाच्या काठावर 'हर हर गंगे' आणि 'जय माँ गंगा' च्या जयघोषात, श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा उल्लेखनीय संगम पाहायला मिळाला.
या मेळ्याला देखील कुंभमेळ्यासारखेच स्वरूप आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक स्नानासाठी प्रयागराज येथे दाखल झाले आहेत. हिंदूंच्या पवित्र मेळ्यात यावेळी देखील योगी सरकारकडून उत्तम व्यवस्था राखण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी, ३,८०० बसेस, ७५ ई-बस आणि ५०० हून अधिक ई-रिक्षा तैनात करण्यात आल्या आहेत.
प्रयागराज शहर आणि मेळा परिसरात रंगीबेरंगी साइनबोर्ड आणि मदत कक्ष बसवण्यात आले आहेत. अग्निसुरक्षेसाठी सतरा अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, तर स्वच्छतेसाठी ३,३०० स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. माघ मेळ्यात स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले गेले आहे.
माघ मेळ्यात सुरक्षा राखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. मेळ्यासाठी १७ ठिकाणी तात्पुरती पोलिस ठाणी आणि ४२ पोलिस चौक्या स्थापन करण्यात आल्या आहेत. १०,००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात आहेत. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ची दोन पथके आहेत. संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे याद्वारे चोवीस तास देखरेख केली जात आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.