‘विमा कायदा सुधारणा’ काय बदल घडविणार?

    30-Jan-2026   
Total Views |
Insurance Sector
 
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ‘सबका बीमा, सबकी रक्षा’ म्हणजेच ‘सर्वांसाठी विमा, सर्वांसाठी संरक्षण’ हे विमा कायद्यांमध्ये सुधारणा करणारे विधेयक, २०२५ मंजूर केले. राष्ट्रपतींचीही त्याला मंजुरी मिळाली आहे. या नव्या विधेयकाने-कायद्याने ‘विमा अधिनियम १९३८’, ‘भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण अधिनियम, १९९९ (इर्डा अ‍ॅट)’ व ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ अधिनियम, १९५६’ यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने विमा क्षेत्रातील या सुधारणांचा आढावा घेणारा हा लेख...
 
विमा कायद्यातील प्रमुख सुधारणा म्हणजे, परदेशी कंपन्यांना भारतात परकीय गुंतवणुकीची असलेली ७४ टक्यांची मर्यादा आता वाढवून १०० टक्के करण्यात आली आहे. यामुळे सध्या भारतात व्यवसाय करीत असलेल्या परदेशी विमा कंपन्यांना आपले भांडवल १०० टक्यांपर्यंत वाढविता येईल. तसेच परदेशी विमा कंपनीला भारतात कंपनी स्थापन करायची असल्यास स्वतःचे १०० टक्के भांडवल आणून विमा व्यवसायात उतरता येईल. विमा व्यवसायाचे सुलभीकरण, परदेशी विमा कंपन्यांना भारतात अधिक सुलभपणे व्यवसाय करणे शय करणे, विमाक्षेत्राचा वेगाने विकास करणे, ‘इर्डा’ला अधिक सक्षम करणे, विमा वितरकांना विमाविक्री अधिक सुलभ करणे, पुनर्विमा कंपन्यांच्या भारतातील प्रवेशाचे सुलभीकरण करणे, नवी वितरण प्रणाली सुरू करणे आणि हे करताना विमाविक्री योग्यरित्या व्हावी, म्हणून एजंट्सच्या कमिशनवर मर्यादा घालणे, अशा हेतूने आणि शेवटी भारताने ठेवलेले २०४७ पर्यंत ‘प्रत्येकाला विमा’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘सबका बीमा, सबकी रक्षा’ हे विधेयक मांडण्यात आले आहे, असे त्यावेळी अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले होते. सध्या १४० कोटी भारतीयांपैकी फक्त ३० टक्के लोकांकडे आयुर्विमा आहे. ५० टक्यांपेक्षा कमी लोकांकडे आरोग्यविमा आहे. फक्त एक टक्का घरांना विमा संरक्षण आहे. वाहनांसाठी विमा बंधनकारक असूनही, भारतातील निम्म्या वाहनांचा विमा उतरविला जात नाही. या स्थितीत बदल करण्यासाठी विमा कायद्यात बदल करणे गरजेचे होते. म्हणून हे विधेयक मंजूर करून घेण्यात आले आहे.
 
विमा कंपन्यांत परकीय गुंतवणुकीची मर्यादा २०२१ मध्ये ४९ टयांवरून ७४ टक्के करण्यात आली होती. तेव्हा ही सुधारणा होण्यासाठी सुमारे पाच महिने लागले होते. यावेळी प्रक्रिया कमी कालावधीत होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या भारतात २६ आयुर्विमा कंपन्या, ३४ सर्वसाधारण विमा कंपन्या आणि सात स्वतंत्र आरोग्यविमा कंपन्या आहेत. १०० टक्के परकी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्याने भारतात आवश्यक तंत्रज्ञान व योजना येऊ शकतात. आयुर्विमा १९५६ मध्ये राष्ट्रीयीकृत झाला, तेव्हा २४५ विमा कंपन्या कार्यरत होत्या. तसेच १९७१ मध्ये साधारण विमा राष्ट्रीयीकृत झाला, तेव्हा साधारण विमा व्यवसायात १०७ विमा कंपन्या होत्या. त्या तुलनेत सध्या असलेल्या ६७ विमा कंपन्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. या दृष्टीने परदेशी विमा कंपन्यांना १०० टक्के भांडवल आणून विमा व्यवसाय करण्यास परवानगी देणे, हे सरकारने उचललेले योग्य पाऊल आहे. शेअर हस्तांतरासाठी ‘इर्डा’ची मंजुरीची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. पूर्वी एक टक्यांहून अधिक शेअरचे हस्तांतर करायचे असल्यास ‘इर्डा’ची परवानगी लागत असे. ही मर्यादा वाढवून पाच टक्के करण्यात आली आहे.
 
यामुळे किरकोळ वरील नियामक अडथळे कमी होतील. संचालक व अधिकारी यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, ज्यायोगे एका विमा कंपनीचा संचालक व अधिकारी दुसर्‍या विमा कंपनीत, बँकेत किंवा गुंतवणूक कंपनीत अधिकारी संचालक राहू शकणार नाही. विलीनीकरण व एकत्रिकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. पूर्वी दोन विमा कंपन्यांना विलीनीकरणाची परवानगी होती. आता विमा कंपनी आणि बिगरविमा कंपनी यांचे विलीनीकरण होऊ शकेल. विमा एजंट्सना मिळणार्‍या कमिशनची मर्यादा २०२१ मध्ये काढून टाकण्यात आली होती. कंपन्यांना एकूण खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, असे केल्याने एजंट्सना काही कंपन्या भरमसाठ कमिशन देऊ लागल्याचे दिसून आले होते.
 
आता ‘इर्डा’ला कमिशनवर मर्यादा घालण्याचे अधिकार दिले गेले आहेत. मात्र, विद्यमान खर्च मर्यादेचे नियम लागूच राहतील. विमामध्यस्थांना दर तीन वर्षांनी परवाना नूतनीकरण करावे लागत असे. आता नूतनीकरण करण्याची गरज नाही. वार्षिक शुल्क भरले की परवान्यांचे नूतनीकरण झाले, असे समजण्यात येईल. विमा वितरकांची एक नवी श्रेणी सुरू करण्यात येणार आहे. याचे नाव ‘एमजीए’ म्हणजे ‘मॅनेजिंग जनरल एजंट’! हे एजंट विमा कंपन्यांच्या सल्ल्याने वेगवेगळे विमा प्रकार विक्रीस आणू शकतील आणि केवळ तेच त्याची विक्री करू शकतील. परदेशात विमा वितरकांचा हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. ‘इर्डा’ला विमा मध्यस्थांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी, कागदपत्रे जप्त करणे आणि मध्यस्थांना दंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वी पुनर्विमा कंपन्यांना किमान भांडवल पाच हजार कोटी रुपये असणे आवश्यक होते. दोन भारतीय आणि दहा परदेशी पुनर्विमा कंपन्या भारतात कार्यरत आहेत. अधिक पुनर्विमा कंपन्या भारतात याव्यात, म्हणून या कंपन्यांचे किमान भांडवल पाच हजार कोटी रुपयांवरून कमी करून एक हजार कोटी रुपये करण्यात आले आहे.
 
विधेयकाचा मसुदा जेव्हा सरकारने जाहीर केला होता, तेव्हा त्यात असलेल्या दोन प्रमुख तरतुदी काढून टाकण्यात आलेल्या दिसतात. पहिली तरतूद होती की, आयुर्विमा कंपन्यांना साधारण आणि आरोग्यविमा व्यवसाय करता येईल, तसेच साधारण विमा कंपन्यांना आयुर्विमा व्यवसाय करता येईल. यासाठी संमिश्र परवाने देण्यात येतील, हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. तसेच विमा प्रतिनिधी सध्या केवळ एका आयुर्विमा, एका सर्वसाधारण विमा आणि एका आरोग्यविमा कंपनीशीच विक्री करार करू शकतात. त्याचे कार्यक्षेत्र वाढवून ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडाचे विक्रेते कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या योजनांची विक्री करू शकतात, त्याचप्रमाणे विमा प्रतिनिधींना विक्रीचे क्षेत्र विस्तारून देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, ‘एलआयसी’ व इतर काही विमा कंपन्यांच्या विरोधामुळे हा प्रस्तावही गुंडाळण्यात आला.
 
केंद्र सरकारच्या ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’चा विचार करून या कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत; व्यवसाय सुलभता, नियमकाची देखरेख व पॉलिसीधारकांचे संरक्षण यांचा समतोल राखलेला आहे. भारतीय विमा कंपन्यांमध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याची प्रक्रिया त्वरित राबविली जाईल. व्यवस्थापनावर पूर्ण नियंत्रण करण्याचा अधिकार मिळाल्यामुळे परदेशी विमा कंपन्यांचे प्रशासन अधिक मजबूत होईल. निर्णय जलद घेतले जातील. जबाबदारी अधिक स्पष्ट होईल. या कायद्याचे यश हे केंद्र सरकार व ‘इर्डा’ यांनी तयार केलेल्या नियम व नियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून आहे. केंद्र सरकारने हा कायदा विमा व्यवसाय अधिक प्रगत व विस्तारित होण्याच्या दृष्टीने आणला आहे.
 
भारतात ‘खाजाऊ’ (खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण) धोरण आल्यानंतर २००० मध्ये खासगी क्षेत्रासाठी विमा व्यवसाय खुला करण्यात आला. तेव्हा परदेशी भांडवलाची मर्यादा २६ टक्के ठेवण्यात आली होती व ७४ टक्के भांडवल भारतीय कंपनीचे. २०१५ मध्ये परदेशी भांडवलाची मर्यादा २६ टक्यांवरून वाढवून ४९ टक्के करण्यात आली होती. २०२१ मध्ये ७४ टक्के करण्यात आली, तर आता १०० टक्के करण्यात आली. सध्या ‘एजिल फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनी’, ‘अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी’ व ‘जनरल इन्शुरन्स कंपनी’ या तीन विमा कंपन्यांत परदेशी कंपन्यांचे भांडवल ७४ टक्के झाले आहे. काही परदेशी विमा कंपन्यांनी आपले भांडवल २६ टक्यांवरून ४९ टक्यांपर्यंत वाढविले आहे. मात्र, ‘बजाज’सारख्या आणि काही उद्योगसमूहांनी, तसेच बँकांनी परदेशी कंपन्यांना आपले भांडवल वाढवू दिले नाही. परदेशी विमा कंपन्यांना आता नवीन कायद्याने भारतीय भागीदार शोधायची गरज नाही. त्यांचा भारतात विमा व्यवसाय सुरू करण्यासाठीचा प्रमुख अडथळा नव्या कायद्याने दूर केला आहे. सख्या विमा उद्योगात ८२ हजार कोटी रुपयांचे परदेशी भांडवल आहे.
 
 
 

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.