अर्थपरिवर्तन

    05-Sep-2025   
Total Views |

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर राज्यातील महायुतीचे सरकार आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने आजतागायत जी कामगिरी केली आहे, ती सर्वसामान्य लोकांसाठी तर उपयुक्त अशीच आहे. तसेच, आपले राज्य आणि या देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक उंचावणारी आहे. असे असले तरीही माध्यमातून विशेषतः इलेट्रिक माध्यामातून, या दोन्ही सरकारवर आरोपांच्या फैरी झडताना दिसतात. या सरकारमधील कार्यक्षम नेत्यांमध्ये वाद असल्याचे चित्र रंगविले जाते, अनेकदा त्यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली जाते, मूळ मुद्द्याला बगल देत समाजात फूट पाडणारे मुद्देच तापवत ठेवले जातात. यामुळे अशा या बातम्यांचा लोकांना वीट आला आहे, हीच खरी वस्तुस्थिती आहे. यावर शिक्कामोर्तब म्हणजे, जे सरकार विरोधात दाखवले जाते, त्याउलट तर या टीव्हीवर बातम्या पाहणार्या लोकांपेक्षा आणि उठसूठ सरकारविरोधात समाजमाध्यमांवर रिल बनविणार्यांपेक्षा दहापट पात्र जनतेला या दोन्ही सरकारच्या योजनांचा लाभ मिळतच आहे. तसेच जनहिताचे म्हणून जे जे निर्णय हे सरकार घेत आहे, ते आपल्या सर्वांच्या आणि आगामी पिढीच्या उज्ज्वल भवितव्याच्या हिताचे आहेत, हे लोकांना कळले आहे.

‘जीएसटी’चे कमी केलेले दर हे आगामी काळातील नागरिकांसाठी पंचपरिवर्तनाची सुरुवात आहे, असे मानायला हरकत नाही. ज्या काळात या देशात आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली, तेव्हाच जर देशात समान कररचना लागू केली असती तर देशातील गरीब नागरिक प्रगतीसाठी सिद्ध दिसला असता, जसा तो आज दिसत आहे. मात्र, काँग्रेस काळात नागरिकांनी केवळ भ्रष्टाचार सहन केला. तेव्हा फक्त योजना जाहीर होत असत. मात्र त्या योजनांचे लाभ केव्हातरीच गरीब नागरिकांना मिळायचे. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांत याच गरीब जनतेच्या खात्यात पैसा आला नाही, असा एकही दिवस गेला नाही. उलटपक्षी हीच सर्वसामान्य जनता आता आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी बचत, गुंतवणूक आणि कर भरण्याची पूर्तता करून राष्ट्रनिर्मितीमध्ये अमूल्य योगदान देत आहेत. हा लक्षणीय बदल कधीही लोकांपर्यंत आणला जात नाही, केवळ भांडणे सुरू असल्याचे भासविले जाते.

कुटुंब प्रबोधन

यंदाचा गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरवले आणि या उत्सवाची सुरुवातदेखील अगदी सकारात्मक झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उदात्त हेतूने या उत्सवाला सार्वजनिक करण्याचा आग्रह केला, तो हेतूदेखील पुन्हा साध्य होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मध्यंतरी या उत्सवात ज्या विकृत प्रवृत्ती शिरकाव करीत होत्या, ज्यातून खोटा इतिहास माथी मारणे, धार्मिक प्रथा रिती-रिवाज यांना खोटे ठरवणे, आधुनिकतेच्या नावाखाली भारतीय संस्कृतीला दूर सारून पाश्चात्य संस्कृती माथी मारणे, शहरी नक्षलवाद रुजवणे असे पद्धतशीर प्रयत्न झाले. ज्या पुणे शहरात हा उत्सव लोकप्रिय आहे, तेथूनच हे राज्यभर पसरविले जात होते. त्याकाळात असलेले सत्ताधीश याला ‘राष्ट्रवाद’ असे गोंडस नाव देऊन, खतपाणी घालत होते. यामुळे कुटुंब प्रबोधन होण्याऐवजी, कुटुंब विभाजनास सुरुवात झाली. काही टाळकी आणि काही टोळकी यांनी हा गोंगाट सुरूच ठेवल्याने, गणेशोत्सवात कुटुंब घेऊन बघण्याची मजा गेली. बीभत्स आणि विकृत रूप या उत्सवाला येण्याचे चित्र दिसू लागले होते. हे चित्र अतिशय दुर्दैवी असेच.

मात्र, महायुतीच्या सरकारने यावर्षी त्या बीभत्स संकल्पना मोडीत काढल्या. गणेश मंडळात उत्साह संचारला. ‘डीजेमुक्त गणेशोत्सव कर्णकर्कश गोंगाट नको’ ही भावना सुरुवातीलाच रुजल्यामुळे नागरिक निर्धास्त झाले. देखावे सादर करणार्या कलाकारांना वाव मिळाला. कुटुंबे ते बघण्यासाठी आबालवृद्ध आणि लहान मुलांना घेऊन रस्त्यावर निर्भीडपणे आली. सर्वार्थाने कुटुंब प्रबोधन झाले. संस्कृतीचा खरा इतिहास नव्या पिढीसमोर आला. लोकमान्यांची स्वप्नपूर्ती होण्याच्या दिशेने होत असलेली ही वाटचाल, आता राज्यभर विविध माध्यमातून पुढे जाईल. म्हणूनच लोकांनी आपले जनप्रतिनिधी चांगले निवडून दिले की, त्यांनादेखील हक्काने सरकार समोर हवे ते मागता येते. देवाभाऊंच्या सरकारने लोकांना हा हक्क राज्यहितासाठी, कुटुंब हितासाठी आणि समाजहितासाठी बजावण्याची संधी दिली. समजदार लोक त्याचे सोने करतात, हे पुणेकरांनी दाखवून दिले आहे. उद्या राज्यातील अन्य लोकदेखील, कुटुंब प्रबोधन किंवा गुण्यागोविंदाने राहण्यासाठी असाच पुढाकार घेतील.


अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.