मुंबई, संगीतकार, गायक व लोकप्रिय संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या समृद्ध संगीत प्रवासाला वाहिलेला एक आगळावेगळा सांगीतिक कार्यक्रम ‘झाले मोकळे आकाश…’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सायं. ६.३० वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे रंगणार आहे. हा कार्यक्रम व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत असून, जीवनगाणी व स्वरगंधार तर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील मा. अॅड. आशिषजी शेलार (मंत्री, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र राज्य).विशेष उपस्थितीमध्ये सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, रविंद्र साठे, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी-जोगळेकर आदी मान्यवरांचा समावेश असेल.
या निमित्ताने ऋषिकेश रानडे, सोनाली कर्णिक, अभिषेक नलावडे, धनश्री देशपांडे, शिल्पा पुणतांबेकर यांसारखे लोकप्रिय गायक कलाकार श्रीधर फडके यांच्या रचनांना आवाज देतील. सोबत श्रीधरजींची मूलाखत देखील घेणार असून ते काही निवडक गाणीही सादर करणार आहेत.
निवेदनाची जबाबदारी विघ्नेश जोशी पार पाडणार असून, संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे आहे. ह्या निमित्ताने श्रीधरजींच्या सांगितीक प्रवासाचा आढावा घेणारे अमृताच्या जणू ओंजळी हे सुकन्या जोशी यांनी शब्दांकन केलेले दूर्मीळ पूस्तक डिंपल प्रकाशन तर्फे प्रकाशित होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन प्रसाद महाडकर आणि मंदार कर्णिक करीत आहेत तर सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार आहे
या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून, विनामुल्य प्रवेशिका शनिवार ६ सप्टें. पासून दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे सकाळी ९ पासून उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.