मुंबई :( Nataraja Idol ) अमेरिकेत तस्करी करण्यात आलेल्या शिव नटराजासह तीन ऐतिहासिक मूर्ती अमेरिकेतील राष्ट्रीय आशियाई कला संग्रहालय भारताला परत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कलाकृतींमध्ये चोल काळातील (९९० इसवी सन) शिव नटराजाची मूर्ती, १२ व्या शतकातील सोमस्कंदाची मूर्ती आणि विजयनगर काळातील (१६ वे शतक) संत सुंदरार आणि परवाई यांच्या मूर्तींचा समावेश आहे.
या मूर्ती तामिळनाडूतील मंदिरांमधून बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आल्या होत्या. १९५६ ते १९५९ दरम्यान तामिळनाडूच्या मंदिरांमध्ये ही शिल्पे सापडल्याची पुष्टी भारतीय पुरातत्व खात्याने केली होती. तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करून या मूर्तींची अमेरिकेत तस्करी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे राष्ट्रीय आशियाई कला संग्रहालयाने ही प्राचीन कांस्य शिल्पे भारत सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय आशियाई कला संग्रहालयाने दक्षिण आशियाई संग्रहाचा पद्धतशीर आढावा घेतला. २०२३ मध्ये फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पाँडिचेरीच्या फोटो अर्काइव्हच्या मदतीने हि शिल्पे मूळतः तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील आणि इतर गावांमधील मंदिरांचे असल्याचे आढळून आले. तपासात असे आढळून आले की शिव नटराजाची मूर्ती २००२ मध्ये न्यूयॉर्कमधील एका गॅलरीमधून खरेदी करण्यात आली होती ज्याने विक्रीसाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती.
२०१६ पासून अमेरिकेने १,५०० हून अधिक सांस्कृतिक कलाकृती भारताला परत केल्या आहेत. अलीकडेच नोव्हेंबर २०२४ मध्ये १० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या १,४४० चोरीच्या वस्तू परत करण्यात आल्या. सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान २९७ पुरातन वस्तू परत आणण्यात आल्या.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.