मुंबई :( uddhav thackeray and raj thackeray ) मुंबईतील विकास प्रकल्पांवरून ठाकरे बंधूंची टीका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “पुनर्विकासाच्या नावाखाली अर्धी मुंबई अदानींच्या दिली आहे. पात्र-अपात्रचा खेळ करून संपूर्ण झोपडपट्टी बाहेर काढायची आणि धारावीत मोठे टॉवर उभारायचे आहेत. धारावीच्या शेजारी बुलेट ट्रेन स्टेशन कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला.
मात्र, राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उद्देश लाखो धारावीकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा आहे. या प्रकल्पात पक्की घरे, मूलभूत सुविधा आणि चांगले जीवनमान देण्याचे उद्दिष्ठ आहे. याचसोबत मुंबई हाती घेण्यात आलेले सर्व पुनर्विकास प्रकल्प हे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प आहे. ज्यातून लाखो मराठी मुंबईकरांना आहे त्याच जागेवर नवे पक्के आणि मोठे घर मिळेल. बुलेट ट्रेन ही मुंबईचे आर्थिक केंद्र असणाऱ्या बीकेसीतून जाते. ज्यामुळे याभागात गुंतवणुकीला वेग आहे.
पुनर्विकासाला विरोध, पण स्वस्त घरांची घोषणा
राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, “पाच वर्षांत एक लाख स्वस्त घरे देणार” आणि “मोकळ्या व मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही” अशी भूमिका ठाकरे गटाकडून मांडली जात आहे. मात्र, याच वेळी मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांवर सातत्याने आक्षेप घेतले जात असल्याने विरोधाभास दिसून येत आहे. ही एक लाख घरे नेमकी कशी बांधणार या संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले.
झोपड्यांना आणि अनधिकृत वास्तव्याला आश्रय देणारे ठाकरेच
दुसरीकडे मुंबईत वाढणाऱ्या लोकसंख्येवर भाष्य करताना राज ठाकरे आता मुंबईत बाहेरून येणाऱ्यांवर बंधने घातली पाहिजेत अशी भूमिका मांडली. मात्र, त्याचवेळी बाहेरून येणाऱ्यांनी शासकीय जागांवर झोपड्या बांधल्या तेव्हा त्यांना आश्रय देणारी ठाकरेंच्या सत्तेतीलच महानगरपालिकाच होती, याचा विसर राज ठाकरेंना पडलेला दिसतो.
मुंबईतील पार्किंग समस्येवर बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “मुंबईतील मैदानांच्या खाली ५०० ते १००० गाड्या पार्क करता येतील, अशी भूमिगत पार्किंग योजना आम्ही मांडली होती. आश्वासन मिळाले, पण पुढे काहीच झाले नाही,” असे राज ठाकरे म्हणाले. मात्र, महालक्ष्मी रेसकोर्सखाली प्रस्तावित कार पार्किंगला त्यांचेच पुतणे, आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध केला होता, याकडे त्यांनी सपशेल कानाडोळा केला आहे.
वाहन नोंदणी बंद करा, पण गाड्या कोट्यवधींच्या?
वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर संयुक्त मुलाखतीत बोलताना ठाकरे बंधूंनी मुंबईत वाहन नोंदणीवर बंधन आणण्याची भूमिका मांडली. मात्र, याच वेळी ठाकरे बंधूंकडे कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्या असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला असून, “सामान्य मुंबईकरांसाठी नियम आणि नेत्यांसाठी सवलत का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईच्या विकासाला गती द्यायची की मर्यादा घालायच्या, पुनर्विकास हवा की विरोध या प्रश्नांवर ठाकरे बंधू आणि राज्य सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.