बंगाल विधानसभेत प्रचंड राडा

    04-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या गोंधळात भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष जखमी झाले.

गुरुवारी सकाळी भाजप आमदारांनी २ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांना का निलंबित करण्यात आले याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावरूनच वातावरण तापले. या चर्चेदरम्यान सतत गोंधळ घातल्यामुळे विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना उर्वरित दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. घोष यांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिल्याने मार्शल्सना बोलावण्यात आले आणि त्यांना जबरदस्ती बाहेर काढण्यात आले. या वेळी झालेल्या ढकलाढकलीत घोष जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी ममता सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी सामाजिक माध्यमावर बंगाली भाषेत लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पश्चिम बंगाल विधानसभेत लोकशाहीची हत्या करण्यात आली. ममता आणि त्यांचे गुलाम प्रशासन यांनी सभागृहातील लोकशाहीचा गळा घोटला आहे.