काही लोकं भगवी वस्त्रे घालून हिंदू मतात फूट पाडतात; कांदिवलीतील सभेत मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

ठाकरेंनीच मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गंभीर आरोप

    10-Jan-2026
Total Views |
Nitesh Rane
 
मुंबई :  ( Nitesh Rane and Uday Samant Target Thackeray Brothers ) मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवली प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या उमेदवार प्रीतम पंडागळे यांच्या प्रचारार्थ महायुतीची बुधवारी जाहीर सभा पार पडली. या सभेत मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी काही लोकं भगवी वस्त्रे घालून हिंदू मतात फूट कशी पडेल यासाठी प्रयत्न करताहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंनीच मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केल्याचा आरोप केला.
 
याप्रसंगी युवा सेना नेते राज सुर्वे, प्रभाग क्रमांक २६ च्या उमेदवार प्रीतम पंडागळे, मंडळ अध्यक्ष अविनाश राय, सचिन नांदगावकर, अमर पन्हाळकर,विजय साळवी, वंदना नांदगावकर, राजा जाधव, अनिरुद्ध तिवारी, मिलिंद पालांडे, अर्चना गुंजाळ, गोविंद म्हस्के, मयूर पंडागळे, प्रमोद तळेकर, राकेश चवाथे, उत्तम उघडे यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
 
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, प्रीतम पंडागळे भाषण करताना भावुक झाल्या. त्यांना मी सांगू इच्छितो की स्वतः रडायचे नाही तर समोरच्याला रडवायचे. समोरच्या खंडणीखोरांची चिंता तुम्ही करू नका त्यांना आवरण्याच्या सर्व पीएचडी आम्ही केल्या आहेत. इथे जनतेच्या विरोधात कुणी दमदाटी करत असे, महायुतीच्या कार्यकर्त्यांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर लक्षात ठेवा १६ तारखेची सकाळ आमची असणार असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
 
ते पुढे म्हणाले की, मतदान करताना विचार करा. ज्या-ज्यावेळी आदर्श लोकप्रतिनिधी निवडता तेव्हा तुमचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. कोकणातील जनतेने माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांना खासदार बनविले. विकास काय असतो ते कोकणात जाऊन बघा. कांदिवली पूर्व परिसरात कोकणवासीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या परिसरात स्वतंत्र कोकण भवन कसे उभारता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करणार असून यामुळे मुंबईसारख्या शहरात कोकणची संस्कृती व समृद्ध परंपरा जपली जाईल, असेही ते म्हणाले.
 
हेही वाचा : Palika Election 2026: महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४ दिवस दारूबंदी
 
ते पुढे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे मूळ शिवसैनिक आहोत. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. अंगावर आले की थेट शिंगावर घेणारी आम्ही लोकं आहोत. मराठी सक्ती करा असे बोंबलणारे काही राजकीय पक्ष आहेत. त्यांना पहिले बहिराम पाड्यात जाऊन मराठी बोलायला सांगा असे सांगत ठाकरे बंधूवर तोफ डागली. तसेच येथे सर्वधर्मीय लोकं राहतात त्यांनी काळजी करू नये. ही मुंबई तुमच्या हक्काची आहे.
 
तुमच्याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही. आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. जो राष्ट्रभक्त मुसलमान देशात राहतो तो आमचा आहे. आमच्या देशाकडे व आमच्या हिंदू समाजाच्याविरोधात जो कुणीही जिहाद करतो त्याविरोधात आम्ही आहोत. त्यांना संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुंबईला सुरक्षित,विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल तर मुंबईला कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे महत्वाचे आहे. मुंबईत बांगलादेशी रोहिग्यांची संख्या कमी करण्यासाठी भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीशिवाय पर्याय नाही. मुंबई महापालिकेवर हिंदुत्वाचा भगवा फडकविण्यासाठी आणि हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसविण्यासाठी प्रीतम पंडागळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले.
 
तर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबईला आपण आंतरराष्ट्रीय शहर मानतो. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष्य आहे. येथील संपूर्ण परिसरातील जागा महायुतीच्याच निवडून येतील. महाराष्ट्रात महायुती सरकार म्हणून काम करतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनसामान्यांचे उद्धारकर्ते म्हणून काम करताहेत. मुंबईचा कायापालट होतोय. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात येणाऱ्या लोकांना, येथील स्थानिकांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी फडणवीस आणि शिंदे अहोरात्र मेहनत करताहेत.
 
नुकताच मी टीव्हीवर एक कौटुंबिक कार्यक्रम पाहिला असे सांगत सामंत यांनी ठाकरे बंधूच्या मुलाखतीची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, हा जो कौटुंबिक कार्यक्रम चालू आहे त्यांच्याच लोकांनी मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्याचे काम केलेय. महापालिका महायुतीच्या ताब्यात आल्यावर मुंबईतून बाहेर गेलेला मराठी, कोकणी माणूस पुन्हा शहरात, उपनगरात आला पाहिजे ही भूमिका आहे. विकासाची कामे कोकणी माणसासाठी, मुंबई राहणाऱ्यांसाठी, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांसाठी केली पाहिजेत ही भूमिका महायुतीची आहे. खऱ्या अर्थाने गरीब जनतेला न्याय द्यायचा असेल तर त्याला घर दिले पाहिजे. भाजपा-शिवसेना-आरपीआय युती एवढी मजबूत झालीय की २२७ पैकी १५० हून अधिक जागा महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त करत या विजयात सहभागी व्हा,असे आवाहनही सामंत यांनी केले.
 
हे वाचलत का? - मुंबईच्या पुनर्विकासावर ठाकरेंना पोटशूळ का?
 
तत्पूर्वी उपस्थितांशी संवाद साधताना आ. दरेकर म्हणाले की, अशी अभूतपूर्व गर्दी या आधी कधीच येथे झाली नाही. याचे कारण हा संघर्ष प्रामाणिक साध्या,भोळ्या महिलेचा आहे. हा संघर्ष आमदाराचा पीए म्हणून एखाद्याने बांधकाम केले की खंडणी मागणाऱ्या सचिन केळकरच्या विरोधातील आहे. हा संघर्ष माझ्या महिलांच्या अश्रुंची परतफेड करणारा आहे. तिच्या विजयाचा हा संघर्ष आहे. आमदाराचा पीए म्हणून काम करायचे. शिवसेना-भाजपा महायुतीच्या जीवावर जनता आपल्याला आमदार करणार, महायुतीसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आणि शाखाप्रमुख असताना गद्दारी करणार. त्या गद्दाराचा कडेलोट करण्यासाठी हा संघर्ष आहे. खंडणीखोर, भस्मासुराला त्याची जागा दाखवून द्या, ही आपल्याला गृहीत धरणाऱ्या माणसाविरोधातील, महिलांच्या सन्मानाची लढाई आहे, असेही दरेकर म्हणाले.
 
दरेकर पुढे म्हणाले की, मी विधानसभेचा आमदार म्हणून काम केले. विधानपरिषदेत काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने राज्याचा विरोधी पक्षनेता होण्याची संधी मला मिळाली. मी कधीही कुणाला ब्लॅकमेल केले नाही. पण हल्ली राजकारणात लुटारुंचा सुळसुळाट झालाय. त्यातला मोठा लुटारू तुम्हाला लुटण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच येथे ड्रेनेज लाईनची मोठी समस्या असून संपूर्ण सिंग इस्टेट करिता नियोजनबद्ध अशी ड्रेनेज लाईन टाकून घेऊ, वन जमिनीवर राहणाऱ्यांच्या पुनर्वसनाचा विषय आहे. त्यांचे राहत्या जागीच पुनर्वसन करू, असा शब्दही दरेकरांनी दिला. तसेच केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. खासदार पियुष गोयल केंद्रात मंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुमच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.
 
मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू केले लक्ष्य
 
यावेळी दरेकर यांनी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूना लक्ष्य केले. ते म्हणाले की, मराठी माणसासाठी काहींना आता पुन्हा पुळका आलाय. आम्ही कोण आहोत? आम्ही काय पाकिस्तानातून आलोत का? निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, मराठी माणसा जागा हो अशी आरोळी ठोकणार. मराठी माणसासाठी केले काय. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होऊन वसई, विरारला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६० स्क्वे. फुटात राहणाऱ्या अभ्यूदय नगरमधील मराठी माणसाला ६४५ स्क्वे. फुटाचे घर दिले. मराठी माणसाला घर मिळावे यासाठी पुनर्विकास प्राधिकरणाचा मला अध्यक्ष केले. स्वयं पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून मुंबईत चमत्कार करतो आहोत. मुंबईत स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून १८ इमारती उभ्या राहिल्या आहेत. मुंबई बँकेकडे १६०० प्रस्ताव आलेत. ३६० स्क्वे. फुटात राहणारा मराठी माणूस १४०० स्क्वे. फुटाच्या घरात राहायला गेलाय. सिंग इस्टेट येथेही गरज पडल्यास समूह पुनर्विकास करू.