माझ्याच नव्हे, तर देशभरातील मातांचा काँग्रेस – राजदकडून अपमान ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

    03-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमध्ये ‘जीविका निधी साख सहकारी संघ’चा शुभारंभ केला आणि महिला स्वयं-सहायता गटांना १०५ कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला. याप्रसंगी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आणि आपल्या दिवंगत आईवर झालेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा उल्लेख करताना ते भावुक झाले.

आई हेच आपले जग असते आणि आईच आपला स्वाभिमान असतो. एक गरीब आई आयुष्यभर तप करून आपल्या मुलांना संस्कार आणि शिक्षण देते, म्हणूनच समाजात आईचे स्थान देवांपेक्षा वर मानले जाते. आपल्यालाही आपल्या आईने राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी स्वतःपासून वेगळे केले. मला भारतमातेची सेवा करायची होती, म्हणून जन्मदात्री आईने मला कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले. तिच्या आशीर्वादामुळेच मी देशसेवेच्या मार्गावर निघालो. पण जी आई आता या जगात नाही, जिचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, तिला काँग्रेस – राजदच्या मंचावरून शिवीगाळ करण्यात आल्याचे अतिशय वेदनादायी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ज्या आईने गरिबीत कुटुंबाचा सांभाळ केला, स्वतःसाठी कधी काही घेतले नाही, तिने मुलांसाठी आयुष्यभर त्याग केला. तरीदेखील तिच्यावर अपमानास्पद शब्दांचा वर्षाव करण्यात आला. “माझ्या आईचे काय गुनाह होते? तिने कोणाला दुखावले होते? तरीही तिच्यावर अशी वाईट भाषा वापरण्यात आली. मला जितका यातना होत आहेत, तितक्याच बिहारच्या मातांनाही या प्रकाराने दु:ख झाले आहे,” असे ते भावुक होऊन म्हणाले. गरीब आईची तपस्या आणि तिच्या मुलाच्या मनातील पीडा ही राजघराण्यात जन्मलेल्या लोकांना समजणार नाही. सोन्या-चांदीच्या चमच्यात जन्मलेल्या आणि सत्तेला जन्मसिद्ध हक्क मानणाऱ्या लोकांना एका गरीब आईचा त्याग कधीच कळणार नाही, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.