मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या एक तास ५८ मिनिटांत
03-Jan-2026
Total Views |
मुंबई :( Mumbai-Ahmedabad Bullet Train ) मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाने महाराष्ट्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पालघर जिल्ह्यातील पहिल्या पर्वतीय बोगद्याचे खोदकाम यशस्वी झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. हा टप्पा केवळ अभियांत्रिकी यश नसून, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारची ठाम इच्छाशक्ती दाखवणारा मानला जात आहे.
विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांच्यादरम्यान असलेला सुमारे १.५ किमी लांबीचा ‘एमटी-५’ पर्वतीय बोगदा पालघरमधील मोठ्या बोगद्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे हा महाराष्ट्रातील ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पातील पहिलाच पर्वतीय बोगदा असून, १८ महिन्यांत त्याचे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. अत्याधुनिक ‘ड्रिल अॅण्ड ब्लास्ट’ तंत्रज्ञानाचा वापर करताना सुरक्षितता, पर्यावरण आणि स्थानिक भूगर्भीय परिस्थितीचा विशेष विचार करण्यात आला, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. यापूर्वी, ठाणे ते बीकेसीदरम्यान सुमारे पाच किमी लांबीचा भूमिगत बोगदा सप्टेंबर २०२५मध्ये पूर्ण झाला होता. आता पालघरमधील हा टप्पा पूर्ण झाल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा महाराष्ट्रातील वेग स्पष्टपणे वाढलेला दिसतो. मुंबई महानगर क्षेत्राला थेट लाभ देणारा हा प्रकल्प असून, मुंबई-अहमदाबाद प्रवास अवघ्या एक तास ५८ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "बुलेट ट्रेन मध्यमवर्गासाठी परवडणारी, सुरक्षित आणि आरामदायी वाहतूक देईल. हा प्रकल्प केवळ ‘एलिट’साठी नसून, भविष्यात मोठ्या प्रमाणावर सामान्य प्रवाशांनाही तो उपयुक्त ठरेल. महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई-पश्चिम पट्ट्यात रोजगारनिर्मिती, स्थानिक व्यवसायांना चालना आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होईल. साबरमतीपासून मुंबईपर्यंतचा हा ‘बुलेट ट्रेन कॉरिडॉर’ मुंबई, ठाणे, विरार, बोईसरसारख्या भागांना थेट राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक केंद्रांशी जोडणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता, मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि औद्योगिक भवितव्याशी जोडलेला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.”
मुंबई-अहमदाबाद ‘हाय-स्पीड रेल’ (एमएएचएसआर) प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किमी असून, त्यापैकी १५६ किमी मार्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सात पर्वतीय बोगद्यांची एकूण लांबी सुमारे सहा किमी आहे. त्यामध्ये ‘एमटी-५’ हा सर्वात लांब बोगदा असून, त्यात ५५ टक्के प्रगती झाली आहे आणि २ जानेवारी २०२६ रोजी खोदकाम पूर्ण झाले. उर्वरित बोगद्यांचे कामही वेगात सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.