फोर्स रिकनायसन्स - मस्ती, उछलकूद आणि कमालीचा संयम

Total Views |
War
 
प्रतापगडाच्या माचीवर अफजलखान आणि शिवराय यांची भेट झाली. शिवरायांनी खासा अफजलखान ठार केला, तर त्यांच्या दहा अंगरक्षकांनी खानाचे दहाही अंगरक्षक ठार केले. मग, इशारतीची तोफ वाजली. त्या खुणेच्या तोफेसरशी गडाखाली जावळीच्या खोर्‍यात महाराजांच्या दबा धरून बसलेल्या सैन्याने, खानाच्या छावणीवर झडप घातली. हे सगळे आपल्याला माहीतच आहे. महाराज आणि खान यांची भेट साधारण दुपारी दीड वाजता झाली. पण, हे मावळे तर पहाट होण्यापूर्वी अंधारातच खानाच्या छावणीभोवती दबा धरून बसले होते. म्हणजेच, पहाटे सुमारे पाच ते दुपारी दीड असे साधारण साडेआठ तास शत्रूला जराही चाहूल लागू न देता ते दबा धरून बसलेले होते. प्रश्न असा पडतो की, इतक्या कमालीच्या संयमाने, सावधपणे लष्करी हालचाली करण्याचे प्रशिक्षण शिवरायांनी आपल्या या मावळ्यांना कसे नि केव्हा दिले असेल?
 
सध्या अमेरिकन वायुदलाचे ‘डेल्टा फोर्स’ हे पथक एकदम चर्चेत आहे. परवा दि. ३ जानेवारीला ‘डेल्टा फोर्स’च्या जवानांनी दक्षिण अमेरिका खंडातल्या व्हेनेझुएला या देशाची राजधानी काराकासमधल्या राष्ट्राध्यक्ष निवासावर सरळ हल्ला केला. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोअर्स यांना ताब्यात घेतले, विमानात चढवले आणि न्यूयॉर्कला घेऊन आले. आता यावरून जगभरच्या सर्व माध्यमांवर प्रचंड चर्चा चालू आहेत. पण, आपण या ठिकाणी एका वेगळ्याच मुद्याबद्दल समजून घेणार आहोत. तो मुद्दा आहे, अमेरिकेच्या मरीन कोअर दलातील ‘फोर्स रिकनायसन्स’मधील सैन्यगळतीचा.
 
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध १७७५ ते १७८३ या काळात झाले. तेव्हा विमानदल अस्तित्वातच नव्हते. ज्या ब्रिटनविरुद्ध अमेरिकन क्रांतिकारकांनी युद्ध पुकारले होते, तो ब्रिटनही त्यावेळी एक सागरी महासत्ता होती. त्यामुळे क्रांतिकारकांनी ब्रिटनविरोधात पायदळ आणि नौदल अशा दोन्ही अंगांनी चांगलीच तयारी केलेली होती. पण, स्वातंत्र्ययुद्ध ऐन भरात आल्यावर अमेरिकन स्वातंत्र्ययोद्ध्यांना अशा एका सैन्यदलाची गरज भासू लागली की, जे दल भूमीवर किंवा समुद्रावर कुठेही सारख्याच क्षमतेने हालचाली करू शकेल. या गरजेतून ‘मरीन कोअर’ या नव्या दलाची निर्मिती झाली. हे दल स्वातंत्र्ययुद्घात लढते; नंतर १८६१च्या अमेरिकन यादवी युद्घात लढले; १९१४ ते १९१८च्या पहिल्या महायुद्घात; १९३९ ते १९४५च्या दुसर्‍या महायुद्घात; १९५० ते १९५३च्या कोरियन युद्घात; १९६८ ते १९७५च्या व्हिएतनाम युद्घात आणि २००१ पासून आतापर्यंत सुरू असलेल्या अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्घातही ते लढतेच आहे. एकंदरीत, ‘अमेरिकन मरीन कोअर’ हे जगभरच्या सर्व व्यावसायिक सैन्यदलांमध्ये एक अतिशय कुशल, तरबेज आणि भूमी, समुद्र व आकाश अशा कोणत्याही क्षेत्रामधल्या युद्घाचा प्रदीर्घ अनुभव असलेले असे मुरब्बी सैन्यदल आहे.
 
कोणत्याही क्षेत्रामध्ये शारीरिक आणि मानसिक ताणतणाव असतातच. सैन्यदलांमध्ये तर ते अधिकच असतात. कारण, इथे ‘मृत्यू’ नामक एका सर्वभक्षक शक्तीची सावली अखंडच तुमच्यावर असते. एकतर तुम्ही शत्रूला मृत्यूच्या जबड्यात ढकलत असता किंवा शत्रू तुम्हाला ढकलत असतो. म्हणजेच, मृत्यूचे भय प्रत्येक क्षणाला तुमच्या मनात जागे असते. या भीतीवर मात कशी करावी, किंबहुना भीतीचेच रूपांतर हिमतीत कसे करावे, हेच तर सैनिकी प्रशिक्षणात घोटवून घेतले जाते.
 
पण, ताणतणाव हे फक्त मृत्यूच्या भीतीपुरतेच असतात, असेही नाही. इतर बारीक-सारीक गोष्टीही असतात, ज्यामुळे तुमच्या युद्धक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ती कमी होऊ शकते, घटते आणि अशी ती घटणे म्हणजे पराभवाला आमंत्रणच.
असाच काहीसा प्रकार ‘अमेरिकन मरीन कोअर’च्या संदर्भात होतोय की, काय अशी चिंता सेनाश्रेष्ठींना वाटू लागली. निमित्त घडले ‘मरीन कोअर’ मधल्या ‘फोर्स रिकनायसन्स’ या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे. फार मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवार या प्रशिक्षणात नापास होऊ लागले किंवा स्वतः होऊन बाहेर पडू लागले. असे का बरे व्हावे?
 
‘रिकनायसन्स’ म्हणजे टेहळणी, चाचपणी, पूर्वपाहणी. कोणत्याही युद्धामध्ये शत्रूची तयारी आजमावण्यासाठी पूर्वपाहणी करणे फार महत्त्वाचे असते. त्यावरून मग सेनापती आपले आडाखे बांधून व्यूहरचना करतो. अमेरिकन मरीन कोअर मधले ‘फोर्स रिकनायसन्स’ हे टेहळणी पथक अत्याधिक कुशल अशाच उमेदवारांमधून बनवले जाते. याकरिता असलेला त्यांचा प्रशिक्षण वर्ग हा तब्बल २५ दिवसांचा असतो. मरीन कोअर किंवा नौदल यातले उमेदवार निवडले जातात. पाठीवर रायफलींसह २३ किलो सामग्रीचे ओझे घेऊन १२ किमी धावणे, हात-पाय बांधलेल्या स्थितीत ९० मीटर अंतर पोहणे, पाण्यात हात-पाय न मारता, फक्त नाक पाण्याबाहेर ठेवून एक तास तरंगत राहणे, असे शरीर आणि मनाचा कस पाहणारे कार्यक्रम त्यांच्या प्रशिक्षणात असतात.
प्रशिक्षण अधिकार्‍यांना असे आढळले की, या खडतर प्रशिक्षणात निम्मे उमेदवार नापास होतात आणि पास झालेल्यातले निम्मे, आम्हाला ‘फोर्स रिकनायसन्स’मध्ये यायचे नाही’ म्हणून माघार घेतात. असे का होतेय? बरे, मरीन कोअर किंवा नौदलातल्या त्यांच्या नेहमीच्या पथकातल्या सेवेसाठी त्यांची जी काही आवश्यक क्षमता आहे, ती कमी झालीय का? तर नाही. ती क्षमता योग्य तेवढी आहे. मात्र, टेहळणी पथकासाठी जी आणखीन जास्त तीव्र क्षमता हवी, ती त्यांच्याकडे नाही किंवा ती असूनही त्यांना ते काम नको आहे. असे का व्हावे? हे शोधून काढण्याचे काम सेनाश्रेष्ठींनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. लेस्ली सॅक्सन या बाईवर सोपवले.
 
प्रा. लेस्लीबाईंनी प्रशिक्षणासाठी आलेल्या नव्या १२१ लोकांच्या तुकडीला, प्रत्येकी एक ‘आय- फोन’ आणि एक ‘अ‍ॅपल’चे इलेक्ट्रॉनिक घड्याळ दिले. प्रशिक्षण चालू असताना उमेदवाराची शारीरिक स्थिती कशी राहील? कोणत्या कार्यक्रमात त्याचा रक्तदाब कमी-जास्त होईल? कोणत्या कार्यक्रमात हृदयाचे ठोके कमी-जास्त होतील? कोणत्या कार्यक्रमात शरीरातल्या कॅलरीज जास्त खर्च होतील? तसेच तो रोज किती अन्न आणि किती पाणी घेतो आहे? या सगळ्याचा हिशोब ‘अ‍ॅपल’ घड्याळाने ठेवला. तर, ‘आय-फोन’वरून त्याला रोज काही प्रश्न विचारले जात. मानसशास्त्रज्ञ माणसाच्या स्वभावाच्या काही वैशिष्ट्यांकडे विशेष लक्ष पुरवतात. त्यात हे लोक तर सैनिक आणि त्यात पुन्हा विशिष्ट दर्जाचे सैनिक त्यामुळे त्याचा स्वभाव कितपत मोकळा किंवा घुम्या आहे, त्यांची सारासारा विचार करण्याची क्षमता कितपत आहे, एकत्रित कामगिरी करताना ते एकमेकांना कितपत समजून आणि सांभाळून घेतात; प्रतिकूल परिस्थितीत ते डोके फिरवून न घेता, शांतपणे विचार करून मार्ग काढू शकतात का आणि ते समाजात, समुदायात मिसळण्याची, गप्पा मारण्याची आवड असलेले आहेत की, कुणाशी फारसे न बोलणारे एकलकोंडे असे आहेत, अशा विविध अंगांनी त्यांच्या मनाचा ठाव घेणारे, वेध घेणारे असे हे प्रश्न असायचे.
 
लेस्लीबाई रोज नवे प्रश्न त्या उमेदवारांच्या आय-फोनवर टाकून ठेवत असत. रोज दिवसभराचे प्रशिक्षण आटपले की, उमेदवारांनी फुरसतीने त्यांची उत्तरे पाठवायची असत. २५ दिवसांच्या प्रशिक्षणामधल्या पहिल्या काही दिवसांतच, लेस्लीबाईंना उमेदवारांच्या मनोव्यापारांचा अंदाज येऊ लागला. त्यावरून त्यांनी असा आडाखा बांधला की, या तुकडीतले किमान ५६ टक्के व्यवस्थित उत्तीर्ण होतील. २१ टक्के लोक नापास होतील आणि २३ टक्के लोक स्वत:हून माघार घेतील. आता २३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार माघार का घेतील, हेच तर त्यांना शोधायचे होते. त्यांच्या मनोव्यापारांवरून लेस्लीबाईंनी काढलेला निष्कर्ष असा की, हे २३ टक्के प्राणी कमालीचे उत्साही, बडबडे, धमाल करणारे, लोकांमध्ये-मित्रांमध्ये मिसळणारे; किंबहुना, अशी मौजमस्ती करायला न मिळाल्यास बेचैन होणारे असे आहेत. प्रशिक्षणाच्या काही विशिष्ट प्रकारांमध्ये त्यांना यातले काहीही करायला मिळत नाही किंवा तो एकलकोंडेपणा त्यांना इतका असह्य वाटतो की, नको ते रिकनायसन्स पथकात सामील होणे, असे त्यांना वाटू लागते आणि ते सरळ माघार घेतात, ‘ड्रॉप आऊट’ होतात.
 
पण, मग जे व्यवस्थित उत्तीर्ण होतात, ते उत्साही आणि धमाल करणारे नसतात का? तसे नव्हे; पण मस्तीच्या वेळी मस्ती आणि तासन्तास शांतपणे दबा धरून बसणे ही कामगिरीची गरज असेल, तर तसे बसता येणे हे त्यांना जमते. म्हणून ते उत्तीर्ण होतात.
प्रशिक्षणाच्या अखेरीस लेस्लीबाईंचे निष्कर्ष आणि अंदाज जवळपास अचूक ठरले. आता यावरून सेनाश्रेष्ठी पुढे काय निर्णय घेणार आहेत, ते अजून बाहेर आलेले नाही. प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा स्वभाव पहिल्या काही दिवसांतच ओळखून, संभाव्य माघार घेणार्‍या उमेदवारांना थोडा अधिक संयम, अधिक चिकाटी, अधिक सहनशीलता शिकवली जाईल की, मुळातच त्यांना पुढे प्रशिक्षण देणे थांबवून खर्च कमी केला जाईल? काहीही झाले, तरी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम मात्र तोच राहील. त्याच्या अवघडपणात, खडतरपणात थोडाही बदल केला जाणार नाही. कारण, अमेरिकेला कणखर, झुंजार, कुशल असे ‘फोर्स रिकनायसन्स’ पथक निरंतर कार्यक्षम ठेवायचेय. बाजारबुणगे नि शेंदाडशिपाई निर्माण करायचे नाहीयेत. जगातली सर्वच आधुनिक सेनादले, आपापल्या सैनिकांची क्षमता शक्य तितकी कमाल रहावी म्हणून असेच प्रयत्न करतात. कारण, आधुनिक युद्धे फार खर्चिक, महाग बनली आहेत. ती हरणे कुणालाच परवडणारे नाही.
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.