नवी दिल्ली : (GST Reforms) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ५६ वी जीएसटी परिषदेची बैठक राजधानी दिल्ली येथे सुरू झाली आहे. या बैठकीत परिषदेने ५ आणि १८ टक्के अशा दोन-स्तरीय दर रचनेला मान्यता दिली असून ती २२ सप्टेंबरपासून लागू केली जाईल. विशेष म्हणजे विमा सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारा करण्यासाठी वैयक्तिक जीवनविमा हप्ते, वैयक्तिक आरोग्यविमा, फ्लोटर पॉलिसी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या पॉलिसींवरील जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आला आहे.
जीएसची परिषदेच्या बैठकीनंतर रात्री उशिरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी कर संरचनेतील ऐतिहासिक बदलांना परिषदेने मान्यता दिल्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या, बैठकीत परिषदेने ५ आणि १८ टक्के अशा दोन-स्तरीय दर रचनेला मान्यता दिली असून ती २२ सप्टेंबरपासून लागू केली जाईल.
सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवर जीएसटीत मोठी कपात करण्यात आली आहे. केसांचे तेल, टॉयलेट साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकली, स्वयंपाकघरातील भांडी व अन्य घरगुती वस्तूंवर जीएसटी केवळ ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. अल्ट्रा-हाय टेम्परेचर दूध, छेना, पनीर तसेच सर्व भारतीय भाकरी उत्पादने – रोटी, पराठा आदींवरील जीएसटी शून्य टक्के करण्यात आला आहे. खाद्यपदार्थांमध्ये नमकीन, भुजिया, सॉसेस, पास्ता, इंस्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, मांसाहारी पदार्थ, कॉर्नफ्लेक्स, लोणी व तुपावरील जीएसटी १२ व १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. तसेच एअर कंडिशनर, ३२ इंचांवरील टीव्ही, डिशवॉशिंग मशीन, लहान गाड्या, ३५० सीसीपर्यंतच्या मोटरसायकली यावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून कमी करून १८ टक्के करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले की, ३३ जीव वाचविणाऱ्या औषधांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून शून्य टक्के करण्यात आला आहे. तसेच कॅन्सर, दुर्मिळ आजार व इतर गंभीर आजारांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ३ औषधांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणला आहे. अनेक औषधांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर कमी करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर, मातीची मशागत करणाऱ्या यंत्रणा, पिकांची कापणी व मळणी यंत्रे, गवत कापणी यंत्रे, कंपोस्टिंग मशिन्स यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. १२ ठराविक बायो-पेस्टिसाइड्स, नैसर्गिक मेंथॉल, हातमाग-हस्तकला उत्पादनं, संगमरवर, ग्रॅनाईट ब्लॉक्स तसेच चामड्यावरील वस्तूंवरील जीएसटीदेखील १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे. सिमेंटवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे, तर दृष्टी सुधारण्यासाठी लागणारे चष्मे आणि गॉगल्स यांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर कमी करण्यात आला आहे.
पानमसाला, गुटखा, तंबाखू उत्पादने आणि सिगारेट्सवर आता जीएसटी व्यवहारमूल्याऐवजी किरकोळ किमतीवर आकारला जाणार आहे. यावर ४० टक्के कर लागू केला जाणार असून, यात पानमसाला, सिगारेट्स, चघळण्याची तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य वस्तूंचा समावेश आहे. हा ४० टक्के जीएसटी शीतपेये, साखर किंवा कृत्रिम गोडवा असलेले पेये, फ्लेवर्ड अथवा कॅफिनयुक्त पेये, कार्बोनेटेड ड्रिंक्स तसेच फळांपासून तयार केलेल्या पेयांवरदेखील लागू होणार आहे.