खंबाटकी घाटाचा धोकादायक प्रवास संपणार; ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या ७ मिनिटांवर

पुणे–सातारा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित...

Total Views |
Khambatki Ghat Tunnel
 
मुंबई : ( Khambatki Ghat Tunnel ) पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. खंबाटकी घाटातील धोकादायक व वेळखाऊ प्रवास आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. नवीन खंबाटकी घाट बोगदा प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
 
४५ मिनिटांचा प्रवास आता अवघ्या ७ मिनिटांत
 
पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नवीन खंबाटकी घाट बोगद्याच्या डाव्या बाजूची लेन चाचणी तत्त्वावर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या बोगद्यामुळे घाट पार करण्यासाठी लागणारा सुमारे ४५ मिनिटांचा वेळ आता फक्त ७ मिनिटांवर आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा सुमारे ३८ मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. या प्रकल्पात 1.3 किमी लांबीचा बोगदा आणि 1.2 किमी लांबीचा व्हायाडक्ट समाविष्ट असून, वळणावळणाच्या घाट रस्त्याऐवजी थेट आणि वेगवान मार्ग उपलब्ध झाला आहे.
 
धोकादायक ‘एस’ वळणाला कायमचा फाटा
 
खंबाटकी घाटातील इंग्रजी ‘एस’ आकाराचा तीव्र वळणांचा रस्ता अपघातप्रवण म्हणून ओळखला जात होता. अरुंद रस्त्यामुळे वेग कमी होत असे आणि विशेषतः शनिवार-रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी येथे किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी व्हायची. अवजड वाहनांसाठी हा चढण मोठे आव्हान ठरत असे. मात्र नव्या बोगद्यामुळे हा धोकादायक मार्ग टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
 
हेही वाचा : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण येथे ग्रोथ सेंटर; तब्बल एक लाख कोटींच्या गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब
 
प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि पुढील टप्पे
 
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाले होते. कोव्हिड-19 महामारीमुळे कामात काही काळ अडथळे आले, तरी आता प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. खंबाटकी घाटात प्रत्येकी तीन लेनचे दोन बोगदे उभारण्याचे नियोजन असून मार्च 2026 ही अंतिम मुदत आहे. सध्या डाव्या बाजूची ट्यूब चाचणीसाठी सुरू करण्यात आली असून उजव्या बाजूची ट्यूब जून 2026 पर्यंत पूर्ण करून संपूर्ण प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट रस्ते विकास विभागाने ठेवले आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.