
प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार रेखा यादव यांच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या भाजप कार्यकर्त्या सुनीता यादव यांनी अखेर अर्ज माघार घेतला. प्रभाग क्रमांक १८५ धारावीमध्ये भाजप उमेदवार रवि राजा यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले भाजप पदाधिकारी रमाकांत गुप्ता यांनीही आपला अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक १६४ मध्ये भाजप उमेदवार हरिश भांदिगे यांच्या विरोधात बंडखोरी करत अर्ज दाखल केलेले माजी नगरसेवक सीताराम तिवारी यांनीही माघार घेतली. या प्रभागात बसपचे उमेदवार रणवीर सिंग आणि अपक्ष उमेदवार मनीष पेदामल यांनीही अर्ज मागे घेतले. प्रभाग क्रमांक २२५ मध्ये भाजप उमेदवार हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात लढणारे अपक्ष उमेदवार कमलाकर दळवी यांनी अर्ज माघार घेतला. मात्र शिवसेनाच्या (शिंदे गट) उमेदवार सुजाता सानप यांनी माघार न घेतल्याने येथे बहुरंगी लढत निश्चित मानली जात आहे.
प्रभाग क्रमांक १०७ मध्ये भाजपचे नील सोमय्या यांच्या विरोधात लढत असलेल्या उबाठा-मनसे-राष्ट्रवादी (शरद गट) आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भरत दनानी यांचा अर्ज रद्द झाल्याने आता इथे एकूण सात उमेदवार उरले आहेत. त्यामध्ये नील सोमय्या यांचा समावेश आहे.
काही प्रभागांत बंडखोर कायम
नेहल शाह, शेखर वायगंकर आणि अनिशा मजगांवकर यांसारखे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात टिकून आहेत. प्रभाग क्रमांक १७७ मधील अपक्ष उमेदवार नेहल शाह यांनी स्थानिक नागरिकांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. या प्रभागात भाजपच्या अधिकृत उमेदवार कल्पेशा जेसल कोठारी आहेत.
शिवसेना-भाजप यांच्यात होणार मैत्रीपूर्ण लढत
कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक २२५ पुन्हा एकदा चर्चेत आहे. येथे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सुजाता सानप आणि भाजपच्या हर्षिता नार्वेकर या दोघींनीही अर्ज दाखल केले आहेत. २२७ प्रभागांपैकी ही एकमेव जागा आहे, जिथे अशी लढत होत आहे. २०१७च्या निवडणुकीत नार्वेकर यांनी वॉर्ड क्रमांक २२६ मधून विजय मिळवला होता. शिंदे गटाच्या शिवसेनेतील नेत्याने सांगितले की, सुजाता सानप गेल्यावर्षीच उबाठासोडून शिंदे गटात आल्या. त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. त्यामुळेच इथे मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सानप यांनी २०१७च्या निवडणुकीत या जागेवरून तीन हजार, ५०२ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मागील वेळी हा वॉर्ड आरक्षित होता, तर यंदा तो खुला झाला आहे.