मुंबई : ( Saudi Arabia ) सौदी अरेबियाने पहलगाम दहशतवादी हल्ला आणि लाल किल्ल्याजवळील दहशतवादी घटनेचा तीव्र निषेध केला आहे. भारत–सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत राजकीय, वाणिज्यदूत व सुरक्षा सहकार्य समितीच्या चौकटीत झालेल्या भारत–सौदी अरेबिया सुरक्षा कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत दोन्ही देशांनी दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध केला. ही बैठक नुकतीच रियाध येथे पार पडली. या बैठकीचे सहअध्यक्षपद परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव विनोद बहादे आणि सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयातील कायदेशीर व्यवहार व आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे महासंचालक अहमद अल-ईसा यांनी भूषवले.
दोन्ही बाजूंनी सीमापार दहशतवादासह दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटनांचा निषेध पुन्हा एकदा व्यक्त केला. तसेच २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध नागरिकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा आणि १० नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी घटनेचाही निषेध करण्यात आला. या बैठकीत सुरू असलेल्या सुरक्षा सहकार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जागतिक स्तरावर तसेच त्यांच्या-त्यांच्या प्रदेशांत दहशतवादी संघटनांकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील ही सुरक्षा बैठक दहशतवादविरोधी सहकार्य अधिक मजबूत करण्यासोबतच प्रादेशिक सुरक्षा संरचना बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती.
दहशतवाद, अतिरेकी विचारसरणी आणि कट्टरतावाद यांचा मुकाबला करणे, दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याला आळा घालणे, दहशतवादी हेतूंसाठी तंत्रज्ञानाचा वापर रोखणे तसेच आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद यांतील संबंध यांसारख्या सध्याच्या व उदयोन्मुख आव्हानांवर सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही बाजूंनी मतांची देवाणघेवाण केली. तसेच द्विपक्षीय कायदेशीर व न्यायिक सहकार्य आणि कायदा अंमलबजावणी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक