देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती; लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार करणार मतदान

    08-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करणारे पहिले मतदार असतील. पंतप्रधान मोदी पंजाब आणि हरियाणाच्या खासदारांसह मतदान करतील. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, राम मोहन नायडू आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची ‘निवडणूक एजंट’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. बीराज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी हे या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी आहेत. संसद भवनातील वसुंधाच्या कक्ष क्रमांक एफ-१०१ मध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान संपल्यानंतर एक तासाने म्हणजेच संध्याकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू होईल आणि निकाल जाहीर होईल. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळतील.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे, राज्यसभा आणि लोकसभा सदस्य मतदान करतात. राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य देखील मतदान करण्यास पात्र आहेत. १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी, इलेक्टोरल कॉलेजमध्ये राज्यसभेचे २३३ निवडून आलेले सदस्य (सध्या पाच जागा रिक्त आहेत), राज्यसभेचे १२ नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे ५४३ निवडून आलेले सदस्य (सध्या एक जागा रिक्त आहे) असतात. इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण ७८८ सदस्य आहेत (सध्या ७८१).

बैठकांचे सत्र
रालोआ खासदारांसोबत विविध केंद्रीय मंत्र्यांनी सोमवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये मार्गदर्शन केले. यावेळी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आणि अन्य तांत्रिक बाबींची माहिती दिली. त्याचप्रमाणे रालोआ घटकपक्षांच्या नेत्यांनीही आपापल्या खासदारांसोबत बैठका घेतल्या. सोमवारीच रालोआ संसदीय पक्षाची बैठकही आयोजित करण्यात आली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

बिजद आणि बीआरएस अनुपस्थित राहणार
ओडिशामधील बिजू जनता दल (बिजद) आणि तेलंगणामधील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील रालोआ अथवा इंडी आघाडीचा भाग नाहीत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत या दोन्हीही पक्षांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपला पक्ष रालोआ आणि इंडी या दोन्ही आघाड्यांसोबत समान अंतर राखून असल्याने निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे बिजदने म्हटले आहे तर ‘नोटा’चा पर्याय नसल्याने निवडणुकीत भाग घेणार नसल्याचे बीआरएसने म्हटले आहे.

हा आहे बहुमताचा आकडा
सध्या राज्यसभेचे २३९ आणि लोकसभेचे ५४२ खासदार आहेत, जे सर्व मतदान करण्यास पात्र आहेत. तथापि, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हे दोघेही अनुपस्थित राहतील याची पुष्टी झाल्यामुळे, मतदान करणाऱ्या खासदारांची एकूण संख्या ७७० वर आली आहे आणि बहुमताचा आकडा ३८६ आहे.

अशी होते उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने घेतली जाते. एकल हस्तांतरणीय मतदान प्रणालीद्वारे मतदान गुप्त पद्धतीने केले जाते.

मतपत्रिका पांढऱ्या रंगाच्या असतात, ज्यामध्ये दोन स्तंभ असतात. एका स्तंभात उमेदवारांची नावे हिंदी आणि इंग्रजीमध्ये असतात आणि दुसऱ्या स्तंभात मतदानासाठी रिक्त जागा असते.

रिकाम्या जागेत, मतदारांना त्यांचे प्राधान्य १,२ असे प्रविष्ट करावे लागताचत. हे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असू शकतात.

टाकलेल्या सर्व मतांपैकी, वैध मते प्रथम क्रमवारीत लावली जातात. त्यानंतर, प्रथम प्राधान्य मते वैध मतांमध्ये मोजली जातात.

जर एखाद्या उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर तो विजयी मानला जातो.

जर पहिल्या फेरीत कोणालाही बहुमत मिळाले नाही, तर सर्वात कमी मते असलेला उमेदवार वगळला जातो. पुढील प्राधान्यानुसार त्याची मते इतर उमेदवारांना हस्तांतरित केली जातात.

उमेदवाराला बहुमत मिळेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा सुरू ठेवली जाते.