
मुंबई : गणेश विसर्जन मिरवणूकांचा दिवस जवळ आला असताना मुंबई पोलीसांना एक धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईतील एकूण ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून एकूण चारशे किलो आरडीएक्स लपवल्याचा दावा या धमकीत केला आहे. शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान हा धमकीचा मेसेज आला.
धमकीच्या मेसेजमध्ये नेमकं काय?
चारशे किलो आरडीएक्समुळे एक कोटी सर्वसामान्य नागरिकांना जीवे मारण्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. शिवाय १४ दहशतवादी भारतात घुसल्याचा देखील या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. मुंबईत आत्मघाती हल्ला घडवू आणि त्यासाठी मुंबईत ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी आज पहाटे मुंबई पोलिसांना मेसेजच्या माध्यमातून देण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या तोंडावरच पोलिसांना हा धमकीचा मेसेज आल्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. मात्र हा मॅसेज कोणी केला आहे हे अद्याप समजलेले नाही.