शिवरायांच्या गडकोटांचा वनस्पती संशोधक

    22-Jan-2026   
Total Views |
Dr Akshay Jangam
 
सह्याद्रीच्या खोर्‍यात आढळणार्‍या वनस्पतींवर काम करून किल्ल्यांवरील वनस्पतींवर लक्ष केंद्रित करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अक्षय प्रकाश जंगम याच्याविषयी...
 
या मुलाला बालपणापासूनच संशोधक व्हायचे होते. त्या नादापायी तो जंगलात रमला. तिथल्या वनस्पतींचा अभ्यास करू लागला. कोल्हापुरातील किल्ले पालथे घालून त्याने तिथल्या वनस्पतींची नोंद केली. ही नोंद करून त्या माध्यमातून नव्या वनस्पतींचा शोध लावला. वनस्पतीशास्त्रच आपल्या आयुष्याचे सूत्र बनवणारा हा मुलगा आहे, डॉ. अक्षय जंगम. कोल्हापूरच्या पन्हाळा आणि जोतिबाच्या कुशीत वसलेल्या केर्ले गावात दि. २५ मार्च १९९६ रोजी अक्षयचा जन्म झाला. एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचे बालपण गेले. मुळातच हुशार असलेल्या अक्षयला शालेय जीवनात विज्ञान विषयाची भुरळ पडली. अशातच इयत्ता सहावीत असताना अक्षयला डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम भेटले, ते त्यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकामधून. त्या पुस्तकामधल्या बर्‍याच संज्ञा अक्षयच्या समजण्यापलीकडच्या होत्या. मात्र, या पुस्तकामुळे आपल्यालादेखील कलाम यांच्यासारखे व्हायचे आहे, हे त्याने मनी पक्के केले. त्याचा महाविद्यालयीन प्रवास अर्थातच विज्ञान शाखेतून सुरू झाला. कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधून त्याने ‘लाईफ सायन्स’ विषयामधून शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
 
महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात अक्षयला पशू-पक्ष्यांची अधिक गोडी होतीच. या गोडीमुळेच तो पक्षी-निरीक्षणाकडे वळला होता. मात्र, दुसर्‍या वर्षात महाविद्यालयाने ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या विशेष सत्राचे आयोजन केले होते. या सत्रामध्ये यादव यांनी सह्याद्रीमधला वनस्पतींचा ठेवा विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. हे सत्र अक्षयच्या मनात उतरले आणि वनस्पतीशास्त्राच्या माध्यमातून सह्याद्रीमध्ये काम करण्याची त्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. या इच्छेला त्याने तिसर्‍या वर्षात ‘वनस्पतीशास्त्र’ विषय निवडून वाट मोकळी करून दिली. सुरुवात आजूबाजूची जैवविविधता जाणून घेण्यापासून झाली. यासाठी प्रा. विनोद शिंपले यांची त्याला मदत मिळाली. यादरम्यान, वनस्पती संशोधक डॉ. मयूर नंदिकर यांचे ‘केना’ या कुळातील वनस्पतींसंदर्भात मार्गदर्शन करणारे सत्र पार पडले. पदवीच्या शिक्षणानंतर वनस्पतीशास्त्रामध्येच आपण पदव्युत्तर आणि त्यानंतर ‘पीएचडी’पर्यंतचे शिक्षण आपण घेऊ शकतो, याचे उत्तर मिळाले.
 
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘वनस्पतीशास्त्र’ विषयात त्याचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण सुरू झाले. कल वनस्पतींच्या वर्गीकरणात म्हणजेच ‘टेक्सोनॉमी’कडे वळला. यादवांचा सहवास तर होताच. मात्र, प्रा. लेखक रोहित माने, जगदीश दळवी यांच्यासोबत तो वनस्पती गोळा करण्यासाठी जंगलात हिंडू लागला. पदव्युत्तर शिक्षणानंतर अक्षय ‘पीएचडी’च्या शिक्षणाकडे वळला. त्याचे शिक्षक डॉ. निलेश पवार यांनी त्यांना किल्ल्यांवरील वनस्पतींवर काम करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला अक्षयला रुचला. कारण, त्यानिमित्ताने अक्षयला छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले फिरायला मिळणार होते. शिवाय, त्याला वनस्पतीदेखील पाहायला मिळणार होत्या. त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास सुरू केला. जिल्ह्यातील १३ किल्ले त्याने उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी हंगामात पालथे घातले. या माध्यमातून त्याने ९०० वनस्पतींची नोंद केली. त्यामधील जवळपास २०० प्रजाती प्रदेशनिष्ठ होत्या. याकाळात त्याची ११ संशोधन वृत्ते आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्याने सहभाग नोंदवला. अखेरीस दि. ५ जुलै २०२५ रोजी त्याला ‘पीचएडी’ची पदवी मिळाली आणि डॉ. कलामांसारखे होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले.
 
‘पीएचडी’च्या संशोधनादरम्यान ‘सिरोपेजिया’ म्हणजेच कंदीलपुष्पाच्या एका नव्या प्रजातीचा त्याने शोध लावला. विशाळगडावरील सर्वेक्षणादरम्यान त्याला ही प्रजात मिळाली. त्यामुळे या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे त्याने ठरवले. त्यासाठी रतन मोरे, डॉ. निलेश पवार, डॉ. शरद कांबळे आणि डॉ. एस. आर. यादव या इतर मार्गदर्शक सहकार्‍यांसोबत त्याने चर्चा केली. या चर्चेअंती छत्रपतींचे नाव या प्रजातीला देण्याचे ठरले आणि जगात प्रथमच एखाद्या नव्या सजीवाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. नुकतेच अक्षयने दापोलीच्या सड्यावरून आपल्या इतर सहकारी संशोधकांच्या मदतीने कोच म्हणजेच ‘लेपिडागॅथिस’ प्रजातीमधील एका नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. या प्रजातीचे नामकरणही कोकणावरून करण्यात आले आहे. सध्या कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सह्याद्री आणि विविध किल्ल्यांवर असलेल्या जैवविविधतेचा अभ्यास करून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तो प्रयत्नशील असणार आहे. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.