दावोस : ( Raigad–Pen Growth Centre ) दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने शहरी आणि औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले असून तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड–पेण ग्रोथ सेंटरची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ही घोषणा करताना सांगितले की, हा प्रकल्प महाराष्ट्राच्या भविष्यातील नागरी विस्ताराचा आणि आर्थिक क्षमतेचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या १५ ते २० किलोमीटर अंतरावर हे ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येणार असून, गेल्या तीन–चार वर्षांपासून सुरू असलेल्या परवानगी प्रक्रियेनंतर आता हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. रायगड–पेण परिसरात उभारले जाणारे हे ग्रोथ सेंटर म्हणजे तिसऱ्या मुंबईतील पहिले नियोजित शहर ठरणार आहे.
या ग्रोथ सेंटरची संकल्पना ‘प्लग अँड प्ले’ आणि ‘रेडी टू स्टार्ट’ अशी असून, उद्योग, स्टार्टअप्स आणि सेवा क्षेत्रातील घटकांना तात्काळ कामकाज सुरू करता येईल अशी संपूर्ण पायाभूत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा देशातील पहिल्या प्रकारचा सार्वजनिक–खासगी भागीदारी (PPP) तत्वावर आधारित प्रकल्प असून, शासन, एमएमआरडीए आणि खासगी गुंतवणूकदार एकत्रितपणे या शहराचा विकास करणार आहेत.
रायगड–पेण ग्रोथ सेंटरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट उभारण्यात येणार आहे. येथे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स, फिनटेक इकोसिस्टम, आधुनिक कार्यालयीन संकुले, उच्च पगाराच्या नोकऱ्या आणि ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेवर आधारित शहरी सुविधा विकसित होतील. या शहरातून रोजगारनिर्मितीबरोबरच उच्च दर्जाचे जीवनमान उपलब्ध होणार आहे.
या घोषणेनंतरच सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून, यासाठी जगभरातील दिग्गज कंपन्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोरिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, फिनलंड, दुबई आणि सिंगापूरमधील आघाडीच्या उद्योग समूहांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या परकीय गुंतवणुकीतून रायगड–पेण परिसरात एक आधुनिक, टिकाऊ आणि जागतिक दर्जाचे शहर उभे राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, रायगड–पेण ग्रोथ सेंटर ही केवळ एक औद्योगिक संकल्पना नसून, ती तिसऱ्या मुंबईच्या विकासाचा पाया आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचा जागतिक गुंतवणूक नकाशावरचा दर्जा अधिक उंचावणार असून, भविष्यातील शहरी भारताचे हे एक महत्त्वाचे मॉडेल ठरणार आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.