सागरप्रेमींचा भरला मेळा

    19-Jan-2026   
Total Views |

मानवी उत्क्रांतीत सागरांचे महत्त्व अपार आहे. भारतासाठी ‌‘निळी अर्थव्यवस्था‌’ म्हणजे आर्थिक संधींचा एक विशाल महासागर, जो उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याविषयी ऊहापोह करणारा ‌‘सागर महोत्सव‌’ (सीव्हर्स) नुकताच रत्नागिरीत पार पडला. या महोत्सवाचा आढावा घेणारा लेख...


महासागरासोबत नाळ जुळवून देणारा ‌‘आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशन‌’ आयोजित चौथा सागर महोत्सव दि. 15 ते दि. 18 जानेवारीदरम्यान रत्नागिरीत पार पडला. रत्नागिरीच्या अंबर सभागृहात पार पडलेला हा कार्यक्रम यंदापासून ‌‘सीव्हर्स‌’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यात सागराचे मोठे योगदान आहे. सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे आणि त्यातून संवर्धनकार्याची प्रेरणा देणे, याच ध्येयातून चार वर्षांपूव रत्नागिरी जिल्ह्यात ‌‘आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशन‌’कडून ‌‘सागर महोत्सवा‌’ची सुरुवात करण्यात आली. सागराशी मैत्री साधत ‌‘आसमंत‌’च्या माध्यमातून त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रयत्न करत आहे. यंदाच्या सागर महोत्सवाला ‌‘महाराष्ट्र पर्यटन विभाग‌’ आणि ‌‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा‌’चे प्रायोजकत्व मिळाले. चौथ्या सागर महोत्सवाचे (सीव्हर्स) उद्घाटन शुक्रवार, दि. 16 जानेवारी रोजी ‌‘पद्मश्री‌’ डॉ. शैलेश नायक यांच्या हस्ते पार पडले. त्यापूव गुरुवार, दि. 15 जानेवारी रोजी कांदळवन सफारी आणि किनारा फेरी यांचे आयोजन करण्यात आले होते. यामधील कांदळवन सफारीला हेमंत कारखानीस आणि शांभवी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तर किनारा सफारीमध्ये सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. अमृता भावे, डॉ. विशाल भावे आणि प्रदीप पाताडे (कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन) यांनी भाट्ये आणि मांडवी खडकाळ व वालुकामय किनाऱ्यावरील जैवविविधता उपस्थितांना उलगडून दाखवली. ‌‘सागर महोत्सवा‌’च्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ज्येष्ठ सागरी शास्त्रज्ञ बबन इंगोले यांनी सागरामधील खाणकाम, पर्यावरण संवादक संतोष शिंत्रे यांनी पर्यावरणीय संवादाचे महत्त्व, तरुण सागरी संशोधिका डॉ. ईषा बोपडकर यांनी सागरी सस्तन प्राण्यांच्या संवादाची भाषा याविषयी व्याख्यान दिले. शनिवारी पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी ‌‘समुद्री कासव उपचार व संवर्धन‌’ यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर मांडे यांनी हवामान बदलामध्ये नागरी सहभाग याविषयी आणि ‌‘एनआयओ‌’चे डॉ. समीर डामरे यांनी सागरी संसाधनांवर व्याख्यान दिले. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी महासागराचे महत्त्व याविषयी आणि पर्यटन विभागाच्या माजी उपसंचालक शमा पवार यांनी ‌‘जबाबदार पर्यटन‌’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यादरम्यान रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर आणि पुण्याच्या फर्ग्युसनच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‌‘जबाबदार पर्यटन‌’ या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. महोत्सवाला फर्ग्युसन, आबासाहेब गरवारे, एसएनडीटी-पुणे, गोगटे-जोगळेकर आणि रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयातील विद्याथ आणि शिक्षक उपस्थित होते.


जबाबदार पर्यटनासाठी आपण तयार आहोत का ?

पर्यटन वाढीला काही मर्यादा आहेत. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ ही पर्यटन विभागाच्या मालकीची नाहीत. त्यामुळे त्यांच्या विकासाचे निर्णय घेताना वेगवेगळ्या विभागांसोबत काम करावे लागते. सध्या पर्यटन विभागासमोर पर्यटक हे नव्या पर्यटन स्थळी पोहोचण्यापूव तिथे सोयीसुविधा निर्माण करण्याचे आव्हान आहे. पर्यटन स्थळी पर्यावरणपूरक साधन सामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे. उदा. शिवनेरी किल्ल्‌‍यावर शिवजन्मोस्तव साजरा करण्यासाठी प्लास्टिक फुलांचा वापर केला जात होता. वापरानंतर ही फुलं दरीत फेकून दिली जायची. हे पर्यटन विभागाच्या लक्षात आल्यावर आम्ही प्रशासनासा प्लास्टिकच्या फुलांचा वापर बंद करुन खर्या फुलांचा वापर करण्यास सांगितले. पर्यटक हे पर्यटन स्थळावर जाऊन कार्बन फूटप्रिंट वाढवत आहेत. जबाबदार पर्यटन करताना आपण त्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून तयार आहोत का, याचा विचार करावा लागणार आहे. पर्यटक, गाईड, स्थानिक लोकं यांनी जबाबदार पर्यटन कसे करावे यांविषयी जागृती करणे हे विभागासमोरील आव्हान आहे. लोकांनी आपली लाईफस्टाईल ही पर्यावरण पूरक करणे आवश्यक आहे. Environmental impact assessment विषयी नागरिकांनी सजक असणे आवश्यक आहे. आसमंतने सागराकडे कसे पहावे हे या महोत्सवाच्या माध्यमातून शिकवले तसेच धोरण निर्मितीसाठी आणि तज्ज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.
- शमा पवार, माजी उपसंचालक, महाराष्ट्र पर्यटन विभाग

निसर्ग-पर्यावरणाविषयी बोलण्याची गरज

कोणत्याही पद्धतीने सृष्टीबाबतचे विषय किंवा प्रश्न यांची समाजात चर्चा होणे आणि त्यानिमित्ताने सृष्टी, निसर्ग, पर्यावरण यांच्याशी माणसाच्या असणाऱ्या संबंधांचा, नात्याचा ऊहापोह होणे, ही पर्यावरणासाठी किंवा समग्र सृष्टीसाठी हिताचीच गोष्ट ठरते. कारण त्याद्वारा मनुष्य आपले समग्र सृष्टीशी असलेले नाते पारखून पाहू शकतो. ते सृष्टीपूरक आहे की संहारक, साधक आहे की बाधक हे तपासून पाहू शकतो. काही ठिकाणी आपली समज किंवा माहिती कमी पडत असेल तर ती दुसऱ्यांकडून मिळवू शकतो. सृष्टीविषयक संवादाचे व्यापक सामाजिक कार्य म्हणजे, एखादी गोष्ट अर्थवाही होण्यासाठी, तिला निश्चित असा अर्थ प्राप्त होण्यासाठी त्याचा खूपच उपयोग होतो. कुठलेही संज्ञापन/संवाद मुळात, आपण जगातल्या विविध वस्तू, घटना, परिस्थिती, संकल्पना यांकडे आपण कसे पाहतो, याची आपली दृष्टी तयार करत असते.
- संतोष शिंत्रे, पर्यावरण संवादक

विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

आसमंतसागर महोत्सव सीव्हर्स खूप यशस्वी झाला. सागर आणि परिसंस्था या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित श्रोत्यांना उत्तम मार्गदर्शन केले. महत्त्वाचे म्हणजे यावेळी श्रोत्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. पुणे, सिंधुदुर्ग, मुंबई आणि रत्नागिरी येथील शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ सागरमहोत्सवात नेटाने उपस्थित होते, तर कांदळवन सफर आणि किनारा फेरीच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून मिळाली माहिती त्यांना प्रत्यक्ष पाहता आली. गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही राष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञांना या महोत्सवामध्ये सामावून घेतले. पुढच्या वर्षापासून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञांना आमंत्रित करणार आहोत.
- नंदकुमार पटवर्धन, आयोजक

पूर्वसूचना देणाऱ्या मॉडेलच्या विकासाची गरज

साधारण 90 लाख लोक हे सागरी मासेमारीवर अवलंबून असून सात लाख मासेमार आहेत. गिलनेट पद्धतीने होणारी मासेमारी वाढत आहे. तारली आणि बांगडा यांसारखे मासे हे भारताच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे सरकत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला सागराच्या वेगवेगळ्या घटकांसंबंधी पूर्वसूचना आणि अंदाज वर्तवणारी मॉडेल विकसित करावी लागणार आहेत. फिश स्टॉक प्रिडेक्शन मॉडेल, जेलीफिश आणि ॲल्गे ब्ल्यूमसंदर्भात पूर्वसूचना देणारी मॉडेल, कोरलचे आम्लिकरण होण्यापासून रोखण्यासाठी पूर्वसूचना देणारी मॉडेल विकसित करण्याची गरज आहे. आम्लिकरणाच्या प्रक्रियेला कोरल आता सरावल्या असून त्या परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता त्यांनी विकसित केली आहे.
- ‌‘पद्मश्री‌’ डॉ. शैलेश नायक, ज्येष्ठ सागरी शास्त्रज्ञ

सागर वाचला, तर मानवजात वाचेल

पर्यावरणशास्त्र हा विषय शिकण्याचा नाही, तर तो जगण्याचा भाग आहे. या शिक्षणामुळे आपले चारित्र्य उत्तम राहते. महासागरात राहणारे सस्तन प्राणी हे महासागराच्या आरोग्याचे प्रतीक आहेत. ते स्थलांतर आणि हालचालींच्या माध्यमातून आपल्याला समुद्रात घडणाऱ्या घटनांच्या बदलांची पूर्वसूचना देत असतात. मच्छीमार हे समुद्रावरील लाटांचा रंग समजून, हवा पाहून आपल्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून मासेमारीला जायचं का, हे ठरवितात. अशा ज्ञानाचा वापर आपण संवर्धनाच्या कामात करणे आवश्यक आहे. सध्याचे निसर्ग पर्यटन हे संवर्धनाच्या कामात मूल्यवर्धन करणारे आहे. आजही महासागरातील अनेक प्रजातींचा उलगडा होणे शिल्लक आहे. आज नैसर्गिक परिसंस्थेत होणारा छोटा बदल हादेखील मोठ्या स्तरावर परिणाम करणारा आहे. हवामानबदलाचेदेखील तसेच आहे. त्यामुळे त्याविषयी धोरणनिर्मिती करताना स्थानिकांना हाताशी धरून ते धोरण त्या त्या अधिवासाला केंद्रित करून तयार करणे आवश्यक आहे. सागरी संरक्षित क्षेत्रांच्या निर्मितीमध्ये स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचे असून सीआरझेड क्षेत्रातील राहणाऱ्या लोकांच्या विकासाचा वाटा खुल्या करणे आवश्यक आहेत.
- डॉ. संजय देशमुख, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.