
नवी दिल्ली, भारत आणि भूतान यांच्यातील व्यापार, पर्यटन आणि सुलभ दळणवळणासाठी केंद्र सरकारने दोन आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे पहिल्यांदाच भारत आणि भूतान थेट रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहेत. ४,०३३ कोटी रुपयांच्या एकूण खर्चातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे दोन्ही देशांतील मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील आणि कनेक्टिव्हिटीला नवीन गती मिळेल.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या नवीन प्रकल्पांमुळे सीमावर्ती भागात रोजगाराच्या आणि आर्थिक घडामोडींच्या नव्या संधी निर्माण होतील. भूतानमधील समत्से आणि गालेफू हे जिल्हे मोठे निर्यात-आयात केंद्र आहेत. हे जिल्हे भारत-भूतान सीमेवरील जवळपास ७०० किलोमीटर लांबीच्या पट्ट्याला जोडतात.
सध्या भारताची रेल्वे सेवा केवळ पश्चिम बंगालमधील हासीमारा पर्यंत आहे. परंतु या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर आता प्रवासी थेट रेल्वेने भूतानला जाऊ शकतील. भूतान सरकार समत्से आणि गालेफू या शहरांना आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आर्थिक केंद्र म्हणून विकसित करत आहे. या रेल्वे मार्गामुळे केवळ व्यापार व पर्यटनाची गती वाढणार नाही, तर दोन्ही देशांच्या युवकांना वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि पर्यटन क्षेत्रात रोजगार मिळणार आहे. याशिवाय सीमा सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठीही सुविधा सुधारतील.
या प्रकल्पांसंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की भारत-भूतानदरम्यान झालेल्या द्विपक्षीय सामंजस्य करारामध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नाही. ही रेल्वे कनेक्टिव्हिटी केवळ दोन्ही देशांतील विश्वास आणि आपसी सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी आहे.
मंजूर झालेल्या दोन रेल्वे प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प असममधील कोकराझार ते भूतानमधील गालेफू या मार्गाचा आहे. ६९ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी ३,४५६ कोटी रुपये खर्च होणार असून ते पूर्ण होण्यासाठी सुमारे ४ वर्षे लागतील. या मार्गामुळे भारतातील कोकराझार आणि चिरांग हे जिल्हे जोडले जातील, तर भूतानमधील सरपांग जिल्ह्यातील गालेफू येथे रेल्वे पोहोचेल. या मार्गावर ६ स्टेशन, २९ मोठे पूल, ६५ लहान पूल, २ वायाडक्ट आणि २ मालवाहू शेड उभारले जाणार आहेत.
दुसरा प्रकल्प पश्चिम बंगालमधील बनरहाट ते भूतानमधील समत्से या मार्गाचा आहे. सुमारे २० किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी ५७७कोटी रुपये खर्च होणार आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध, सीमावर्ती भागातील विकास आणि रोजगाराच्या संधींना नवे वाव मिळेल. पर्यटकांना थेट रेल्वेने भूतानला जाणे शक्य होईल, ज्यामुळे पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल. भारत आणि भूतान हे दीर्घकाळ एकमेकांचे विश्वासू भागीदार राहिले असून या प्रकल्पांना त्या नात्याला अधिक बळकट करणारे पाऊल मानले जात आहे. सरकारचा विश्वास आहे की या रेल्वे लाईन्स तयार झाल्यावर सीमावर्ती लोकांचे जीवनमान आणि व्यवसाय दोन्ही अधिक सुकर व प्रगत होतील.