विजयगाथांची मिथके आणि श्रेयासाठी चढाओढ!

Total Views |
Indian History 
 
प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्यासोबत अर्थातच पांडव हे शतकानुशतके हिंदू जनमानसावर अमिट अशी छाप ठेवून आहेत. त्यांच्याबद्दल वाटणार्‍या अमर्याद प्रेमातून अनेक मिथके निर्माण झालेली आहेत. त्यांनी हिंदू जनमानसाला, त्याच्या भावजीवनाला फार मोठा आधार दिलेला आहे. त्यातून अनेकदा श्रेय मिळवण्यासाठी चढाओढ लागलेलीसुद्धा दिसते. ती कशी? याचा घेतलेला मागोवा...
 
प्रभू रामचंद्र, बंधू लक्ष्मण आणि सीतामाई वनवासात असताना आमच्या गावात किंवा गावालगत येऊन राहून गेले होते, असे सांगायला अख्ख्या देशातल्या तमाम लोकांना फार आवडते. पण, अयोध्या ते पंचवटी ते रामेश्वर आणि पुढे लंका हा तसा सरळ उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास आहे. मग, या पल्ल्यात न येणार्‍या प्रातांनी काय करावे? त्यांच्या मदतीला ‘महाभारत’ आणि ‘भागवता’मधील कृष्णकथा आहेतच की! पांडव वनवासात असताना आमच्या गावात येऊन, राहून गेले होते, अशी कथा आपल्याला अख्ख्या देशात सर्वत्र ऐकायला मिळते. कुणी एखादा तर जवळची एखादी उद्ध्वस्त कोरीव गुफा किंवा उद्ध्वस्त मंदिर दाखवून सांगतो की, भीमदेवाने आपल्या अचाट ताकदीने एका रात्रीत हे मंदिर बांधायचे ठरवले. पण, सूर्योदय झाला. त्यामुळे हे बांधकाम अर्धवट टाकून पांडव पुढे निघून गेले.
 
तुम्ही जर त्याला सांगायला गेलात की, ‘बाबा रे, या गुंफा, ही मंदिरे अपुरी राहिलेली नसून उद्ध्वस्त आहेत’; तर त्याला ते अजिबात पटणार नाही. तो रागावून म्हणेल, ‘म्हणजे काय? पांडवांनी आमच्या गावी येऊन नये काय?’ या मिथकांच्या मागे आणि श्रेयाच्या आग्रहामागे, त्या-त्या व्यक्तींबद्दल अलोट प्रेम आणि श्रद्धा असते. महाराष्ट्रात हरिश्चंद्रगड हा एक फार जबरदस्त किल्ला आहे. त्याच्यावर ‘तारामती’ आणि ‘रोहिदास’ अशी दोन शिखरे आहेत. गडाच्या घेर्‍यातल्या झाडून सगळ्या गावकर्‍यांचे म्हणणे एकच आहे की, अयोध्येचा तो प्रख्यात राजा हरिश्चंद्र यानेच हा किल्ला बांधला. आपली राणी तारामती आणि राजपुत्र रोहिदास यांच्यासह राजा हरिश्चंद्र इथे राहिला होता. प्रत्यक्षात तो किल्ला राष्ट्रकूट वंशातल्या राजा हरिश्चंद्राचा आहे. राष्ट्रकूट वंशाने सहावे ते दहावे शतक महाराष्ट्रावर राज्य केले.
 
हिरण्यकश्यपू नावाचा असुर हा देवांचा शत्रू होता. त्याची पत्नी कयाधू आणि मुलगा प्रल्हाद हे मात्र भगवान विष्णूचे अनन्य भक्त होते. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून, ‘मला मनुष्य किंवा पशू, शस्त्र किंवा अस्त्र यांपासून, दिवसा किंवा रात्री अशा केव्हाही मृत्यू येणार नाही,’ असे वरदान मिळवले होते. म्हणून भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णू नरसिंह रूपाने प्रकट झाला. तो धड मानव नव्हता, धड पशू नव्हता; ती वेळ दिवस किंवा रात्र नसून तिन्हीसांजेची होती. नरसिंहाने कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने नव्हे, तर आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याला ठार केले. ही सारी कथा कुठे घडली?
 
सध्याच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चिनाब नदीच्या पूर्वेला, मुलतान हे प्रसिद्ध शहर आहे. इ.स. ७१२मध्ये अरबस्तानच्या खलिफा सुलेमान याचा अरब सेनापती मुहंमद-बिन-कासिम याने भारतावर स्वारी केली. तेव्हा त्याला आढळले की, मुलतान शहरात एक फार प्रख्यात सूर्यमंदिर असून, लोक मोठ्या प्रमाणावर सूर्योपासक आहेत. त्याने अर्थातच, सूर्यमंदिर उद्ध्वस्त केले पण, याच मुलतान शहरात एक नरसिंह मंदिरही आहे. स्थानिक हिंदूंची अशी श्रद्धा होती की, हिरण्यकश्यपूचा राजवाडा इथेच होता. या राजवाड्यातल्या ज्या खांबाला त्याने लाथ मारली आणि खांब दुभंगून नरसिंह प्रकटला, तोच खांब मध्यवर्ती धरून हे नरसिंह मंदिर उभारण्यात आले होते. पाकिस्ताननिर्मितीच्या वेळी मुलतान मधले सगळे हिंदू एकतर परागंदा झाले किंवा कत्तल झाले. देवळे उद्ध्वस्त झाली. १९९२मध्ये अयोध्येत बाबरी ढांचा कोसळल्यावर, पाक मधले धर्मपिसाट पुन्हा नव्याने संतापले आणि त्यांनी मुळात उद्ध्वस्तच असलेल्या नरसिंह मंदिराची आणखी तोडमोड केली.
 
शहर पुण्यात खजिन्याची विहीर किंवा स्काऊट ग्राऊंड समोर एक नरसिंह देवस्थान आहे. अतिशय जागृत अशा या देवस्थानाची स्थापना दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे, सवाई माधवराव पेशव्यांच्या अमदानीत झाली. या देवस्थानच्या संस्थापकांचे आजचे वंशज आणि उपासक मोहनराव जोशी हे मोठ्या हिकमतीने आणि ईश्वरी कृपेने, पाकिस्तानात मुलतानला जाऊन नरसिंह भगवानाच्या त्या प्रकट स्थळाचे दर्शन घेऊन आलेले आहेत. त्याचा वृत्तांतही त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. आता गंमत पहा. विशाखापट्टणम् हे भारताच्या पूर्व किनार्‍यावरचे एक प्रसिद्ध बंदर आहे. व्यापारी जहाज वाहतुकीइतकेच, ते भारतीय नौदलाचा तळ म्हणूनही महत्त्वाचे आहे. नौकानयन क्षेत्रात म्हणजे खलाशांच्या भाषेत ते ‘विझग्’ या नावाने लोकप्रिय आहे. या विशाखापट्टणम् जवळ सिंहाचलम् नावाचे गाव आहे. त्या गावात नरसिंहाचे अतिशय प्रख्यात आणि जागृत असे देवस्थान आहे. स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की, इथेच हिरण्यकश्यपू, कयाधू आणि प्रल्हाद यांचा राजवाडा होता, नि इथेच नरसिंह अवतार प्रकट झाला.
 
आपल्याला माथेरान चांगलेच माहिती आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरचे ते एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुंबईकर इंग्रज सत्ताधार्‍यांना उन्हाळ्यात सुटी घालवायला, महाबळेश्वरपेक्षाही जवळ पडेल असे एक गिरिस्थान हवे होते. ठाणे जिल्ह्याचा इंग्रज कलेक्टर ह्यू मॅलेट याने, सन १८५०मध्ये माथेरानला गिरिस्थान बनवले. सन १८५४मध्ये मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन याने माथेरानला बंगला बांधला. तेव्हापासून माथेरान भरभराटत गेले. पण, म्हणजेच पेशवाई किंवा शिवशाहीच्या कालखंडात माथेरान अस्तित्वातच नव्हते. माथेरानच्या पठाराच्या लगत पेब किंवा विकटगड नावाचा अगदी छोटासा किल्ला मात्र होता.
 
आता पुढची गंमत पहा. एलफिन्स्टन कॉलेज हे मुंबई इलाख्यातले पहिले कॉलेज. खुद्द मुंबई विद्यापीठ स्थापन झाले १८५७ साली पण, एलफिन्स्टन कॉलेज त्याही आधीपासून म्हणजे १८३५ सालापासून विद्यादान करीत आहे. अनेक विद्वान लोक या कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून कारकीर्द गाजवून गेले. मायकेल मॅकमिलन हे ब्रिटिश प्राध्यापक १८७८ साली एलफिन्स्टनमध्ये आले. १९०७ साली ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. मॅकमिलन महाशयांना इतर अनेक विषयांबरोबरच, मराठ्यांच्या इतिहासाची फार आवड होती. इंग्रजी साहित्यात ‘शिव्हलरिक रोमान्स’ असा एक कादंबरी प्रकार रूढ आहे. कुणीतरी एकदा पराक्रमी ऐतिहासिक वीरपुरुष असतो, तो नानाविध कट-कारस्थाने, गूढ-रहस्यमय किल्ले, गुप्त खजिने, भुताटकी वगैरे रोमांचक घटनांमधून पार पडत, अखेर फक्कडशी सुंदरीदेखील पटकावतो, या नमुन्याच्या कादंबर्‍या म्हणजे ‘शिव्हलरिक रोमान्स.’ तर, प्राचार्य मॅकमिलन यांच्या मनावर, ग्रँट डफचा तीन खंडांमधला मराठ्यांचा इतिहास वाचून, छत्रपती शिवराय आणि सरसेनापती नेताजी पालकर यांच्या व्यक्तिमत्त्वांचा फारच प्रभाव पडला होता.
 
मॅकमिलन साहेब जरा सवड मिळाली की, माथेरानला जायचे. ते उत्तम ट्रेकर होते. ट्रेकर मंडळी सहसा सरळ वाटेने नेरळहून माथेरानला जात नाहीत. मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक गावातून एक वाट, माथेरानच्या ‘वन ट्री हिल’ या प्रसिद्ध कड्याखाली पोचते. कड्याच्या कातळात शिडीसारख्या खोबणी आहेत, त्यात हातपाय रोवत वर जाण्यात एक वेगळाच थरार आहे. १०० वर्षांपूर्वी प्राचार्य मॅकमिलनसुद्धा मुद्दाम या वाटेने जात असत. चौक हे एक सुंदर निसर्गरम्य गाव आहे. मॅकमिलन साहेबांनी नेताजी पालकर ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा धरून, एक ‘शिव्हलरिक रोमान्स’ प्रकारातली कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी असे कल्पिले की, चौक हे नेताजींचे गाव आहे. ‘वन ट्री हिल’ कड्याखाली एक गुप्त गुहा असते. तिथे एक गुरुमहाराज रहात असतात. ते नेताजींना उपदेश करतात की, तू पुण्याला जाऊन शिवरायांना सामील हो. पुढे नेताजींकडून त्या संतपुरुषाची माहिती ऐकून, खुद्द शिवराय त्यांच्या दर्शनासाठी त्या गुहेत येतात.
 
ही कादंबरी इंग्रजी वाचकांमध्ये फार लोकप्रिय झाल्यामुळे, मराठीतल्या ‘भारत गौरव ग्रंथमाले’साठी प्रभाकर श्रीपत भसे यांनी तिचे ‘शिवाजीचा उजवा हात अर्थात नेताजी पालकर - लेखक प्रभाकर’ या नावाने भाषांतर केले. ही १९२३ सालची गोष्ट. ही कादंबरी आहे, इतिहास नव्हे. पण, ती मराठीतही कमालीची लोकप्रिय झाली.
 
या कादंबरीवर आधारित तीन चित्रपट आत्तापर्यंत निघाले. १९२७ साली चित्रपती व्ही. शांताराम यांनी ‘नेताजी पालकर’ हा मूकपट काढला, तो तुफान चालला. १९३९ साली चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ‘नेताजी पालकर’ हा री-मेक बनवला, मात्र, तो बोलपट होता. तोही तुफान चालला. १९७८ साली पुन्हा दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी त्याच नावाचा री-मेक बनवला. दुर्दैवाने तोरण्यांचा चित्रपट शांताराम आणि भालजी यांच्या जवळपासही पोचू शकला नाही. पण, भालजींच्या ‘नेताजी पालकर’च्या अफाट यशामुळे, माथेरानमध्ये एक नवीन ‘मिथ’ तयार झाली. ती म्हणजे, चौक हेच नेताजी पालकरांचे मूळ गाव होते आणि ‘वन ट्री हिल’ कड्याखालची दगडातली शिडी चढून खुद्द शिवाजी महाराज माथेरानला आले होते, ही होय. त्यामुळे आता पर्यटन मार्गदर्शक नकाशात त्या शिडीला ‘शिवाजी’ज लॅडर’ - शिवाजी शिडी, असे नाव मिळाले आहे आणि चौक गावातल्या शाळेला सरनौबत नेताजी पालकरांचे नाव देण्यात आले आहे.
 
मार्को पोलो हा इटालियन प्रवासी, बाराव्या शतकात चीन आणि भारतात येऊन गेला. त्याच्या प्रवासवर्णनामुळे, युरोपात चीनबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले. मार्को पोलो इटलीमधले प्रख्यात शहर जे व्हेनिस तिथला रहिवासी होता. पण, आता क्रोशिया या देशाचे असे म्हणणे आहे की, पोलो घराणे मुळात अ‍ॅड्रियाटिक समुद्रातल्या कोरचूला या निसर्गरम्य बेटावर रहात असे, आणि ते बेट आज आमचे असल्यामुळे मार्को पोलो आमचाच.
 
अलेक्झांडर-द-ग्रेट हा महान योद्धा सनपूर्व तिसर्‍या शतकात ग्रीस देशात होऊन गेला. १९९१ साली ग्रीसच्या उत्तरेकडचा युगोस्लाव्हिया हा कम्युनिस्ट देश दुभंगला. त्यातून मॅकेडोनिया हा एक नवाच देश जन्मला. या मॅकेडोनियाचे म्हणणे असे की, अलेक्झांडर हा मॅकेडोनियन सम्राट फिलिप याचा मुलगा होता, असा प्राचीन ग्रंथांत उल्लेख आहे. तेव्हा तो आमचाच. प्राचीन इराणी साहित्यात सोहराब आणि रुस्तम यांची कथा फार प्रसिद्ध आहे. ते दोघे पिता-पुत्र असतात पण, त्यांच्याच लढाई होते आणि बापाच्या हातून मुलगा ठार होतो, अशी ती फार करुण कथा आहे. आता खरे पहाता ही घटना घडली तेव्हा किंवा फिरदौसी या प्रख्यात कवीने ती लिहिली तेव्हा, इराण हा मुसलमानी देश नव्हता. म्हणजेच सोहराब आणि रुस्तम हे झरतुष्टी किंवा अन्य संप्रदायाचे असावेत. पण, तमाम मुसलमान त्यांना आपलेच मानतात. यालाच म्हणतात मनुष्यस्वभाव!
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.