१६ तारखेचा विजय हा महाविजय असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरळीतून फुंकले प्रचाराचे रणशिंग

    04-Jan-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) "आम्ही बोलून नाही करून दाखवतो. मुंबईच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून महानगरपालिका आमच्या हातात द्यावी. आम्ही पारदर्शी प्रामाणिक कारभार करून दाखवू. येत्या १५ तारखेला आपला मोठा विजय होईल. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. १६ तारखेचा विजय हा महाविजय असेल, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
 
वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडलेल्या महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम, आ. प्रवीण दरेकर, आ. संजय उपाध्याय, आ. मनीषा चौधरी, आ. योगेश सागर, आ. अतुल भातखळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यासह भाजप, शिवसेना आणि रिपाईचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज आपण मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. १४ आणि १५ तारीख ही संक्रमणाची तारीख असून यादिवशी आपल्याला पराक्रम घडवायचा आहे. ही निवडणूक मुंबईचे चित्र आणि मुंबईकरांचे जीवन बदलायची निवडणूक आहे. अनेक वर्ष आपण बोलबच्चन ऐकले, पण आता बोलबच्चन नाही तर वचन देणारे लोक तुमच्यासोबत आहेत. निवडणुका आल्या की, मुंबई उत्तरेकडे सरकते. मात्र असे म्हणणाऱ्यांची बुद्धी सरकते आहे. कुणाच्या बापाच्या बापाच्या बापात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत नाही."
 
मुंबईत शिरलेले बांगलादेशी परत पाठवले
 
"ही निवडणूक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची आहे. मुंबईच्या निवडणुकीत आम्हाला सुरक्षित मुंबई देखील तयार करायची आहे. या मुंबईमध्ये शिरलेले बांगलादेशी आम्ही परत पाठवले. पुढील काळात एकूण एक बांगलादेशी आम्ही परत पाठवून मुंबई सुरक्षित करण्याचे काम करू," असेही ते म्हणाले.
 
मुंबईत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय
 
"मुंबईत निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली असून या टोळीत काही बालकही आहे. पण ये जनता है ये सब जानती है. अलिकडच्या काळात मुंबईचा महापौर कोण होणार असा प्रश्न आला. मुंबईचा महापौर महायुतीचा, मराठी आणि हिंदुच होणार. वारीस पठाण म्हणाले मुंबईचा महापौर बुरखेवाली बनेल. यावर बोलण्यासाठी अचानक भोंग्याचे सेल गेले. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. प्रत्येकाला आपला धर्म जपण्याचा अधिकार आहे. पण जो या हिंदुस्तानात वंदे मातरम् म्हणायला नकार देतो त्याला आमचा विरोध आहे. त्यांच्या (ठाकरे) सभेत तुम्हाला वंदे मातरम्, भारत माता की जय चा नारा ऐकू येणार नाही. कारण आता त्यांचा झेंडा आणि दंडा दोन्ही बदलला आहे."
 
 
मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही
 
"दक्षिण मुंबईतील माणूस हद्दपार झाला याला कारणीभूत कोण? आम्हाला कागद आणि रशीद चाटण्यासाठी सत्ता नको तर जिवंत माणसासाठी सत्ता हवी आहे. ८० हजार मराठी माणसांना मुंबईत १०० फुटांवरून ५०० फुटांचे घर मोफत दिले. पत्राचाळीत तुम्ही घोटाळा केला पण तिथल्या मराठी माणसाला हक्काचे घर दिले. यापुढे मुंबईतील मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही. महाराष्ट्रात आपले सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात एसआरएच्या योजना सुरू केल्या. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी ४५० किलोमीटरचे मेट्रोचे काम सुरू केले. यापुढे मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी ५९ मिनिटांहून अधिक काळ लागणार नाही, असे नियोजन केले आहे. कोस्टल रोड, अटल सेतू केला. मुंबईकरांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागू नये म्हणून टनेलचे जाळे तयार करणार आहोत. १६ हजार कोटींचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे काम सुरू केले. पुढच्या काळात आम्ही मुंबईसाठी १७ हजार कोटी रुपयांचे पर्यावरणीय बजेट ठेवणार आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
हा शुभारंभ नसून विजयाची नांदी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
"हा प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची नांदी आहे. महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची ही सुरुवात आहे. १६ तारखेला विरोधकांचा बँड वाजवून आपल्याला विजयाचा गुलाल उधळायचा आहे. महापालिकेत आपल्याला विजयाचा चौकार मारायचा आहे. महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना देतो. ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण आहे. लाडक्या बहिणींना आपल्याला आशीर्वाद दिला. कुणीही माई चा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काल कुणीतरी व्हिजन डॉक्युमेंट दाखवले. पण इतकी वर्षे सत्तेत असताना हे व्हिजन कुठे गेले होते? त्यांनी इतकी वर्षे फक्त लुटण्याचे काम केले. त्यामुळेच जनतेने त्यांचा सिझन संपवल्यानंतर आता त्यांना व्हिजन आठवले. ही सभा मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील उठावाची ललकारी आहे. भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडविण्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आणि मराठीच महापौर बसणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे," असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
हे वाचलत का? - रीलस्टार अथर्व सुदामे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, PMPML ने बजावली कायदेशीर नोटीस
 
मुंबईची ममदानी होऊ देणार नाही - अमीत साटम
 
"गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिकारक बदल घडले. एका बाजूला गेल्या अकरा वर्षात केलेला विकास आणि दुसऱ्या बाजूला गेल्या २५ वर्षात ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार. त्यांना निवडणुका आल्या की, मराठी माणूस आठवतो पण, मुंबईत दाखवण्यासारखे एकही काम नाही. आता पुन्हा मतांच्या लांगुलचालनासाठी त्यांना स्वतःच्या अंगावर हिरवी चादर ओढून घेतली आहे. पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्या रशीद खानला पक्षात प्रवेश देतो. जगातील काही शहरे स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी काही इस्लामिक fundamentalist ने कटकारस्थान रचले आहे. मुंबईतही हे कटकारस्थान सुरू असून उद्धव ठाकरे त्याचा भागीदार झाले आहेत. येणाऱ्या काळात आम्ही मुंबईची ममदानी होऊ देणार नाही. मुंबईचे न्यूयॉर्क होऊ देणार नाही."
 
बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही महायुतीसोबत - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
 
"१५ तारीख जवळ येत आहे आणि आपण सगळे उत्साहात आहोत. या सरकारच्या काळात मुंबईचा विकास सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे प्रकल्प सुरू आहे. चैत्यभूमीत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मोठा होत असून तो न्यूयोकमधील स्टॅच्यु ऑफ युनिटीपेक्षाही मोठा असेल. काँग्रेसच्या काळात अनेकदा मागणी करूनही ती पूर्ण होत नव्हती. पण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा आदेश काढला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला महायुतीसोबत राहायचे आहे."
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....