आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही असणार 'स्वीकृत सदस्य'; महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

    24-Jan-2026   
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : ( Chandrashekhar Bawankule ) महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त करण्यात यावेत, असा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "ग्रामीण भागात अनेक लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञ व्यक्ती विविध सामाजिक क्षेत्रांत उत्तम काम करतात. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत महिला आरक्षण किंवा एससी, एसटी आरक्षणामुळे अनेक अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींना निवडणूक लढवता येत नाही. अशा परिस्थितीत, या तज्ज्ञ लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामीण विकासासाठी व्हावा, या हेतूने त्यांना 'स्वीकृत सदस्य' म्हणून संधी दिली जावी, अशी आग्रही मागणी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि ग्रामविकास मंत्र्यांचीही याबाबत चर्चा करण्यात आली असून हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि त्यानंतर विधिमंडळात मंजुरीसाठी येईल."
 
हेही वाचा : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता
 
तसेच राज्यातील महापौर आरक्षणाच्या सोडती अत्यंत पारदर्शकपणे आणि कॅमेऱ्यांच्या निगराणीत पार पडल्या आहेत. अशा परिस्थितीत विजय वडेट्टीवार यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेणे किंवा कलंक लावणे हे त्यांना शोभणारे नाही, असेही ते म्हणाले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....