डीएफसीसी प्रकल्पासाठी कळंबोली–पनवेल दरम्यान विशेष ब्लॉक्स; रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम

Total Views |
Railway Traffic Block
 
पनवेल : ( Railway Traffic Block ) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कळंबोली परिसरात ११० मीटर लांबीचा आणि सुमारे १५०० मेट्रिक टन वजनाचा ओपन वेब गर्डर उभारण्यात येणार आहे. या मोठ्या व तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेद्वारे पनवेल–कळंबोली दरम्यान अप व डाऊन मुख्य मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक्सच्या अनुषंगाने काही ठिकाणी शॅडो ब्लॉक्सही परिचालित करण्यात येणार आहेत.
 
या कालावधीत पनवेल येथे चालू मार्गाखाली सबवे बांधकामासाठी तात्पुरता स्टील गर्डर बसविणे, पनवेल स्थानकावरील पादचारी पुलाच्या उभारणीचे काम तसेच पनवेल–कर्जत विभागातील जीर्ण अवस्थेतील पादचारी पुलाचे काढून टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. ही सर्व कामे रेल्वे पायाभूत सुविधांच्या सुरक्षितता आणि प्रवाशांच्या दीर्घकालीन सोयीसाठी करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
सदर विशेष ब्लॉक्स रविवार २५ आणि सोमवार २६ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री कळंबोली–पनवेल विभागात पहाटे १.२० ते ५.२० या चार तासांच्या कालावधीत असणार आहेत. या दरम्यान काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दौंड–ग्वाल्हेर एक्सप्रेस कर्जत–कल्याण–वसई रोड मार्गे वळविण्यात येणार असून कोकण कन्या एक्सप्रेस सोमटणे स्थानकावर पहाटे ३.५२ ते ५.२० वाजेपर्यंत थांबविण्यात येईल. मंगळुरू–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आपटा स्थानकावर २.५० ते ५.१५ वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येणार आहे.
 
हेही वाचा : आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही असणार 'स्वीकृत सदस्य'; महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
 
याशिवाय सावंतवाडी रोड–दादर तुतारी एक्सप्रेस जिते स्थानकावर पहाटे ४.१४ ते ५.१०पर्यंत, तर मंगळुरू–लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस पेण स्थानकावर ४.३२ ते ५.०५पर्यंत थांबविण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मडगाव मांडवी एक्सप्रेस सीएसएमटी येथून सकाळी ८.२० वाजता पुनर्निर्धारित करण्यात येणार असून, विभागातील गाड्यांचे रेग्युलेशन केल्यामुळे हुबळी–दादर एक्सप्रेस सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावेल.
 
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, भविष्यातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने डीएफसीसी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, पायाभूत सुविधांची मजबुती आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे ब्लॉक्स अपरिहार्य आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.