नवी दिल्ली : “स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या जुलमी राजवटींनी आपली श्रद्धास्थाने उध्वस्त केली, आपण फक्त उघड्या डोळ्यांनी मूकदर्शक बनून राहिलो, आपली संस्कृती ही मूळात कुणावरही आक्रमण करण्याची कधीच नव्हती, आपण कुणाच्या प्रार्थनास्थळांवर, धर्मस्थळांवर कधीच हल्ला केला नाही, मात्र, गाफील राहिल्याचे धडा आपल्याला इतिहासाने शिकवलेला आहे.
भविष्यात आपण तीच चूक आपण केली, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच असू, अशा शब्दात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशातील युवावर्गाला कानमंत्र दिला. भविष्यात आपण शक्तीशाली असू तरच इतर कुणीही आपल्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस करणार नाही, त्यामुळे निर्णय घेताना आजचा उद्याचा विचार करून नव्हे तर पुढील पीढीचा विचार करुन घ्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विकसित भारत यंग डायलॉग २०२६च्या दुसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमात सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. या सत्राला केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, युवा व्यवहार विभागाच्या सचिव डॉ. पल्लवी जैन गोविल, अतिरिक्त सचिव नितेश कुमार मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
डोभाल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत ज्या गतीने विकसित होत आहे, एक दिवस हा ‘ऑटोपायलट मोड’वरही चालेल. मात्र, भविष्यात युवा पीढीला देशासाठी निर्णय घ्यावे लागतील. विज्ञान तंत्रज्ञान, संगणक, अभियांत्रिकी क्षेत्र इतर कुठल्याही क्षेत्राचा विचार होवो, निर्णय हा भविष्यात युवा पीढीला घ्यायचा आहे. हे निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला विकसित करावी लागेल, मी एक छोटीशी गोष्टी सांगू इच्छीतो की, तुम्ही निर्णय घ्याल तो आज उद्यासाठी नाही तर देशाच्या पुढील भवितव्यासाठी निर्णय घ्यायचा आहे. योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. एक पाऊल उचलण्यापूर्वी पुढील दोन निर्णयाचा विचार करणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले.
डोवाल म्हणाले, “तुमच्यात एक असीम उर्जा आहे, शक्ती आहे ती घेऊन तुम्ही जन्माला आलात. तुम्ही भाग्यवान आहात, ज्या काळात तुम्ही जन्माला आला आहात. मात्र, स्वातंत्रपूर्वकाळ असा नव्हता. कित्येकांना फाशी झाली. भगतसिंहांना देशासाठी फासावर जावे लागले, सुभाषचंद्र बोस यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. महात्मा गांधींना सत्याग्रह करावा लागला. कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. आमची गावं जाळली, आमच्या मंदीरांना लुटण्यात आले, आमच्या संस्कृतीवर घाला घालण्यात आला. दुर्दैवाने हे सुरू असताना आम्हाला उघड्या डोळ्यांनी मूकदर्शक होऊन पहावं लागलं होतं. हा इतिहास आपल्याला एक आव्हान देतोयं. भारताच्या प्रत्येक तरुणांमध्ये आग दिसली पाहिजे, आपल्या इतिहासाला न विसरता एका महान भारताच्या निर्माणाचा संकल्प करू शकू.”, असेही ते म्हणाले.
“आपल्या संस्कृतीला एक गौरवशाली इतिहास आहे, आम्ही कुठल्या देशी जाऊन मंदिरे नाही तोडली, कुणाच्या प्रार्थनास्थळी हल्ले केले नाहीत. आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. आपण स्वसंरक्षणासाठी सज्ज राहिलो नाही, त्यामुळे इतिहासाने आपल्याला एक धडा शिकवला. हा धडा आपण आजही लक्षात ठेवला आहे का? भविष्यात आपण ही गोष्ट विसरून गेलो तर देशाचा सर्वात मोठा पराभव असेल. भविष्यात आपल्या कुठल्याही अशा संस्कृतीवर हल्ला झाला, आपल्या गावावर अशाप्रकारे भविष्यात पुन्हा हल्ला झाला तर आपण स्वतःला रक्षक म्हणून इतके शक्तीशाली बनवू की, संरक्षण, तंत्रज्ञान आणि राजकीय दृष्ट्या इतके मजबूत असू की त्याचा प्रतिकार करू शकू,” असेही ते म्हणाले.
“त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल, तो पुन्हा योग्य असेल आणि योग्य बनविण्यासाठी झटावे लागेल. एक शिकार करून जंगल जिंकता येत नाही, त्यासाठी रोज झटावे लागते. झगडावे लागते, हा संघर्ष तुमची सवय बनली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे, जे काही काम करायचे आहे, ते आजच करायला हवे, मात्र, ते टाळू नका. “डोन्ट क्विट!”, संघर्ष वाट्याला येईल, अडथळे येतील पण रस्ता सोडू नका, स्वतःचा मार्ग बदलू नका हा निर्धार कायम ठेवा. एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका, स्वामी विवेकानंद म्हणाले होते, पूर्वी म्हणत नास्तिक तोच जो देवावर विश्वास ठेवत नाही. मात्र, आज म्हटले जाते की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक आहे. त्यामुळे तुमचा ईश्वरावर विश्वास असाल तर स्वतःवरही विश्वास ठेवा. पाच वर्षे एक गोष्टीच्या मागे हात धुवून लागा. तुमचा निर्णय, तुमच्या ध्येयामागे झपाटून द्या, विजय तुमचा असेल.”, असेही ते म्हणाले.
“लढाई का लढली जाते? कुणाला नरसंहार आवडतो का? पण एखाद्या देशाचे मनोबल तोडण्यासाठी, तिथल्या गोष्टी आपल्या अटीशर्थीवर चालवण्यासाठी आज युद्ध होत आहेत. कुठला ना कुठला देश आपल्या अटी दुसऱ्या देशावर थोपवू पाहत आहे, त्यासाठी या लढाया होत आहेत. जर तुम्ही इतके शक्तीशाली की तुमचे मनोबल मजबूत आहे, तर तुम्ही आयुष्यभर स्वतंत्र राहाल, पण तुमच्याकडे सगळी संसाधने आहेत, शक्ती आहे पण मनोबल नाही तर तुम्ही सगळ्या गोष्टी असूनही पराभूतच राहाल. त्यासाठी देशाला नेतृत्वाची गरज असते. आज आपण भाग्यशाली आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपला देश एका ऑटोपायलट मोडमध्येही यशस्वी होण्याच्या मार्गावर चालला आहे. त्यांची मेहनत, निष्ठेने काम करत आहे. आज भारतमंडपम् या वास्तुतून भविष्यात देशाला चालवेल, असे नेतृत्व बाहेर पडेल, अशी इच्छा व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी सर्व युवांना सदीच्छा दिल्या.