मराठ्यांची हिंदुत्वाची भगवी मशाल... हिरवी नव्हे!

    12-Jan-2026   
Total Views |

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले असून, त्यांनी स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी ‌‘मराठी अस्मिते‌’चे राजकारण सुरू केले आहे. ‌‘मराठी अस्मिते‌’चा कैवार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनीही घेतला असला, तरी त्यांचे हिंदुत्व खरे होते. मात्र, सध्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ठाकरे बंधूंच्या मशालीमधील तेल हिरवे आहे, हेच खरे!

ठाकरे बंधू एकत्र आले, ही चर्चा खूप रंगात आली आहे. ‌‘ठाकरे ब्रॅण्ड‌’ हा शब्दप्रयोग केला जातो. दोघा बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ‌‘मराठी अस्मिते‌’चा मुद्दा उचलून धरला आहे. मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्त्व धोक्यात आले असून, ‌‘मराठी अस्मिता‌’ टिकविण्यासाठी, तसेच मराठी माणसाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असेच दोघेजण जोरजोराने सांगत आहेत.

मराठी माणसाला एक गोष्ट माहीत आहे; ती म्हणजे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचे राजकीय अस्तित्व मुंबई आणि महाराष्ट्रात पणाला लागले आहे. जर आपण एकत्र आलो नाही, तर आपले अस्तित्व नगण्य होईल, अशीच भीती त्यांना वाटते आणि ती खरीही आहे. राजकीय नेते आणि पक्ष हे चुकूनही असे म्हणत नाहीत किंवा म्हणू शकत नाहीत की, आमचा लढा आमच्या अस्तित्वरक्षणासाठी सुरू आहे. ते तसे म्हणत नसले, तरी सामान्य जनता ते समजतात तितकी काही मूर्ख नसते. या जनतेला हे पूर्णपणे माहीत आहे की, हे दोघेही बंधू आज ‌‘तुझ्या गळां माझ्या गळां, गुंफू मराठीच्या माळा,‌’ असे जरी म्हणत असले, तरी आपल्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे, ती रोखण्याचा त्यांचा केविलवणा प्रयत्न चालू आहे.

त्यांचा संघर्ष शिवसेना (शिंदे) आणि भाजपशी सुरू आहे. भाजपने व्यापक हिंदुत्वाची आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेतली आहे. याचा अर्थ असा झाला की, ठाकरे बंधूंचा संघर्ष हिंदुत्व आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या विरुद्ध चालू आहे. मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्रदीर्घ काळ शिवसेनेच्या (आधीच्या) हातात होती आणि त्यांच्याच काळात मुंबईतील मराठी लोकसंख्या कमी कमीच होत गेली. मुंबईतील राहत्या जागेच्या किमती गगनाला भिडल्या. मध्यमवगय मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या. मुंबईतील प्रमुख उद्योग कापडगिरण्या बंद झाल्या. लाखो मराठी कुटुंबे उघड्यावर पडली. त्यांच्या पुनर्वसनासाठी किंवा त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी शिवसेनेने काहीही केले नाही. मुंबईतील अनेक मोठमोठे कारखाने बंद पडले आणि अनेक मुंबईबाहेर गेले. ते रोखण्यासाठी शिवसेनेने काहीही केले नाही. आता त्यांना मराठी माणसाचा पुळका आला असून, हे ‌‘पुतना मावशीचे प्रेम‌’ आहे, हे सामान्य मराठी माणसाला समजते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्काचा लढा सुरू केला. तो त्यांनी परखड भाषेमध्ये मांडला. त्यांची कळकळ प्रामाणिक होती. ‌‘सत्तेसाठी हा लढा आहे,‌’ असे त्यांनी कधी म्हटले नाही. ‌‘मराठी अस्मिता‌’ आणि ‌‘हिंदू अस्मिता‌’ यांची त्यांनी फारकत केली नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आपले दैवत मानले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा केली. त्यांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणाले,

‌‘बुडाला औरंग्या पापी| म्लेंच्छसंव्हार जाहाला|
मोडलीं मांडली छेत्रें| आनंदवनभुवनी‌’

याचा अर्थ असा झाला की, मराठा शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म, हिंदू अस्मिता, हिंदू जीवनमूल्ये, यांचे रक्षण केले. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराजांच्या या अस्मितेची मशाल महाराष्ट्रात पेटविली. त्या धगधगीत राष्ट्रभक्तीचे, भारतीय अस्मितेचे तेल होते. आताची मशाल हिरवट तेलाने जळत आहे. ज्या हिरव्यांचा उल्लेख बाळासाहेब ‌‘पाकडे‌’ अशा भाषेत करत, त्यांचे हे दोन शिलेदार आता त्यांच्या दाढ्या कुरवाळत बसले आहेत. अशा तोंडाना ‌‘मराठी अस्मिते‌’चा उच्चार करताना लाज वाटली पाहिजे. औरंगजेबदेखील त्याच्या कबरीत थरथरला असेल, असे बाळासाहेब म्हणत. ज्या समर्थांनी ‌‘बुडाला औरंग्या पापी...‌’ असे म्हटले, त्या औरंग्याच्या मानसिकतेला थडग्यातून बाहेर काढण्याचे काम हे दोन बंधू करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कविभूषण यांनी म्हटले की, ‌‘न होत शिवाजी, तो सुन्नत हो सब की‌’ म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिंदूंची सुंता झाली असती. या वाक्याला फार मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. हिंदुत्वाच्या अस्मितेने भारावलेले महाराजांचे मराठे अटकेपार गेले. ‌‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा‌’ ही ओळ लिहिण्याची स्फूर्ती एका कवीला झाली. आपल्या धर्माचे आणि दिल्लीचे रक्षण करण्यासाठी मराठे पानिपतावर गेले. एक लाख शूर मराठ्यांनी, त्या रणभूमीवर हौताम्य पत्करले. ‌‘खून दिया है, मगर नही दी कभी देश की माटी...‌’ असा आपला मराठ्यांचा गौरवपूर्ण इतिहास.

एका इतिहासकाराने किस्सा सांगितला. नागपूरला ‌‘अखिल भारतीय शिक्षक परिषद‌’ होती. या परिषदेला बंगालचे काही शिक्षक आले होते. त्यांनी आयोजकांना विनंती केली की, आम्हाला भोसलेंना भेटायचे आहे. ते त्यांना भेटायला गेले. औपचारिक बोलणे झाल्यानंतर त्यांनी महाराजांना एक प्रश्न विचारला, “तुमचे रघुजीराजे भोसले ढाक्यापर्यंत का गेले नाहीत; ते हुबळीपर्यंतच का थांबले?” महाराजांना त्या प्रश्नाचा रोख कळला नाही. त्यांनी विचारले, “तुम्हाला काय म्हणायचे आहे?” तेव्हा ते शिक्षक म्हणाले, “मराठे ढाक्यापर्यंत गेले असते, तर बंगालची फाळणीच झाली नसती. पाकिस्तान निर्माण झाले नसते!” ज्या ज्या भूमीला मराठ्यांचे पाय लागले, ती भूमी भारतात राहिली. हेच मराठ्यांचे भारतीयत्व आहे. ऊर अभिमानाने भरून यावा, मान ताठ व्हावी आणि चालण्यात जबरदस्त आत्मविश्वास यावा, असा आपल्या पूर्वज मराठ्यांचा इतिहास आहे. त्याचे स्मरण आपण नित्य ठेवले पाहिजे.

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा विचार, कुणाच्याही मनात येऊ शकणार नाही. ज्यांच्या मनात हा विचार होता, ते आता दिल्लीत सत्तेवर नाहीत. आज गरज आहे, ती मराठी माणसाला त्याच्या राष्ट्रीय अस्मितेची ओळख करून देण्याची. ‌‘पूर्व दिव्य ज्यांचे रम्य भावी काळ त्यांचा‌’ ही काव्यपंक्ती आपण स्मरणात ठेवली पाहिजे. मराठी अस्मिता शिववडापाव विकण्यात नाही, मराठी अस्मिता सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटमध्ये पराक्रम करण्यात आहे. मराठी अस्मिता लता मंगेशकरांसारखे विश्वविक्रमी गाण्यात आहे. मराठी अस्मिता बाबासाहेब आंबेडकरांसारखी प्रचंड बुद्धिमत्ता धारण करण्यात आहे. मराठी अस्मिता विनोबा भावे, महष कर्वे, महात्मा जोतिराव फुले यांच्यासारख्या त्याग-तपस्येत आहे. मराठी अस्मिता नाट्यक्षेत्रातील बालगंधर्वांसारख्या दिग्गजांत आहे. मराठी अस्मिता नारळीकरांसारख्या महान संशोधकात आहे. मराठी अस्मिता अण्णासाहेब किर्लोस्करांच्या उद्योजकतेत आहे; ती स्वतःचे अस्तित्वरक्षणासाठी झगडणाऱ्या बोलघेवड्या बंधूंच्या ब्रॅण्डमध्ये नाही!

- रमेश पतंगे