नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यू परिसरात गेल्या दहा दिवसांपासून भक्तिरसाचा अनोखा जल्लोष अनुभवायला मिळाला. राष्ट्रपती भवन, संसद आणि राष्ट्रीय राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या या ल्युटन्स दिल्लीत “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची” पासून ते “ओम् जय जगदीश हरे” पर्यंत विविध आरत्यांचे स्वर दुमदुमत होते. भाजप नेते व पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या २११, नॉर्थ अव्हेन्यू या निवासस्थानच्या ‘समरसता गणेशोत्सवा’ने देशाच्या राजधानीत सामाजिक एकतेचा अनोखा संदेश यंदाही दिला.
या गणेशोत्सवाची सुरुवात २०२१ मध्ये झाली. दिल्लीकरांना महाराष्ट्रातील खऱ्या गणेशभक्तीचा अनुभव मिळावा, तसेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागे ठेवलेला सामाजिक समरसतेचा उद्देश अधोरेखित व्हावा, या हेतूने देवधर यांनी हा उपक्रम सुरु केला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशप्रतिमेची स्थापना स्थानिक सफाई कामगारांच्या हस्ते केली जाते आणि त्यांना वस्त्र व भोजनदान देऊन सन्मानित केले जाते. त्यानंतर रोज समाजातील विविध घटकांतील लोक पूजा-अर्चेत सहभागी होतात. कधी मातंग समाजाचे कार्यकर्ते, कधी वाल्मीकी समाजाचे नेते, कधी किन्नर समाजाचे प्रतिनिधी, तर कधी भाजपचे वरिष्ठ नेते अशा विविध मान्यवरांची उपस्थिती दररोज दिसते.
गणेशोत्सवाच्या काळात रोज सकाळ-संध्याकाळ दोनशे ते अडीचशे भाविक दर्शनासाठी येतात. केंद्रीय मंत्री, राजकीय नेते, पत्रकार, अधिकारी यांचीही उपस्थिती इथे असते. मात्र या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सारे लोक आपले पद वा मान विसरून साध्या भक्ताप्रमाणे बाप्पाच्या चरणी येतात. तरुणाईचा सहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. लाल-केशरी कुर्ता-पायजमा परिधान केलेले युवक-युवती शिस्तबद्ध पद्धतीने आरत्यांचा सराव करून आरतीत सहभागी होतात. महाराष्ट्रातून आलेल्या महिला भक्त रोज उकडीचे मोदक बनवतात आणि प्रसाद म्हणून सर्वांना देतात.
या उत्सवात पूर्वोत्तर भारतातील युवक-युवतींचा सहभाग विशेषत्वाने जाणवतो. कोणत्याही धर्माचे वा जमातीचे असले तरी ते आरतीचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून येतात. समरसता ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, ती प्रत्यक्ष अनुभूतीतून कळते, हे त्यांच्या उपस्थितीतून प्रकर्षाने जाणवते. सुनील देवधर यांनी त्रिपुरात २०१६ मध्ये लहान स्वरूपात गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. आज हा उपक्रम तिथे पाच हजारांहून अधिक लोकांचा सार्वजनिक उत्सव बनला आहे आणि त्याच धर्तीवर नवी दिल्ली, मणिपूर, पश्चिम बंगाल अशा ठिकाणीही सामाजिक सलोख्याचा संदेश पसरवत आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या पलीकडे जाऊन सर्वांच्या चेहऱ्यावर भक्तीचे तेज झळकत आहे.