
मुंबई : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे अथर्व पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परवानगीशिवाय बसमध्ये रील शूट करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून अथर्व सुदामेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही नोटीस २ जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे.
नोटीसमधील माहितीनुसार, अथर्वने PMPMLची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता महामंडळाच्या एका बसमध्ये रील शूट केलं आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. या व्हिडीओमध्ये PMPMLची अधिकृत मालमत्ता ज्यामध्ये महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशीन आणि अधिकृत ओळखपत्र (बॅज) यांचा समावेश आहे. यांचा अनधिकृत आणि बेकायदेशीर वापर करण्यात आल्याचा आरोप महामंडळाने केला आहे.
याशिवाय, PMPMLने रीलमधील महिला वाहकांच्या सादरीकरणावर गंभीर आक्षेप नोंदवला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये महिला वाहकांना आक्षेपार्ह आणि अवमानकारक पद्धतीने दाखवण्यात आल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं असून, यामुळे त्यांच्या सन्मानाला आणि व्यावसायिक प्रतिमेला धक्का बसल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे. सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेवर, मानसिक स्वास्थ्यावर आणि समाजातील प्रतिमेवर अशा प्रकारच्या कंटेंटचा नकारात्मक परिणाम होतो, असं PMPML अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
महामंडळाने पुढे असंही नमूद केलं आहे की, या रीलच्या प्रसारामुळे PMPML या अत्यावश्यक सार्वजनिक सेवा देणाऱ्या संस्थेची सार्वजनिक प्रतिमा आणि विश्वासार्हता मलिन झाली आहे. हा प्रकार महामंडळाच्या अंतर्गत नियम, धोरणे आणि नैतिक मूल्यांचे उल्लंघन करणारा असून, त्यामुळे नागरिकांचा संस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो, असा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडियासाठी कोणताही कंटेंट तयार करताना संबंधित नियम, परवानग्या आणि नैतिक चौकटींचे पालन करणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, या प्रकरणात PMPML प्रशासनाने पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. अथर्व यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारच्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर त्याने तो व्हिडीओसुद्धा डिलीट केला होता. मात्र यावेळी त्याने या व्हिडीओवर अद्याप तरी कोणतीच दखल घेतलेली दिसत नाही.