मुंबई : ( BKC to Transform with $8 Billion Global High Street District ) दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महाराष्ट्राच्या शहरी विकास क्षमतेचा जागतिक पटलावर ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एमएमआरडीए आणि जपानच्या सुमितोमो रिअल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड यांच्यात वांद्रे–कुर्ला संकुलातील (बीकेसी) हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) स्थानक व परिसरात जागतिक दर्जाचा ‘हाय स्ट्रीट डिस्ट्रिक्ट’ विकसित करण्यासाठी ८ अब्ज डॉलर्स (सुमारे ७२,८०० कोटी रुपये) गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करून बीकेसीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक, पर्यटन व नागरी केंद्र म्हणून विकसित करणे हा आहे. बुलेट ट्रेन स्थानकाभोवती वाहतूक-केंद्रित विकासाच्या संकल्पनेतून आधुनिक, स्मार्ट आणि शाश्वत शहरी जिल्हा उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
या ‘हाय स्ट्रीट डिस्ट्रिक्ट’मध्ये हाय-स्ट्रीट रिटेल व अनुभवात्मक बुलेव्हार्ड्स, प्रिमियम व्यावसायिक व कार्यालयीन जागा, जागतिक दर्जाच्या आदरातिथ्य सुविधा, अधिवेशन व व्यवसाय पर्यटन पायाभूत सुविधा, सार्वजनिक शहरी जागा, प्लेसमेकिंग आणि स्मार्ट डिजिटल शहरी प्रणालींचा समावेश असेल. यामुळे बीकेसी हे केवळ आर्थिक केंद्र न राहता एक बहुआयामी जागतिक शहरी हब म्हणून विकसित होणार आहे.
या प्रकल्पातून अंदाजे ८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित होणार असून सुमारे ८० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
अंमलबजावणीची जबाबदारी
या करारानुसार एमएमआरडीए भूखंड निश्चित करणे, नियोजन परवानग्या, मुख्य पायाभूत सुविधा आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर सुमितोमो रिअल्टी भांडवल उभारणी, गुंतवणूक संरचना, मास्टर प्लॅनिंग, विकास आणि जागतिक मानकांनुसार दीर्घकालीन मालमत्ता व्यवस्थापन करणार आहे. या सामंजस्य करारावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि सुमितोमो रिअल्टीचे अध्यक्ष कोजुन निशिमा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मुंबईपासून दावोस पर्यंत, एमएमआरडीए भारताच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या नागरी क्षेत्राच्या विकासाची नवी गाथा लिहित आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.