मुंबई : ( Uddhav Balasaheb Thackeray ) मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा हा भाग एकेकाळी मासेमारी व्यवसाय, सांस्कृतिक सहअस्तित्व, मध्यमवर्गीय वसाहती आणि चित्रपटसृष्टीशी निगडित ओळखीमुळे प्रसिद्ध होता. मात्र गेल्या काही वर्षांत या भागाची ओळख झपाट्याने बदलताना दिसत आहे. ड्रग्जचा वाढता वापर, मोठा आणि खुला व्यवहार, प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहे. याशिवाय हाती आलेल्या माहितीनुसार थेट लहान मुलांचा वापर या कामासाठी होत असल्याची माहिती आहे. हि परिस्थिती फक्त वर्सोव्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मुंबईसाठी चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोव्यातील काही विशिष्ट परिसरात, समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात आणि मड भागात जाणारे लोक त्यांच्या गाड्या वर्सोवा - मड मार्गावर पार्कींग करतात. त्यामुळे रात्रीच्या अंधारात किंवा छुप्या पद्धतीने या गाड्यांच्या मागे ड्रग्जचा अवैध व्यवसाय केला जातो. या सर्व प्रकारांत स्थानिक पुढाऱ्यांचे लागेबंध असणारे व्यक्ती असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
आज जर या गंभीर समस्येवर मुंबईकर गप्प राहिले, तर उद्या संपूर्ण मुंबई या विळख्यात अडकलेली दिसेल. वर्सोव्यासारखा भाग ड्रग्ज हब म्हणून ओळखला जाऊ नये, यासाठी तात्काळ आणि पारदर्शक कारवाई आवश्यक आहे.
हिंदू मुली टार्गेटवर
ड्रग्जचा वापर हा केवळ फॅशन किंवा मनोरंजन म्हणून अनेक तरूण- तरूणी सुरू करतात. पण पुढे त्याची सवय लागून व्यसन, गुन्हेगारी, मानसिक आजार, आर्थिक कर्जबाजारीपणा आणि ताणतणाव वाढतो. या भागात अवैधपणे व्यवसाय करणाऱ्या लोकांना युवकांच्या जीवाशी खेळ करूनच पैसा कमवायचा आहे. यामध्ये विशेषत: मड भागात जाणाऱ्या हिंदू मुलींना या जाळ्यात ओढले जाते, असे स्थानिकांनी सांगितले.
पोलीस कारवाई अपुरी का?
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) आणि मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होत असली तरी सामान्य नागरिकांमध्ये अशी भावना आहे की ही कारवाई वरवरची आहे. काही ठिकाणी ड्रग्ज विक्री वर्षानुवर्षे सुरू असूनही ती बंद का होत नाही, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
'उबाठा'चा छुपा पाठींबा?
वर्सोवा मतदारसंघातील स्थानिक आमदार हे शिवसेना (उबाठा ) गटाचे आहेत. त्यामुळे साहजिकच नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, इतकी गंभीर समस्या असताना स्थानिक पातळीवर राजकीय दबाव आणि ठोस पुढाकार का दिसत नाही? या प्रकरणात दुर्लक्ष केले जात असेल तर दुर्लक्ष हेही अप्रत्यक्ष संरक्षण आहे का? अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेचा याला छुपा पाठींबा असण्याची शक्यता स्थानिक व्यक्त करत आहेत.
मी प्रचारासाठी फिरत असताना मला प्रामुख्याने तीन समस्या जाणवत आहेत. एक म्हणजे अनधिकृत फेरीवाले, दुसरी म्हणजे मड भागात जाणाऱ्या लोकांच्या अवैध पार्कींगची समस्या आणि तिसरी म्हणजे सर्वांत गंभीर ड्रग्जची समस्या आहे. मड भागात जाणारे लोक ज्या गाड्या लाऊन जातात, त्या गाड्यांमागे अवैधपणे ड्रग्ज विक्रि होते. यासाठी शक्यतो रात्री मोठ्या प्रमाणावर हे अवैध काम चालते. मी निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांत प्रथम या समस्येवर तोडगा काढणार आहे.
- योगिराज दाभाडकर, प्रभाग क्र. ५९, भाजप उमेदवार
ड्रग्जची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेच, पण इथल्या स्थानिक पुढाऱ्यांचे लँड जिहाद करून जमिनी बळकावण्याचे मोठे षडयंत्र चालू आहे. एका ठिकाणच्या मोकळ्या मैदानावर या पुढाऱ्यांनी सुरूवातीला महापालिकेच्या कचराकुंड्या ठेवल्या. काही वर्षांनंतर कचराकुंड्या हटवून तिथे कराटे वर्ग चालवले. आता त्या ठिकाणी एक मोठी जीम उभारून महिन्याला २५ ते ३० लाख रूपये कमावले जात आहेत.
०१) सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने ऑक्टोबर २०२० साली वर्सोवा येथून आरोपी प्रीतिका चौहान आणि फैसल शेख यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत एनसीबीने टांझानियन ड्रग्ज तस्कर ब्रुनो जॉन, रोहित हिरे आणि आणखी एका आरोपीलाही अटक केली होती.
०२) एएनसीच्या आझाद मैदान युनिटने जुलै २०२५ रोजी अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला भागात राहणारे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर एस. खान (४०) यांच्या घरावर छापा टाकला. झडती दरम्यान, पोलिसांनी १.२५ कोटी रुपयांचे एमडी आणि चरस तसेच १.८ दशलक्ष रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.
०३) दुसऱ्या एका कारवाईत, एएनसीच्या कांदिवली युनिटने वर्सोवा परिसरात फैजान इरफान गौर (३१) याला ३०६ ग्रॅम हेरॉइनसह रंगेहाथ अटक केली. जप्त केलेल्या हेरॉइनची किंमत अंदाजे १.२२ कोटी रुपये होती.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.