मुंबई, काँग्रेस पक्षाने नागपूर येथून सुरू केलेल्या ‘संविधान सत्याग्रह पदयात्रे’वर भाजप आमदार अमित गोरखे यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात वेळोवेळी संविधानाचा अपमान केला असून, आज ‘संविधान वाचवण्याचे’ नाटक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोरखे म्हणाले की, आणीबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावले, शहाबानो प्रकरणात न्यायालयाचा निर्णय फिरवून तुष्टीकरणाचे राजकारण केले, एका कुटुंबाच्या फायद्यासाठी संविधान व लोकशाहीला कमकुवत केले, असे अनेक प्रकार काँग्रेसच्या कारभारात झाले. त्यामुळे काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घणाघात त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, भाजप व नरेंद्र मोदी सरकारने संविधानाला सर्वोच्च स्थान दिले आहे. ‘एक देश, एक संविधान’चा नारा देत कलम ३७० हटवून खऱ्या अर्थाने संविधान लागू करण्याचे कार्य झाले आहे.
काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप करताना गोरखे म्हणाले, “नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाला विरोध करण्याचे निर्देश दिले. काँग्रेसने बाबासाहेबांच्या निवडणुकांत विरोधक उभे करून त्यांचा पराभव केला. नेहरूंनी स्वतःसाठी भारतरत्न घेतले, पण बाबासाहेबांना हा सन्मान काँग्रेसकडून मिळाला नाही. तो व्ही.पी. सिंह व भाजप सरकारच्या कार्यकाळात देण्यात आला.”
डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक उभारण्याची इच्छा काँग्रेसला झाली नाही, पण मोदी सरकारने लंडनमधील बाबासाहेबांचे घर विकत घेऊन स्मारक उभारले, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला असून, हातात कोरे संविधान घेऊन ढोंग करणे हेच त्यांचे राजकारण असल्याचे गोरखे यांनी नमूद केले.