ठाणे: अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ९८६१ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यापैकी ५३९० मूर्ती पीओपीच्या तर, ४४७१ मूर्ती शाडू मातीच्या होत्या. त्यात, सहा फुटांपेक्षा मोठ्या पीओपी मूर्तींची संख्या १८८ इतकी होती. तर, पर्यावरणपूरक मोठ्या मूर्तींची संख्या ३२२ इतकी होती. अकराव्या दिवशी सार्वजनिक मंडळाच्या ३७२ गणेश मूर्तीही विसर्जित करण्यात आल्या.
पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये अकराव्या दिवशी ६६९९ मूर्ती तर, विशेष टाकी व्यवस्थेत १४७९ गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. विसर्जन व्यवस्थेत महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याबरोबरीने महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक, सामाजिक संस्था आदींचे प्रतिनिधी, पोलीस मित्र करण्यासाठी सहभागी झाले होते. या सगळ्यांचे सहकार्य आणि भाविकांनी केलेले शिस्तबद्ध विसर्जन यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन जल्लोषात झाले. रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सार्वजनिक गणेश मंडळाच्या अखेरच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
कृत्रिम तलावातील विसर्जनात ६७ टक्के वाढ अकराव्या दिवशी झालेल्या विसर्जनात कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा ६७ टक्क्यांनी वाढले. तर, खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी घट झाली. त्याचबरोबर, विशेष टाकी व्यवस्था (हौद) यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा ३८ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात आले. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंतीही करण्यात येत होती.
कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन झाल्यावर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जात असल्याचेही मनीषा प्रधान यांनी सांगितले.
भाविकांनी ७६ मूर्ती स्वीकार केंद्रात दिल्या महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ७६ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. तसेच, फिरत्या विसर्जन केंद्रात ५२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
विनामूल्य शेवगा रोपांचे वाटप
उपमुख्यमंत्री हरित अभियानात ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, सलग दुसऱ्या वर्षी, गणेश विसर्जनासाठी करिता येणाऱ्या नागरिकांना शेवगा वृक्षांची मोफत रोपे वाटण्यात आली. रेतीबंदर व इतर विसर्जन घाट येथे एकूण ५००० शेवगा रोपांचे वाटप कऱण्यात आले. उपायुक्त मधुकर बोडके आणि उद्यान निरीक्षक केदार पाटील यांनी या अभियानाचे संयोजन केले.
यावर्षी एकूण ७३ एवढे टन निर्माल्य जमा
यावर्षी निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे बायोकंपोस्टिंग प्रकल्प कार्यान्वित आहेत. अखेरच्या दिवशी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे ३२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच, निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. दिड दिवसाच्या मूर्ती विसर्जनानंतर १५ एवढे निर्माल्य जमा झाले. तर, पाचव्या दिवशी ०६ एवढे निर्माल्य जमा झाले होते. सातव्या दिवशी १६ टन निर्माल्य जमा झाले. यावर्षी एकूण ७३ एवढे टन निर्माल्य जमा झाले. त्याचबरोबर दोन टनाहून अधिक प्लास्टिकही जमा झाले.