नवी दिल्ली : (Rajnath Singh on White Collar Terror Module) केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशात 'व्हाईट-कॉलर दहशतवाद' वाढत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. उच्च शिक्षणाला मूल्यांची जोड नसेल, तर ते समाजासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला. भूपाल नोबल्स विद्यापीठाच्या १०४व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली.(Rajnath Singh on White Collar Terror Module)
हातात पदवी आणि खिशात आरडीएक्स...
दिल्ली स्फोटातील आरोपी सुशिक्षित डॉक्टर असल्याचे निदर्शनास आणून देत, केवळ शिक्षण असून चालत नाही, तर नैतिकता आणि चारित्र्यही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “आज देशात व्हाईट कॉलर दहशतवादाचा भयानक प्रवृत्ती उदयास येत आहे. उच्च शिक्षित लोक समाज आणि देशाविरुद्ध काम करत आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगार डॉक्टर होते. त्यांच्या हातात पदवी होती आणि खिशात आरडीएक्स होते.यावरून ज्ञानासोबत मूल्ये आणि चारित्र्य किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते,” (Rajnath Singh on White Collar Terror Module)
धर्म म्हणजे कर्तव्यभावना
संरक्षणमंत्री पुढे म्हणाले, “शिक्षणाचा उद्देश केवळ व्यावसायिक यश मिळवणे हा नसून, नैतिकता, सदाचार आणि मानवी चारित्र्याचा विकास करणे हा आहे. जे शिक्षण नम्रता, चारित्र्य आणि ‘धर्म’ म्हणजेच कर्तव्यभावना देऊ शकत नाही, ते अपूर्ण आहे.दहशतवादी नेहमीच अशिक्षित असतात असे नाही. अनेकांकडे विद्यापीठाच्या पदव्या असतात, मात्र त्यांच्याकडे विवेक, मूल्ये आणि शहाणपणाचा अभाव असतो. धर्म म्हणजे फक्त मंदिर, मशीद किंवा चर्चमध्ये जाऊन पूजा-अर्चा करणे नव्हे. धर्म म्हणजे कर्तव्यभावना. धर्म आणि नैतिकतेविना शिक्षण समाजासाठी उपयुक्त ठरत नाही, उलट कधी कधी ते घातकही ठरू शकते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.(Rajnath Singh on White Collar Terror Module)